रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Updated : मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (15:42 IST)

श्रीदत्तलीलामृताब्धिसार - दशमस्तरंगः

श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ॥
महात्म्याच्या मेळें कळे । धर्मतत्त्व जें आगळें । कळतांची दुःख टळे । पळे काळ ॥१॥
बाळ ययातीचा यदू । वनीं देखे नग्न साधु । तेजस्वी हा न हो भोंदू । वंदूं म्हणे ॥२॥
ज्यानें सर्वही सोडीले । तरी आंग न रोडिलें । म्हणे तुम्ही हें जोडिलें । भलें ज्ञान ॥३॥
जन आयुःश्रीकीर्त्यर्थ । व्यर्थ भोगिती अनर्थ । तुम्हां केवी ये स्वार्थ । अर्थत्यागें ॥४॥
मागें कांहीं नाहीं फांस । चित्तीं न ठेविली आस । रुचे तरी हें आम्हांस । खास सां ॥५॥
सांगे साधू म्यां चौवीस । गुरु केले त्यांही खास । बोध दिल्हा तो परिस । फांस तुटे ॥६॥
मोठें दुःख झालें तरी । दैवाधीन जीवांवरी धरण्युपदेशें वरी । धरी क्षमा ॥७॥
द्रुमानें उपदेशिले । परोपकारीं आपुले । कलेवर हें लाविलें । झालें धन्य ॥८॥
अन्य गोडी न पाहणें । आहारानें तुष्‍ट होणें । अंतर्वायूच्या शिक्षणें । क्षणें धालों ॥९॥
कालोद्भवगंधें बद्ध । जातां वायू न हो बुद्ध । तैसा इंद्रियार्थै विद्ध । बद्ध नोहे ॥१०॥
नोहे मेघानें विकार । नभा घटानें आकार । तेवी वृत्ति देह पर । थोर मी हा ॥११॥
पाहा सर्वांमाज मिळें । गोडी दें करिं सोवळें । उपदेश हा विमळें । जळें केला ॥१२॥
ठेला गुप्‍ते किं प्रगट । न राखीजे लाधे काष्‍ठ । कुठें खाता न ज्या वीट । नीट शोधी ॥१३॥
साधी भजकांचें हित । उफाधीनें हो आकृत । अग्नी तैसा मी वागत । ख्यात भला ॥१४॥
कलावत्तनु विकारी । वृद्धि कार्श्य दावी परी । मी चंद्रसा अविकारी । धरीं मनी ॥१५॥
जनीं आत्मा तैसा भासे । जळीं सूर्यबिंब जसें । संधीं हालचाल असे । नसे रुपीं ॥१६॥
जो पी करें सूर्यं जळ । सोडुनी दे येतां काळ । त्या शिक्षणें मी सकळ । घें दें लोकां ॥१७॥
मूर्खा अति स्नेह जाचे । तदर्थ हें कपोताचें । आख्यान हें चित्ता खोंचे । वेंचे स्नेहा ॥१८॥
महावृक्षीं करी घर । राहे कपोत सदार । वाढे त्यांचा परस्पर । थोर स्नेह ॥१९॥
मोह मायेचा दुर्धर । न सोडिती क्षणभर । परस्परां हो संचार । बरोबर ॥२०॥
परस्पर न्याहाळिती । एकेठायीं खाती पिती । दैवें त्यांला पोरें होती । मतीहीना ॥२१॥
दीनापरी त्यां पाळीती । जरी महाकष्‍ट होती । तरी आपणा मानिती । चित्तीं धन्य ॥२२॥
अन्य कांहीं न पाहती । स्नेहामुळें बद्ध होती । स्तुती पोरांची करिती । गाती मूढा ॥२३॥
घाल्याही उपोषण । त्यांचें प्रेमानें पोषण । करीती हो त्यां भूषण। कण देतां ॥२४॥
