1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
  4. Navratri Special Dosa and Wet Coconut Chutney Recipe

नवरात्री विशेष उपवासाचा जाळीदार डोसा आणि ओल्या नारळाची चटणी पाककृती

उपवासाला साबुदाणा खिचडी किंवा वडे खाऊन कंटाळा आला असेल, तर भगर (वरई) आणि साबुदाण्यापासून बनणारा हा जाळीदार, कुरकुरीत डोसा आणि सोबत खोबऱ्याची चविष्ट चटणी हा उत्तम पर्याय आहे.
 
ओल्या नारळाची उपवासाची चटणी
साहित्य:
ओला नारळ (खोवलेला): १ कप
भाजलेले शेंगदाणे (साले काढलेले): २ मोठे चमचे
हिरव्या मिरच्या: २ (चवीनुसार)
जिरे: ½ लहान चमचा
सेंधव मीठ (उपवासाचे मीठ): चवीनुसार
दही: १ ते २ मोठे चमचे (ऐच्छिक)
पाणी: वाटण्यासाठी थोडेसे
फोडणीसाठी (ऐच्छिक): १ लहान चमचा साजूक तूप, ½ लहान चमचा जिरे व कढीपत्ता
 
कृती:
मिक्सरच्या भांड्यात खोवलेला नारळ, शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरे, सेंधव मीठ आणि दही एकत्र करा. थोडे थोडे पाणी घालून चटणी छान बारीक वाटून घ्या. हवे असल्यास एका छोट्या कढईत तूप गरम करून जिरेची फोडणी या चटणीवर द्या.
 
उपवासाचा जाळीदार डोसा
साहित्य:
भगर (वरई): १ कप
साबुदाणा: ¼ कप
दही: ¼ कप
हिरवी मिरची: १ ते २ (बारीक वाटलेली)
सेंधव मीठ: चवीनुसार
पाणी: गरजेनुसार (सुमारे १.५ ते २ कप)
तूप किंवा तेल: डोसा शेकण्यासाठी
कृती:
भगर आणि साबुदाणा स्वच्छ धुऊन २ ते ३ तास पुरेशा पाण्यात भिजत ठेवा. (घाई असल्यास कोमट पाण्यात १ तास भिजवले तरी चालते). भिजलेली भगर आणि साबुदाण्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका. मिक्सरच्या भांड्यात भगर, साबुदाणा, दही आणि हिरवी मिरची घालून बारीक पेस्ट तयार करा.वाटलेले पीठ एका भांड्यात काढून घ्या. त्यात चवीनुसार सेंधव मीठ आणि १ ते दीड कप पाणी घाला. डोशाचे पीठ रव्यांच्या डोशासारखे किंवा ताकासारखे पातळ असावे. (पीठ जितके पातळ असेल तितकी डोशाला जाळी छान पडते). नॉन-स्टिक तवा चांगला गरम करून घ्या. त्यावर थोडे तूप किंवा तेल लावा. आता हे पातळ पीठ ढवळून तव्याच्या कडेने मध्यभागाकडे ओता (रवा डोसा टाकतो तसे). तव्यावर आपोआप सुंदर जाळी पडेल. डोशाच्या कडेने थोडे तूप सोडा. मंद ते मध्यम आचेवर डोसा खालील बाजूने सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत २-३ मिनिटे शेकू द्या. डोसा छान कुरकुरीत झाला की घडी घालून गरमागरम चटणीसोबत सर्व्ह करा. प्रत्येक डोसा तव्यावर टाकण्यापूर्वी पीठ चमच्याने नीट ढवळून घ्या, कारण भगर तळाशी जाऊन बसते. डोसा घालताना तवा चांगला गरम असावा, तरच छान जाळी पडते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
पुढील लेख
मासिक पाळीत वेदना आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी या सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर