गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. ऑनलाईन दिवाळी अंक
Written By वेबदुनिया|

'गुडमॉर्निंग महाराष्ट्र'

- ऋचा देशपांडे

हल्ली आकाशवाणीच्या फेमस म्युझिकपेक्षा, हॅलो, गुडमॉर्निंग महाराष्ट्र, गुडमॉर्निग पीपल अशा रेडिओ जॉकीच्या अर्थात आरजेंच्या मधुर आवाजाने आपल्या प्रत्येकाचा दिवस उजाडतो. किंवा मग सूर्योदय होतो म्हणा. आणि दिवसाचा अखेरही याच आवाजाने होतो.

खरं तर दूरचित्रवाणीच्या शोधानंतर रेडिओला कितपत प्रतिसाद मिळेल हा यक्ष प्रश्न होता. कारण रेडिओ हे केवळ श्राव्य माध्यम आहे, तर टिव्ही दृकश्राव्य माध्यम. त्यामुळे 'एफएम'चे भविष्यच मुळात चिंतेच्या वातावरणात सुरू झाले.परंतु, आज पाहायला गेले तर, एफएम ऐकणार्‍यांची संख्या टिव्ही पाहणार्‍यांपेक्षा अधिक आहे. याचं सारं श्रेय जाते ते नवनवीन येणार्‍या एफएम चॅनल्सना.

आपण एफएम नेहमीच ऐकतो. पण 'एफएम' म्हणजे काय हे आपल्यापैकी खूप कमी जणांना माहिती आहे. एफएम म्हणजे 'फ्रिक्वेंन्सी मॉड्यूलर'. भारतात याचे सर्वप्रथम ब्रॉडकास्टींग झाले ते 1977मध्ये मद्रास येथे. यानंतर देशात 'एफएम'चा प्रवास सुरू झाला. 1932 मध्ये जालंधर येथे 'एफएम' दाखल झाला. हे सारं त्या काळात सरकारी होतं.

खर्‍या अर्थाने 'एफएम' क्षेत्रात क्रांती झाली ती, 1993 मध्ये. या काळात अनेक खाजगी 'एफएम'ने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजनांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. आता तर 'एफएम'चा संचार सर्वत्र झाला आहे. या काळात पॉप संगीताची मागणी पाहता या खासगी 'एफएम' केंद्रांनी पॉप गाणी प्रसारित करण्यास सुरुवात केली.

यानंतर एआयआर दिल्ली, मुंबई, पणजी, बेंगलूरू, मद्रास (आजचे चेन्नई), कोलकाता यांनी खाजगी निर्मात्यांना 'एफएम'च्या कार्यक्रमांची वेळ विकण्याचा निर्णय घेतला. यात टाईम्स, रेडिओ मिड डे, रेडिओस्टार यांचा प्रामुख्याने समावेश होता. महाराष्ट्राचा विचार करता 15 ऑगस्ट 1993 साली मुंबईमध्ये सर्व प्रथम नऊ तासांचे 'एफएम' सुरू झाले. यानंतर महाराष्ट्रभर 'एफएम'ची घोडदौड सुरू झाली. आज राज्यभर याचे जाळे पसरले आहे.

खरं तर एफएम म्हणजे कोणत्याही इलेक्ट्रिक उपकरणच आधार न घेता, आणि कोणत्याही अडथळ्यांना पार करत सुस्पष्ट आवाजात संगीत ऐकवणारे माध्यम. 'एफएम'चा जन्म झाला तेव्हा यावर केवळ इंग्रजी कॉमेंट्रीच ऐकू येत असे. यात काऊंटडाऊन शो, लोकांची आवड, लोकांचे मनोरंजन, लोकांचा सहभाग, विविध स्पर्धा आदींचा समावेश एफएमवरील कार्यक्रमात या काळात करण्यात आला होता.

यानंतर प्रादेशिक भाषेतही या प्रकारचे कार्यक्रम सुरू झाले. महाराष्ट्रात एफएम सुरू झाले, तेव्हाही हिंदी अथवा इंग्रजीतच याचे कार्यक्रम होत. परंतु, कालांतराने खासगी कंपन्यांनी ग्राहकांची मागणी पाहता आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी मराठीत 'एफएम' कॉमेंट्री सुरू केली, पाहता- पाहता त्याला चांगलाच प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली.

'एफएम'च्या या प्रवासात इंग्रजी ते डायरेक्ट मराठी असा प्रवास खूप वेगाने झाला. या प्रवाहात मग सामान्यांची भर पडल्याने मनोरंजनाचे माध्यम असलेले एफएम एक फायदा देणारा व्यवसाय बनला. आज महाराष्ट्रात 'एफएम' मराठीत आहे. यावर 'आरजें'च्या दिलखुलासपणामुळे सामान्यांना आकर्षितत करण्यात त्यांना मोठे यश आले आहे.