घेंतां त्याचें अलिंगन। गोड मानीती चुंबन। ऐसें आयुष्य खर्चून । क्षीण होती ॥२५॥
होती त्यांचीं थोर पोरें । पोट नीट नच भरे । म्हणोनी ते जाती त्वरें । बरे दूर ॥२६॥
पोर मागे हळू हळू । घराबाहेरचि खेळूं । आले त्याला नये पळूं । बाळू स्तब्ध ॥२७॥
लुब्धक त्यावरी जाळें । टाकोन घे माघें वळें । माय देखे ती त्या वेळे । बाळें बद्ध ॥२८॥
मुग्धपणें आक्रोशें ती । पडली जाळ्यावरती । अनायासें त्याच्या हातीं । येती दीन ॥२९॥
खिन्न कवडाही पाहे । तेथें पडे तोही स्नेहें । ऐसा मृत्यू त्यां ये मोहें । नोहें बोध ॥३०॥
बाघ अर्था जे न देती । भोगें तृप्‍त जे न होती । स्नेहें गेहीं सक्‍त होती । गती त्यां हीं ॥३१॥
ज्यां ही तनू मोक्षद्वार । मिळाली ते हा विचार । न करिति जरी तर । घोर भोग ॥३२॥
भोग स्वर्गीं नरकीं हे । घेतां र्‍हद्रोग कां वाहें । आरा परी येथें राहें । नोंहे दुःखी ॥३३॥
राखीं अंतर्वृत्ती सदां । कदां नाणी मनीं खेदा । दैवलाब्धा खायीं मुदा । छंदा नेणें ॥३४॥
जेणें परीपूर्ण सिंधू । येतां न येतां ही सिंधू’  न हो हर्षामर्षबंधू । साधू तेवी ॥३५॥
जे विषय दैवें भोगीं । त्याणें न क्षोभें मी जागीं । अंतपार न दें जगीं । उगी राहें ॥३६॥
मोहो स्त्रीच्या हावाभावा । रुप लावण्य वैभवा । पतंगसा ये अभावा । भवा घे तो ॥३७॥
घेतां सार माशीपरी । रमें नैकत्र न करीं । सांठा आपुल्याशीं मारी । वारीं दूर ॥३८॥
शूर मारी स्त्री सेवितां । गजापरी ये बद्धता । सोडूनी दें स्त्रीची कथा । वार्ता ही मी ॥३९॥
नेमी गृहस्थेही पोरी । माता बहीणही दूरी। कीजे काम अनिवारी । करी विद्ध ॥४०॥
सिद्ध करी मधुमाशी । पूर्वी मधु हा घे त्यासी । ह्या शिक्षणें घें सुखेंसी । त्या सिद्धान्ना ॥४१॥
ज्याना गीतवाद्यें बंध । ते हरिण देती बोध । चित्ता न लावीं तो नाद । बंध जो दे ॥४२॥
मोदे गंधें मीन त्याला । जिव्हा नावरिता आला । मृत्यु तोची गुरु मला । झाला खास ॥४३॥
रस न जिंकी तो न हो । जितेंद्रिय महाबाहो । रसजयें विजयी हो । न हो खिन्न ॥४४॥
मानवती वेश्या एक । धन इच्छुनी अधीक । फिरवी त्या जो धनिक । निकट ये ॥४५॥
तयेचा हा ल्हाव ठावा । होतां कोणी तीचा हावा । न देखती तरी हावा । भावा दावी ॥४६॥
जेवीं डोले हाले तेवीं । आतां बाहेर ये जवी । रुपें पालटोनी नवीं । दावी लीला ॥४७॥
तीला कोणी न पूसतां । निराशें ये विरक्‍ता । आठवूनी भगवंता । नता बोले ॥४८॥
धालें तेंची माझें मन । रतीं अर्थीं जे हो दीन । आत्मारामं आलिंगन । मान देतां ॥४९॥
घेतां नराचें चुंबन । भय शोक मोहें म्लान । होतें आजी मदानन । पीन झालें ॥५०॥
कलेवर हें विकोनी । नित्य रमें आलिंगुनीं । अंतरात्म्या निराशेनीं । ध्यानीं निजें ॥५१॥
निज निराशा होतां ती । हें शिक्षण घें मी चित्ती । आशा दुःख निराशा ती । शांती थोर ॥५२॥
कुररें राखितां मांस । रिते ते मारिती त्यास । तेव्हां मी परिग्रहास । खास सोडीं ॥५३॥
जोडी सुखा आत्मरति । चिंतापमान न चित्तीं । त्या बाळाच्यायोगें ये ती । शांती मज ॥५४॥
द्विजकन्या एक बरी । जातां स्वीय ग्रामांतरीं । तीला वरुं आले घरीं । भारी विप्र ॥५५॥
क्षिप्र कराया सत्कार । साळी कांडी तेव्हां थोर । कांकणाचा शब्द फार । दूर जायी ॥५६॥
मायबापा ये दूषण । म्हणोनी दोन कंकण । राखी तींही होती जाण । खणखणें ॥५७॥
तीणें एक एक ठेलें । कांकण तें न वाजलें । तें शीक्षण म्यां घेतलें । भलें ऐका ॥५८॥
एकाजागीं होतां लोक । तंटा हो दोन्ही ही देख । वार्ता तपःसिद्धी चोख । एक होतां ॥५९॥
जातां हुशार एकला । परघरीं सर्प धाला । तेव्हां न बांधीं गेहाला । झाला हर्ष ॥६०॥
तर्ष सोडी हो एकाग्र । वाह्य नेणें शराकार । त्या शिक्षणें घ्यानें दूर । वारी द्वैता ॥६१॥
ध्यातां तदाकारता ये । पेशस्कारकीटन्यायें । जीव ब्रह्म ब्रह्मत्वा ये । माये सोडी ॥६२॥
ओडी तंतू नाभींतून । कोळी खेळे ते खावून । अंतीं एकला होवून । आन राहे ॥६३॥
पाहे ईश मीही तैसा । स्वमायेनें ह्या विलासा । पसरी त्या खातां जैसा । तैसा हो कीं ॥६४॥
लोकीं देह हा जायाचा । दे वैराग्यबोध ज्याचा । वृक्षधर्म जो बीजाचा । सांचा करीं ॥६५॥
वरीती इंद्रियें ह्याला । सवतीच्या परी ख्याला । पावतां हा मनीं भ्याला । झाला दीन ॥६६॥
मी न मानीं हो ह्याहुन । आन दुर्लभ म्हणून । ह्यांच्या योगें घें साधून । ज्ञान हें रे ॥६७॥
तू रे बरें हें जाणूनी । सुविचारें घेयीं मनीं । तेव्हां यदू हें ऐकोनी । मनीं धाला ॥६८॥
त्याला श्रीदत्त हा असें । भान होतां दावी तसे । दत्त आत्मरुप असे । जसें वेदीं ॥६९॥
आधीं होती परभक्‍ती । ह्या बोधें हो त्याची मुक्‍ती । जे हें तत्त्व घेती चित्तीं । गती त्यां हो ॥७०॥
(अलंकार)
वाचे मना अगोचर । तो हा स्वेच्छें हो गोचर । श्रीभगवान्भक्‍ताधार । तारक तो ॥७१॥
सुलभ जो स्मरणची । भावें गातां लीला ज्याची क्षेम लाभे मरणाची । न चिंता हो ॥७२॥
देवालाही जो दुर्लभ । भावें अम्हा तो सुलभ त्राता सदा स्वयंप्रभ । अभय दे ॥७३॥
वासनेची जडी तोडी । स्वभक्‍ता दे ज्ञानजोडी मनाचें चापल्य झाडी । गोडीनें जो ॥७४॥
नंदन अनसूयेचा । दत्त नाम जो मुनीचा । ध्येय देव तो आमुचा । साच स्वामी ॥७५॥
दयासिंधो भक्‍तपाळा । तूझी अगाध हें लीला गोब्राह्मणप्रतिपाळा । काळांतका ॥७६॥
