शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 27 एप्रिल 2021 (19:06 IST)

'या' कारणांमुळे आता घरातही मास्क घालावा लागेल...

-मयांक भागवत
 
"घरातही आता मास्क घालण्याची वेळ आलीय. एकमेकांसोबत बसतानाही मास्क घालावं. याचा खूप फायदा होतो."
 
निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. पॉल यांचं हे वक्तव्य भारतातील कोव्हिड-19 च्या बिघडणाऱ्या परिस्थितीचं वास्तव दर्शवणारं आहे.
 
त्सुनामीसारख्या पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने भारताला विळखा घातलाय. भारतात गेले सहा दिवस सलग तीन लाखांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांची नोंद झालीय.
 
एकीकडे, कोरोनारुग्णांची संख्या वाढतेय, तर दुसरीकडे लॅन्सेट जर्नलने कोव्हिड-19 चा प्रसार हवेतून होतो आणि संशोधनातून याचे पुरावे मिळाल्याचं स्पष्ट केलंय.
 
मुंबईच्या केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनीदेखील बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, "कोरोनाचा प्रसार हवेतून होतोय."
 
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत घरात असतानाही मास्क घालण्याची वेळ आलीय का? या प्रश्नाचं उत्तर आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला...
 
घरातही मास्क घाला - केंद्र सरकार
देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनलीय. दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या पहाता, केंद्र सरकारनेही घरात मास्क घालण्याचा सल्ला लोकांना दिलाय.
 
निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल म्हणतात, "आपण बाहेर मास्क घालण्याबद्दल बोलतो होतो. आता, कोव्हिड-19 चा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरलाय. त्यामुळे घरातही मास्क घातलं पाहिजे."
 
जर घरात क्वारंटाईन होणं शक्य नसेल, तर क्वारंटाईन सेंटरमध्ये जावं असं डॉ. पॉल पुढे म्हणाले.
 
लक्षणं नसणारे रुग्ण जास्त
कोरोनाग्रस्तांच्या एकूण संख्येपैकी 85 ते 90 टक्के रुग्णांमध्ये कोणतीच लक्षणं आढळून येत नाहीत.
 
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार, कोव्हिड-19 ची लक्षणं नसलेला व्यक्ती कामानिमित्त बाहेर फिरताना किंवा घरी संसर्ग पसरवू शकतो.
 
तज्ज्ञ सांगतात, म्युटेट झालेला (बदललेला) व्हायरस पहिल्यापेक्षा जास्त भयंकर आहे. हा डबल म्युटंट रोगप्रतिकारशक्तीला चकवणारा आहे. यामुळे घरातील एका सदस्याला लागण झाली, तर संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित होत असल्याचं दिसून आलंय.
 
कल्याणच्या फोर्टिस रुग्णालयाचे डॉ. संदीप पाटील म्हणतात, "लक्षणं नसलेल्या लोकांमुळे घरी संसर्ग पसरतोय. त्यामुळे सद्य स्थितीत घरात राहूनही आपण कुटुंब कोरोनाबाधित झाल्याचं पहातोय."
 
होम क्वारंटाईन असलेले कोरोनारुग्ण
"घरात एखाद्याला कोरोनाची लागण झाली असेल तर, इतरांनी मास्क घातलं पाहिजे. कोरोनाग्रस्त व्यक्तीनेही मास्क घातलं पाहिजे," असं डॉ. पॉल पुढे सांगतात.
 
राज्याभरात लक्षणं नसलेले आणि सौम्य लक्षणं असलेले लाखो कोरोनाग्रस्त रुग्ण होम क्वारंटाईन आहेत.
 
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, शहरात 5 लाखांपेक्षा जास्त रुग्ण सद्य स्थितीत होम क्वारंटाईनमध्ये उपचार घेत आहेत.
 
नागपूरचे डॉ. प्रितम चांडक म्हणतात, "होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांनी कुटुंबातील व्यक्तींशी जेवण, औषध किंवा पाणी देण्यावेळी संपर्कात येताना मास्क घालावं. कुटुंबातील सदस्यानेही मास्क घालणं गरजेचं आहे. दोघांमध्ये 6 ते 10 फुटांचं अंतर असलं, तरी दोन मास्क घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे."
 
मुंबईच्या व्हकार्ट रुग्णालयाचे इंटर्नल मेडिसनतज्ज्ञ डॉ. बेहराम पारडिवाला सांगतात, "कोव्हिड रुग्ण घरातील एका खोलीतच रहाणार असेल आणि बाहेर येणार नाही. तर त्याने मास्क घालण्याची गरज नाही. पण बाथरूममध्ये जाण्यासाठी बाहेर यावं लागल्यास रुग्णाने मास्क घालावा."
 
भारतासारख्या देशात घरात मास्क घालणं शक्य आहे?
नागपूरचे डॉ. प्रितम चांडक म्हणतात, "संशोधनात दिसून आलंय की घरात मास्क घालण्याचा फायदा होऊ शकतो. पण, प्रॅक्टिकली हे शक्य नाही."
 
"मास्क घालताना आणि काढताना योग्य काळजी घ्यावी लागते. घरात लोकांचा एकमेकांशी संपर्क येतो. मास्क योग्य ठिकाणी न ठेवल्यास संसर्ग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे घरी मास्क घालणं शक्य होणार नाही," असं ते पुढे सांगतात.
 
ते म्हणतात, "अनेकांना दमा, मधूमेह असतो. मास्क दिवसभर घातला तर, शरीरात कार्बनडायऑक्साइडचं प्रमाण वाढेल आणि ऑक्सिजनचं कमी होईल."
 
डॉ. संदीप पाटील सांगतात, "केंद्र सरकारची घरी मास्क घालण्याची सूचना, धोक्याचा इशारा समजली पाहिजे. काळजी घेताना बेपर्वाई होता कामा नये. आपल्यामुळे घरातील ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग होण्याची शक्यता आहे."
 
"घरी काम करण्यासाठी येणाऱ्यांकडूनही संसर्ग पसरू शकतो. कोरोनासंसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी घरी मास्क घालण्याची सूचना करण्यात आली आहे," असं डॉ. पाटील पुढे म्हणाले.
 
तर, डॉ. बेहराम पारडिवाला यांच्या सांगण्यानुसार, "सुरक्षित रहाण्यासाठी सद्य स्थितीत घरात असताना सर्वांनी मास्क घालावं."
 
हवेतून पसरतोय कोरोना व्हायरस?
डॉ. फराह इंगळे सांगतात, "कोरोना व्हायरस हवेतून पसरतो हे स्पष्ट झालंय. सहा फुटांपर्यंत व्हायरस सहज पोहोचू शकतो. त्यामुळे घरी किंवा जवळपास कोरोना रुग्ण असेल, तर मास्क लावणं महत्त्वाचं आहे."
 
तज्ज्ञांच्या मते, चाळ किंवा एकमेकांना खेटून असलेल्या घरातील लोकांनी मास्क घातलं तर संसर्ग पसरण्याची शक्यता कमी होईल.
 
घरात मास्क घालण्याबाबत संशोधनात काय समोर आलं?
चीनच्या बेजिंगमध्ये कुटुंबातील सर्वांनी मास्क घातलं. तर, फायदा काय होतो. यावर संशोधन करण्यात आलं. या संशोधनानुसार, घरातील पहिल्या सदस्याला कोरोनाची लक्षणं दिसून येण्याआधी कुटुंबातील सर्व मास्क वापरत असतील तर, संसर्गाची शक्यता 79 टक्क्यांनी कमी होते.
 
तर, कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर मेडिकल किंवा नॉन-मेडिकल मास्क घातलं कर संसर्गाची शक्यता 77 टक्क्यांनी घटते असं थायलॅंडमध्ये करण्यात आलेल्या संशोधनात आढळून आलंय.
 
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल-प्रिव्हेन्शनच्या (CDC) सूचनेनुसार,
 
तुमच्या घरात रहात नसणाऱ्या व्यक्तीसोबत तुम्ही किंवा कुटुंबातील इतर व्यक्ती सहा फुटांच अंतर ठेवू शकत नसतील
घरातील ज्येष्ठ नागरिक ज्यांना आजार होण्याची शक्यता आहे अशावेळी घरात मास्क घालून रहाणं गरजेचं आहेत.
घरात मास्क घालण्याबद्दल जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते?
जागतिक आरोग्य संघटनेने, घरात प्रत्येकाने मास्क केव्हा घालावं याबाबत काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
 
घरातील नसलेला, नवखा व्यक्ती घरी आल्यास
हवा खेळती राहण्यासाठी योग्य दरवाजे, खिडक्या नसल्यास
दोन व्यक्तींमध्ये 1 मीटरचं अंतर ठेवणं अशक्य असल्यास
घरात हवा खेळती राहू शकते. पण दोन व्यक्तींमध्ये 1 मीटरचं अंतर नसेल. अशा परिस्थितीत घरात मास्क घालावं