आज मोठ्या प्रमाणावर हिंदी गाणी एफएमवर ऐकवली जातात. यामागे दोन कारणे आहेत. 'एफएम' ऐकणार्‍यांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त आहे. मराठी गाणे एखादे ऐकण्यास त्यांचा विरोध नाही. परंतु, आज तरुणांना आकर्षित करणारी मराठी गाणी कमी असल्याने 'एफएम' कंपन्यांना केवळ हिंदी गाण्यांचाच आधार घ्यावा लागत आहे.

जुनी मराठी गाणी अजरामर आहेत. परंतु, तरुणांना ती पचत नाहीत. याच कारणाने मराठीत एफएम आले असले तरी, गाणी मात्र यावर हिंदीतच आहेत. 'आरजें'नी मात्र आता मराठी बाणा जपत मराठी सुर आळवला असला तरी नागरिकांसाठी त्यांनाही काही प्रसंगी मराठी किंवा मग हिंदी बोलणे भाग पडते.

काही मराठी तरुणांची याविषयावर बोलकी प्रतिक्रिया आहे. 'एमसीए' करणारा निनाद म्हणतो, आरजेंनी मराठीतच बोलावे त्यांचे बोलणे झकास आहे, मी जन्मतःच मराठी आहे, पण मला गाणी हिंदी आवडतात, कारण तरुणांना रुचतील अशी मराठी गाणी सध्या येत नाहीत, याच काळातले 'कोंबडी पळाली' सोडले तर, कोणतेच मराठी गाणे तरुणांना आवडलेले नाही. त्यामुळे गाणी ही हिंदीतच हवीत.

ज्योतिका म्हणते काही 'एफएम'वाले मिक्स गाणी लावायला पाहतात, यात एक मराठी, एक हिंदी असे गाणे लावले जाते. परंतु, हे चुकीचे आहे. असे केल्याने संगीत ऐकल्याचा आनंद तर मिळतच नाही. उलट गोंधळच वाढतो. आता हेच पाहा, 'मराठीत अश्विनी ये ना' हे गाणं ऐकल्यावर हिंदीत हिमेशचे 'तंदुरी नाइट्स' हे गाणे ऐकणे म्हणजे कांद्याच्या भाजीवर दूध पिण्यासारखे आहे. मोईन म्हणतो, गाणी जर ढिंगचँग असतील तरच कामातही मन लागते, आणि हे काम फक्त हिंदीच गाणी करू शकतात.

रेडिओ मिर्ची नाशिक केंद्राच्या प्रमुख सई बांदेकरांनीही याविषयावर आपले मत व्यक्त केले आहे. नागरिकांच्या मागण्या आणि त्यांची आवड लक्षात ठेवूनच विषयानुरुप गाणी वाजवली जातात. पहाटे तुम्ही रॉक संगीत लावले तर ते कोणीच ऐकणार नाही, त्यामुळे या वेळी तुम्हाला शांत आणि देवाचीच गाणी लावावी लागतील. यानंतर जसजसा दिवस उजाडत जाईल, तसे वेळेनुसार गाणे लावावे लागते. दुपारी महिला आणि पुरुषांच्या आवडीचा विचार करत तुलनात्मक गाणी लावावी लागतात, तर सायंकाळी कामावरून थकून परतणार्‍यांना पुन्हा नवचैतन्य देण्यासाठी मस्त हिंदी गाणी लावली जातात.

मराठी श्रोतृवर्ग अजूनही एफएमला म्हणावा तितका मिळू शकत नाही. त्यामुळे एखादे मराठी गाणे चालते, परंतु मराठीत कार्यक्रम करायचा झाला तरी त्याला जाहिरातदार मिळत नसल्याने या कार्यक्रमांना सणवार किंवा वेळप्रसंगीच लावावे
लागते.

त्यामुळे मराठीला न दुखावण्यासाठी मराठीत कॉमेंट्री आणि हिंदीत गाणी अशी सांगड घालावी लागते. आज मराठीत आरजे कॉमेंट्री सुरू झाली आहे, पण लवकरच मराठीत, संपूर्ण मराठीत एफएम सुरू होतील यात शंकाच नाही. पण सध्या तरी महाराष्ट्रात मराठी 'एफएम'चा प्रवास झक्कास चालला आहे, हे मात्र खरं.

(लेखिका 'रेडिओ मिर्ची'च्या नाशिक केंद्रात कार्यरत आहेत.)