सत्वर हें मन आतां । निज पदीं ठेवीं शता विंचू डंकाची हो व्यथा । अंतकाळीं ॥७७॥
रसना ही ओड घेयी । दृष्‍टी उफराटी होयी । दशन मिटती घायीं । जायी त्राण ॥७८॥
स्वये होतां पराधीन । त्रिदोषही ये वाढून । यमपाशें हो बंधन । दीनत्व ये ॥७९॥
ती वेळा हो सुदारुण । तेव्हां न घडे स्मरण । ती दशा न येतां जाण । शरण हो ॥८०॥
मुखीं नाम डोळया धाम । चित्ता पदीं दे विश्राम । श्‍वसूकरविष्‍ठोपम । मान वाटो ॥८१॥
खेंचीं रागा द्वेषा चोपी । प्रारब्ध भोगीतां रुपी । रमो मन न विक्षेपीं । ओपी दत्ता ॥८२॥
मानापमान नाठवे । मित्र शत्रु तुल्य व्हावे । प्रसादें निश्‍चळ व्हावें । भावें रुपीं ॥८३॥
लक्ष्य अचूक राहावें । निजरुपी म्या जागावें । साक्षीपणेंची वागावें । गावें तुला ॥८४॥
वर हाची देयीं देवा । सदा सत्संग घडावा दासापरी तुझी सेवा । भावार्थे हो ॥८५॥
देश काल वस्तुनें ज्या । परिच्छेद न तत्पूजा । नेणें तरी कल्पूं निजा । काजासाठी ॥८६॥
शीतांशूचेपरी भासे । मुख ज्याचें मंद हासें अब्ज प्रफुल्ल हो जसें । तसे डोळे ॥८७॥
हातीं अभय वर दे । जो खेचरीमुद्राछंदे । वसे पद्मासनीं मोदें । नादें लीन ॥८८॥
नित्य चिंती रुप असें । सुमनासन देतसे । धूवीं पाद प्रेमरसें । नसें व्यग्र ॥८९॥
जल आवडीचें स्नाना । देवुं भक्‍तीचें भुषणा । तसे भाव विलेपना । ध्याना आणू ॥९०॥
लीनपण फूल माळूं । अहंकार धूप जाळूं । पहा सोहंदीप हळू । ओवाळूं हा ॥९१॥
लाडू नवविध भक्‍ती । वाडू नैवेद्यार्थ भुक्‍ती । दीनोद्धारा करी पाहुनी हे ॥९२॥
सिंचिलें जें आवरण । त्याचें करीं आचमन । ज्या योगें ये हें बंधन । मनःक्षोभ ॥९३॥
धु हें भक्‍तांचे अंतर । येथें वसें निरंतर । चेंदा कर्माचा सत्वर । बरा करीं ॥९४॥
गुरु तूंची देव तूंची । हेची भक्‍ती करी साची । मनीं नाणी मी भेदाची । कच्ची वार्ता ॥९५॥
रुप तुझें हेचि जग । कोणाही न दें उद्वेग । नमी सर्वां तेणें व्यंग । सांग होयी ॥९६॥
वदवी हे त्या आरती । उजळूनी अंतर्जोती । रविं दुजे थलपती । त्या ओवाळूं ॥९७॥
दत्तात्रेय गुरुराया । जयजया योगिवर्या । मनोरमा भक्‍तिगम्या । दयासिंधो ॥९८॥
लेकुराचे बा बोबडे । हे बोल वेडे वांकुडे । लेण्यापरी मानी लाडे । कडे घेयी ॥९९॥
सानुस्वार जो ओवी या । एक सहस्त्र ओविया । त्याअ मध्येंची ओविया । ॐकारात्मा ॥१००॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यवासुदेवानंदसरस्वतीविरचिते
श्रीदत्तलीलामृताब्धिसारे यद्वनुग्रहो दशमस्तरंगः । ओव्या॥१०००॥
अक्षरें २८००० संपूर्णोऽयं ग्रंथः । श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