रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (11:38 IST)

बळी प्रतिपदेची पौराणिक कथा

ही गोष्ट आहे राजा विरोचन पुत्र असुर राजा बळीची. राजा बळी अत्यंत दानशूर होता. खरं तर भक्त प्रह्लाद यांचा नातू म्हणून देखील त्यांची ओळख होती. राक्षस कुळात जन्म घेऊन सुद्धा चारित्र्यवान, विनयशील, प्रजेचा हितचिंतक अश्या रूपाने ते प्रख्यात असे.   
 
त्यांच्या दारी जो मागण्यासाठी यायचा त्याला राजा बळी रिते हस्ते पाठवत नसे. त्यांच्याकडे अफाट संपत्ती होती. देवांचा त्यांनी आपल्या बळाच्या सामर्थ्यावर अनेकदा पराभव केला होता म्हणून तो त्रेलोक्य विजेता असे. त्याला त्याचा फार गर्व झाला होता. त्यांना आणि त्यांचा गर्व हरण करण्यासाठी  भगवान श्री हरी विष्णू यांची निवड करण्यात आली. 
 
एकदा राजा बळीने यज्ञ करण्याचे ठरविले. त्यांचा नियम असे की यज्ञ झाल्यावर तो नेहमीच दान देत असे. भगवान विष्णू वामन अवतार घेऊन त्याचा दारी मागण्यासाठी येतात. त्यावर बळी त्यांना ब्राह्मण कुमार आपणास काय हवे असे विचारतात. त्यावर वामन अवतारी विष्णू त्यांना त्रिपाद भूमिदान द्या असे म्हणतात. राजा बळी त्यांना त्रिपाद भूमी देण्यास होकार देतात. त्यांना असे वाटते की हे तर वामन आहेत यांचा त्रिपाद भूमी मध्ये काय येणार. 
 
तेवढ्यातच वामन अवतारी विष्णूंनी आपले रूप विराट करून एका पावलात सर्व पृथ्वी व्यापिली, दुसऱ्या पावलात सर्व पाताळ, ब्रह्माण्ड व्यापले आता त्यांच्या दोन पावलातच राजा बळी सर्व गमावून बसल्यामुळे त्याकडे देण्यासारखे काहीच नव्हते. आता तिसरा पाय कुठे ठेवू असे ब्राह्मण कुमाराने विचारल्यावर राजा बळी विचारात पडतात आणि मग काही वेळा विचार करून त्यांना म्हणतात की महाराज आपण आपले पाय माझ्या डोक्यावर ठेवा. असे म्हणतातच वामन आपले तिसरे पाऊल त्याचा डोक्यावर ठेवतातच बळी पाताळात सामावतात. 
 
तेव्हा श्री विष्णू त्यांना पाताळाचे राज्य देतात आणि वर मागण्यास सांगतात. त्यावर बळीने उत्तर दिले की देवा आता पृथ्वीवर माझे राज्य संपणारच आहे माझी इच्छा आहे की पृथ्वीवर दरवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखावे. यमासाठी दीपदान करणाऱ्यांना कधीही यमाचा त्रास होऊ नये. त्याकडे लक्ष्मीचा नेहमी वास असावा. ते 3 दिवस आश्विन मासातील कृष्णपक्षाची चतुर्दशी, आश्विन अमावस्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला बळी प्रतिपदा किंवा बळीराज्य  असे ही म्हणतात. त्या दिवसापासून बळी प्रतिपदा करण्याची प्रथा सुरू झाली. 
 
पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी व्यापारी वर्ग नवं वर्षाची सुरुवात मानतात. बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात आणि नव्या कामाला सुरुवात करतात.