शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. दसरा
Written By वेबदुनिया|

दसर्‍याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने का देतात ?

सौ. अंजली गाडगीळ

ND
शमीची पाने : दसर्‍याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायूमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. ही तम-रजात्मक असल्याने तिच्यातून प्रक्षेपित होणारे तेजकण हे वातावरणात आगीची निर्मिती करतात. या सूक्ष्म ज्वाळांनी जिवाचा क्षात्रभाव जागृत होण्यास मदत होते. क्षात्रभाव हा आत्मशक्‍तीच्या बळावर जिवाला संस्कारात्मक अशा क्षात्रवृत्तीकडे नेतो. वनवासाला जातांना प्रभू श्रीरामचंद्रांनी शमीच्या झाडाच्या ढोलीत शस्त्रे ठेवली होती. शमीच्या खोडातून व पानांतून उत्पन्न होणार्‍या तेजतत्त्वरूपी धगीमुळे शस्त्रांतील सुप्‍त मारक शक्‍ती अखंड कार्यरत अवस्थेला राहू शकते. या वेळी प्रभू श्रीरामचंद्रांनी जरी शस्त्रे उतरवली, तरी त्यांनी या शस्त्रांच्या माध्यमातून मारक शक्‍ती दुर्जनांवर सोडून शमीपत्रांच्या साहाय्याने संपूर्ण ब्रह्मांडात मारक तत्त्वाचे कार्य केले. दसर्‍याच्या दिवशी श्रीरामाचे तारक, तर हनुमानाचे मारक तत्त्व कार्यरत असल्याने शमीपत्र हे ते ते तत्त्व आकृष्ट करून घेऊन ते वायूमंडलात प्रक्षेपित करण्याचे महत्त्वाचे कार्य करते.

आपट्याची पाने : ही आप व तेज या कणांशी निगडित असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्त्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्यांच्या पानांचे आदान-प्रदान होते, त्या वेळी हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून जिवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जिवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते ते आवश्यक तत्त्व जिवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत आपकणांच्या साहाय्याने झिरपले जाते. या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसर्‍याच्या दिवशी वायूमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानांतून तेजतत्त्व एकमेकांना प्रदान करून ईश्‍वरी राज्य स्थापनेला लागणारा क्षात्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा.