लॉकडाऊन शिथिल केल्याने भारतात करोना स्फोट होणार!
भारतात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात येत असून ‘अनलॉक’च्या माध्यमातून जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, या निर्णयामुळे भारतात करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतात अद्यापही परिस्थिती स्फोटक झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक मिशेल रेयान यांनी ही शक्यता वर्तवली. ‘भारतातील विविध भागात महासाथीच्या आजाराचा प्रभाव वेगवेगळा आहे. तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील परिस्थितीत फरक आहे. दक्षिण आशियात भारतासह पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही परिस्थिती अद्याप स्फोटक झालेली नाही. मात्र, भारताने लॉकडाऊन कमी करत नेल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात’, याकडे रेयान यांनी लक्ष वेधले.
महासाथीच्या काळात आजार लोकांमध्ये पसरल्यानंतर कोणत्याही क्षणी अधिक व्यापकपणे फैलावण्याचा धोका असतो. याआधीदेखील अशाच प्रकारे करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावला आहे. भारतात लॉकडाऊनमुळे संसर्ग फैलावण्याचा वेग मंदावला आहे. मात्र, त्यात आता शिथिलता देण्यात येणार असल्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढण्याचा धोका आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर, शहरात लोकसंख्येची अधिक घनता असणे, हातावर पोट असणार्यांना दररोज कामावर जाण्याशिवाय पर्याय नसणे आदी काही गोष्टींमुळे संसर्ग फैलावण्याचा धोका असल्याचे रेयान म्हणाले.
भारतात करोनाबाधितांची संख्या २ लाखांहून अधिक झाली आहे. रुग्ण संख्येत भारताने इटलीला मागे टाकले असून सर्वाधिक रुग्णांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी, देशात करोनाचे सर्वाधिक ९८८९ रुग्ण आढळले, तर २९४ जणांचा मृत्यू झाला. देशभरात ६६४२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.