हिंगोलीच्या दसर्याची देशपातळीवर दखल
अंबादास म्याकल
दसरा किंवा विजयादशमी म्हणजे सत्प्रवृत्तीने असत्यावर, इष्ट प्रवृत्तीने दुष्ट प्रवृत्तीवर व सद्गुणांनी दुर्गुणांवर मिळविलेला विजय होय. पौराणिक संदर्भानुसार श्रीरामाने रावणावर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी प्राचीन काळापासून देशभरात विजयादशमी उत्साहाने साजरी केली जाते. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा उत्सव या नावाने साजरा होणार्या या उत्सवात दुष्टाचे निर्दालन करणार्या दुर्गादेवीची उपासना केली जाते. कर्नाटकात म्हैसूर येथे तेथील वाडियार या राजघराण्याने सुरु केलेला हा महोत्सव देशभरात प्रसिध्द आहे. जवळजवळ तितकीच प्रदीर्घ परंपरा हिंगोलीच्या सार्वजनिक दसर्याला लाभलेली आहे.
मी जिल्हा माहिती आधिकारी हिंगोली या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्याची माहिती घेत असतानाच या दसर्याबद्दलची माहिती कळली. उत्सूकता होतीच. या निमित्ताने या विषयाशी संबंध अधिक माहिती घेत असतानाच अनेक वेगवेगळे पैलू समोर आले. देशात दुसर्या क्रमांकावर असलेल्या या दसर्याचा अनुभवही या निमित्ताने घेता आला. १५० वर्षाची परंपरा असलेल्या हिंगोली व म्हैसुरच्या दसरा महोत्सवातील मुख्य फरक म्हणजे म्हैसूरच्या दसर्याला राजाश्रय लाभला, तर हिंगोलीच्या दसर्याला लोकाश्रय. हा लोकाश्रय इतका उदार आहे की, म्हैसूरच्या खालोखाल क्रमांक दोनचा दसरा म्हणून हिंगोलीच्या दसर्याची देशपातळीवर दखल घेतली जाते.
हिंगोली हे विदर्भ व मराठवाडय़ाच्या सीमेवर, कयाधू नदीच्या काठावर बसलेले एक शहर आहे. वंजारगढी म्हणून या शहराची एकेकाळी ख्याती होती. संत नामदेव महाराज, विठोबा खेचर, संत जनाबाई यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी खाकीबाबा मठ, दत्तमंदिर, गोपाललाल मंदिर, खटकाळी हनुमान आदी देवस्थानांमुळे या शहराला धार्मिक चेहरा प्राप्त झाला आहे.
एकेकाळी येथे कापसाची मोठी बाजारपेठ असल्याने व्यापार्यांचे शहर म्हणून शहराची ओळख होती. पूर्वी मोगल साम्राज्यात मोडणारे हे शहर होते. त्यानंतर हिंगोलीचा समावेश निजाम राज्यात झाला. हिंगोली शहर हे वर्हाड प्रांत व निजामाच्या उर्वरित राज्यांच्या सीमेवर असल्याने ब्रिटिशांनी हिंगोलीत स्वत:च्या लष्कराची छावणी उभारली. या छावणीत ब्रिटिशांची जी फौज होती त्यात प्रामुख्याने उत्तर भारतीय नागरिकांची संख्या अधिक होती.
उत्तर भारतीयांच्या मते, कयाधू नदीच्या काठावरील खाकीबाबा मठ म्हणजे आखाडा परंपरेतील मठ होय. या मठाचे संस्थापक महंत खाकीबाबा उत्तरेतील असल्याने ब्रिटिश छावणीत आलेल्या उत्तर भारतीय सैनिकांचा हा मठ श्रध्दास्थान बनले. संत मानदास महाराज, संत शिवरीदास महाराज ही ऋषितुल्य मंडळी या मठाचे मठाधिपती असल्याने त्यांच्या विषयीही छावणीतील सैनिकांच्या मनात आदराचे स्थान होते. या संत मंडळींबद्दल स्थानिक लोकांच्या अंत:करणातही आदराचे स्थान निर्माण झाले होते.
उत्तरेतून हिंगोलीत आलेली व ब्रिटिश छावणीत वास्तव्य करणारी मंडळी ही सैनिकी पेशाची असल्याने त्यांच्या पेशाच्या परंपरेनुसार ती दसर्याच्या दिवशी त्यांच्या शस्त्रास्त्रांची पूजा करीत असत. खाकीबाबा मठ हा आखाडा परंपरेतील असल्याने तेथेही शस्त्रास्त्रे असत, तसेच त्या परिसरात राम मंदिर असल्याने दसर्याच्या दिवशीही ही मंडळी खाकीबाबा मठात जाऊ लागली. त्यातूनच मठाच्या आवारात रावण दहनाची परंपरा दसर्याच्या दिवशी सुरु झाली.
ही परंपरा सैनिकांपुरती मर्यादित न राहता हिंगोलीकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. या उत्सवाची व्याप्ती वाढू लागताच मठाची जागा अपुरी पडू लागली आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या सध्याच्या रामलिला मैदानावर या महोत्सवाचे आयोजन होऊ लागले. ब्रिटिशांनी निजामाला त्याचा वर्हाड प्रांत परत केल्याने हिंगोलीतील ब्रिटिश सैनिक छावणीचे अस्तित्वही संपुष्टात आले. तेव्हा हिंगोलीच्या नागरिकांनी या महोत्सवाने यजमानपद मोठय़ा आनंदाने स्वीकारले व १८५५ पासून म्हणजे १५० वर्षांची परंपरा लाभलेल्या या महोत्सवाचे अभिमानाने जतन केले.
भाद्रपद पोर्णिमेला बांसाफोड या कार्यक्रमाव्दारे सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. घटस्थापना ते रामराज्याभिषेक असा १२ ते १३ दिवस चालणारा हा महोत्सव म्हणजे हिंगोलीकरांच्या एकात्मतेचे उत्कृष्ट उदाहरण होय. या महोत्सवाच्या निमित्ताने अनेक क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक व बौध्दिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही वर्षांपूवीपर्यंत आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्येप्रदेश आदी प्रांतातून हॉकी, फुटबॉल, टेबल टेनिस आदी क्रीडा प्रकारांत भाग घेण्यासाठी खेळाडू येत असत. अलिकडच्या काळात टेबल टेनिस, बॅडमिंटन, कब्बडी, कुस्ती आदी मोजक्या क्रीडा प्रकारांचेच आयोजन केले जाते.
१९७० पासून या महोत्सवाच्या निमित्ताने प्रदर्शन आयोजनाला सुरुवात झाली. आता सार्वजनिक दसरा महोत्सव समिती या प्रदर्शनाचे आयोजन करते. या सार्वजनिक दसरा महोत्सव व समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी श्रीमती शैला रॉय या आहेत. या प्रदर्शनात विविध वस्तुंचे आकर्षक स्टॉल, आकाश पाळणे, मौत का कुवॉ, लहान मुलांसाठी रेल्वे इत्यादींचा समावेश आहे.
रामलीला हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. उत्तर भारत, मध्यप्रदेशातील व्यावसायिक कलावंत रामलीला सादर करतात. हजारो भाविक रामलीलेचा आस्वाद घेतात. विजयादशमीला रावण दहन होते. त्या दिवशी करण्यात येणारी आतषबाजी नेत्रदीपक असते. हा सोहळा डोळ्यांत साठवून ठेवावा असाच असतो.