गजानन महाराज काकड आरती
सद्गुरुराया गजानना तव काकडा करितो ॥ आतां ॥
उद्धारास्तव बहू आदरानें चरणद्वया धरितों ॥धृ0॥
अज्ञानाची निशा मावळो कृपाकटाक्षांनी ।
आशा सटवी टी टी करूनी नाचविते अवनी ॥१॥
त्या सटवीला आहे आसरा मायामोहाचा ।
त्याचा टिकाव कधीं न लागे तुज पुढती साचा ॥२॥
षड्रिपु बेटे खट्याळ मोठे करिती निर्माण ।
भ्रमभोंवरा जो त्यामध्यें देतो आम्हांस टाकुन ॥३॥
त्या भोंवर्याला तरुन जाया पाय तुझे नौका ।
त्या नावेमध्यें भक्त बैसती तयास टाकुं नका ॥४॥
दासगणूची हीच विनंती तुज वारंवार ।
सुखे करावें भक्ता अपुल्या लोटुं नका दूर ॥५॥