रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (13:27 IST)

श्यामा गाय आणि वाघ... खूपच सुंदर गोष्ट

ही गोष्ट आहे कान्हाच्या नगरीतील एक श्यामा गायची. श्यामा गाय आपल्या झुडपासह नदी काठी गवत खाण्यासाठी आलेली असते. कोणास ठाऊक कसे पण ती वाट चुकते आणि चालत चालत अरण्यात निघून जाते. ती बेसावध असताना तिच्या समोर एक वाघ येतो. ती वाघाला बघून घाबरते. वाघ तिला म्हणतो की इथून तू पळून जाऊ शकत नाही. कारण तुझ्यामध्ये एवढे सामर्थ्य नाही की तू इथून पळ काढशील. मी भुकेला आहे मला खूप भूक लागली आहे आता मी तुला खाणार. 
 
वाघाने असे म्हणतातच तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आले.
ते बघून वाघ म्हणाला की मी तुला खाणार तू मरणार याची तुला भीती वाटते का? 
तेव्हा ती वाघाला म्हणते नाही रे दादा मला माझ्या मृत्यूची काही एक भीती नाही. पण ...
पण काय वाघाने विचारले. 
पण माझे बाळ ते अजून फार लहान आहे. आणि त्याला माझ्या दुधाशिवाय काहीच दुसरे पर्याय नाही. मी बऱ्याच वेळापासून बाहेर आहे तो उपाशी असणार. मी त्याला दूध पाजून लगेच परत येते मग तू मला मार पण मला थोड्या वेळ घरी जाऊन येऊ दे. मी तुला विनवणी करते. नाही तर माझे बाळ उपाशीच राहील. 
मी तुझा वर कसा काय विश्वास करू वाघ विचारतो. 
मी खरे बोलत आहे दादा तूम्ही माझा विश्वास करा. मी लगेच येईन. 
बऱ्याच वेळा विनवणी केल्यावर त्या वाघाने तिला सोडले आणि म्हणाला की बघ मी तुझ्या खरं बोलण्यावर विश्वास ठेऊन सोडत आहे पण तू बाळाला दूध पाजल्यावर लगेच ये. नाही तर मी तुझ्या घरात येईन आणि इतर गायींना देखील मारून टाकेन. 
 
ती वाघाचा निरोप घेऊन आपल्या घराकडे येते जिथे तिची सगळ्या तिच्या मैत्रिणी वाट बघत असतात. त्या तिला विचारतात की तू कुठे अडकली होतीस आम्हाला तर वाटले की तू वाट चुकून अरण्यात गेली आणि वाघाने तुला ठार मारले की काय ? 
 
तेवढ्यात तिचे वासरू तिचा जवळ येतो ती त्याला लाड करते आणि आपले दूध पाजता-पाजता रडत जाते. तिला रडताना बघून साऱ्याजणी तिला रडण्याचे कारण विचारतात तेव्हा ती घडलेले सर्व सांगते. आणि मला जावेच लागणार असे सांगते. तिला सर्व जण अडविण्याचा प्रयत्न करतात पण ती मी वचनबद्ध आहे असे सांगून त्यांचा निरोप घेते आणि माझ्या बाळाची काळजी घ्या सांगून निघते आणि थेट वाघाकडे येते. 
 
वाघाला तिला बघून आश्चर्याचा धक्का लागतो. तो तिला आपल्या समोर बघून तिला म्हणतो की मला तर वाटलेच नव्हते की तू इथे परत येणार. 
 
येणार कशी नाही मी तुम्हाला येणाचे वचन दिले होतं. त्यामुळे मला यायचे तर होतेच. श्यामा म्हणाली. 
वाघ श्यामाची वचन बद्धता आणि प्रामाणिकपणा बघून फार खुश झाला आणि म्हणाला की मी तुझी परीक्षा घेत होतो तू फार चांगली आहेस. जा मी तुला मोकळे केले तू आता आपल्या बाळाकडे जा, त्याला तुझी गरज आहे. तू आज पासून माझी बहीण झालीस. मी कधीही तुझ्या वर कोणते ही संकट येऊ देणार नाही. असे म्हणून तो श्यामाला सोडून देतो आणि श्यामा परत आपल्या घरी सुखरूप येते..