बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By

चित्रपट परीक्षण : रेड- वर्दीशिवाय दरारा

सिंघम, गंगाजल, जमीन अशा अनेक चित्रपटांत खाकी वर्दीचा दरारा दाखवणारा अभिनेता अजय देवगण रेड चित्रपटात मात्र अंगावर वर्दी नसतानाही आपला खाक्या दाखवताना दिसत आहे. 'हीरो हमेशा युनिफॉर्म में नही आते!' अशा टॅगलाइनने अजयने 'रेड'मधील 'हिरो' साकारला आहे. आयकर विभागाच्या धाडींवर बेतलेला हा जगातला पहिलाच चित्रपट असल्याचाही दावा करण्यात येत आहे. अर्थात अ‍ॅक्शनपटात 'बाप' असलेल्या अजयने साकारलेली तगडी भूमिका हे या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे. 1981 मध्ये लखनऊमध्ये आयकर विभागाने 'हाय प्रोफाइल' करबुडव्यांवर धाडी टाकून खळबळ उडवून दिली होती. देशभर गाजलेल्या या कारवाईवर हा चित्रपट बेतलेला आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. भारतीय महसूल सेवेतील (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस) निर्भीड अधिकारी अमय पटनायक यांनी आयकर अधिकारी म्हणून काम करताना कशाप्रकारे बड्या धेंडांना सळो की पळो करून सोडले, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. अमय पटनायक (अजय देवगण) आपल्या पथकासह खासदार आणि राजकीय नेता रामेश्वर सिंह ऊर्फ राजाजी सिंहच्या (सौरभ शुक्ला) ठिकाणांवर छापा टाकतो. स्वतःचा बचाव करण्यासाठी राजाजी पूर्ण ताकद लावतो, दबाव आणतो, मात्र अमय त्यापुढे झुकत नाही. एक कर्तव्यदक्ष अधिकारी विरुद्ध करचोरी करणारा राजाजी यांच्यातील या लढाईत कोणाचा विजय होतो, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला थिएटर गाठावे लागेल. आपल्या वाट्याला आलेली व्यक्तिरेखा आपल्या खास शैलीत जिवंत करणारा अभिनेता म्हणजे अजय देवगण. तो ती तितक्याच ताकदीने उभी करतो. राजाजीच्या व्यक्तीरेखेसाठी तर सौरभ शुक्लाहून दुसरा योग्य कलाकार असूच शकला नसता. इलियाना डीक्रूझनेदेखील आपल्या छोट्याशा व्यक्तिरेखेनुसार चांगला अभिनय केला आहे. तर, राजाजीच्या 'दादी'नेही कालीचा अभिनय केला आहे. राजकुार  गुप्तासोबत या चित्रपटाची कथा आणि संवाद लिहिणारे रितेश शहा यांनी कमाल केली आहे. संवाद प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारे आहेत. मध्यंतरापर्यंत पकड घेतलेला चित्रपट उत्तरार्धातही तेवढ्याच ताकदीने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.