शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (16:50 IST)

गुरुचरित्र पारायण कधी वाचावे?

श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीनृसिंहसरस्वती यांच्याबद्दल चरित्रग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र. सरस्वती गंगाधर रचित हा ग्रंथ दत्त संप्रदायाच्या कथा सांगणारा आहे. स्वतः श्रीनृसिंहसरस्वतींनी सरस्वती गंगाधर यांना चरित्र लिहिण्याचा आदेश दिल्याची माहिती श्री गुरुचरित्रात दिली आहे तर तशी श्रद्धा दत्त संप्रदायात आहे. इ. स. १४८० च्या सुमारास या ग्रंथाची रचना झाली असल्याचे मानले जाते. गुरुचरित्रास दत्तसंप्रदायाचा उपासना ग्रंथ मानतात.
 
गुरुचरित्र या ग्रंथात एकूण ५२ अध्याय असून त्यात ७४९१ ओव्या आहेत. मंगलाचरण, गुरुभक्ती आणि गुरुप्रसाद हे या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत. गुरुची कृपा प्राप्त करणे तर ऐहिक आणि पारमार्थिक जीवनातील यश मिळविणे याचे मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे. श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती ही दोघेही दत्तात्रेय यांचा अवतार मानले गेले आहेत त्यामुळे त्यांच्या विषयी या ग्रंथात विशेष वर्णन आलेले दिसून येते.
 
गुरुचरित्र पारायण कधी वाचावे?
गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण हा दत्त संप्रदायातील महत्त्वाचा घटक मानला गेला असून ७/ १८/ २८/ ३४/ ३७/ ४३/ ५१ दिवस असा ग्रंथाचा पारायण काल सांगितला आहे. श्री गुरु चरित्राचे वाचन पहाटे ०३ ते सायंकाळी ०४ या दरम्यान करावे. दुपारी १२ ते १२.३० ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्या वेळेस पारायण वाचन करु नये. दररोज अंघोळ, संध्या करून संकल्प करावा. वाचन करण्यासाठी कायम एकच आसन वापरावे. पारायण करणार्‍याने हलका आहार घ्यावा. इतर कुणाच्याही घरचे अन्न स्वीकार करु नये. उपवास करु नये मात्र दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा. दिवसभर ईशचिंतन करावे तसेच या काळात घोंगडी पसरून जमिनीवर झोपावे. पारायण काळात शरीर, मन आणि बुद्धी यांची शुद्धता पाळावी. या दरम्यान पुरुषांनी दाढी वाढवू नये, चामड्याच्या वस्तू वापरु नये. ब्रम्हचर्य पाळावे. या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी जाऊ नये किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतः च्या कुटुंबात सुतक आल्यास श्री गुरु चरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे मात्र अर्धवट सोडू नये. गोमूत्र शिंपडावे. रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे. पारायण संपले की ब्राह्मण आणि सुवासिनी यांना भोजन आणि दक्षिणा देऊन पारायण संपवावे.
 
गुरुचरित्र पारायण कसे सुरु करावे?
श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्याच्या आदल्या दिवशी चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य दाखावावा. चार कुत्रे म्हणजे चार वेद तर एक गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनु असे  असल्याने हा नियम पाळण्याचे सांगितले जाते. पारायणापूर्वी दाराला तसेच चौरंगाला तोरण बांधावे. चौरंगाभोवती रांगोळी काढावी. चौरंगावर पिवळा कपडा पसरवावा. चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई आणि उदबत्ती लावावी. पारायणास बसण्यापूर्वी देवाला पारायणास उपस्थित राहण्याची प्रार्थना करावी. घरातील वडीलधारी मंडळीस नमस्कार करावा मग पारायणासाठी आसन ग्रहण करावे. वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. प्रथम अथर्वशीर्ष वाचान नंतर एम माळ गायत्री जप आणि एक माळ श्री स्वामी समर्थ जप किंवा दत्त मंत्र म्हणावा.
 
​श्री गुरु चरित्र वाचण्याची पद्धत
पहिला दिवस - अध्याय १ ते ९
दुसरा दिवस - अध्याय १० ते २१
तिसरा दिवस - अध्याय २२ ते २९
चौथा दिवस - अध्याय ३० ते ३५
पाचवा दिवस - अध्याय ३६ ते ३८
सहावा दिवस - अध्याय ३९ ते ४३
सातवा दिवस - अध्याय ४४ ते ५२
 
श्री गुरु चरित्राचे तीन दिवसीय पारायण करु नये. केवळ दत्तधाम आणि राष्ट्र सेवेसाठी एक दिवसीय पारायण करावे. वैयक्तिक पारायण 7 दिवसाचे करावे. 
 
।। श्री गुरुदेव दत्त ।।
। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।
श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय ।।