ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लसीचे उत्पादन भारतात सुरु
कोरोना विषाणूवर ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली लस पहिल्या चाचणीत यशस्वी झाली आहे. आता ही लस दुसऱ्या टप्प्यात आहे. या लसीचे उत्पादन आता भारतात देखील सुरु होणार आहे. याबाबतची माहिती ब्रिटनची औषध कंपनी अॅस्ट्रॅजेनेकाने दिली. ब्रिटनची औषधी कंपनी अॅस्ट्रॅजेनेका म्हणाली आहे की त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोना विषाणूच्या लसीच्या कोट्यावधी डोसची निर्मिती सुरू केली आहे. या लसीचे उत्पादन ब्रिटन, स्वित्झर्लंड, नॉर्वे तसेच भारतात केलं जात असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.
अॅस्ट्रॅजेनेकाचे सीईओ पास्कल सोरियट यांनी बोलताना सांगितलं की आम्ही लस तयार करण्यास सुरवात करीत आहोत. निकालाच्या वेळी आमच्याकडे लस तयार असेल. तथापि, यामध्ये एक जोखीम देखील आहे. जर लस प्रभावी ठरली नाही तर सर्व मेहनत, पैसा व्यर्थ जाईल. यावर अॅस्ट्रॅजेनेकाचे सीईओ पास्कल सोरियट म्हणाले की WHO जोपर्यंत कोरोना महामारी संपली असं जाहीर करत नाही, तोपर्यंत कंपनी नफा घेणार नाही.
पास्कल सोरियट म्हणाले की त्यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी करार केला असून कंपनी एक अब्ज लस डोस तयार करणार आहे. २०२१ पर्यंत एक अब्ज लस डोस तयार करण्याचं लक्ष्य आहे. त्याच बरोबर २०२०च्या अखेरीस ४० कोटी डोस तयार होऊ शकतात. सप्टेंबरपर्यंत जगभरातील फॅक्टरीत लाखो लस डोस तयार होतील. तर २०२१ च्या मध्यापर्यंत २ अब्ज डोस तयार होतील, असं ब्रिटनची कंपनी अॅस्ट्रॅजेनेकाने सांगितलं आहे.