उठा उठा हो सद्गुरुराया सरली ती राती॥
दयाळा उष:कालचा वाहे वारा कुक्कुट ओरडती॥धृ॥
सूर्य सारथी अरुणा पाहून प्राची निजचित्ती॥
गेला होऊन अति आनंदित तें मी वानुं किती॥१॥
उलुक पिंगळे झाले भयभित पाहून अरुणाला।
प्राचि प्रांत तो सद्गुरुराया लालिलाल झाला॥२॥
चक्रवाक चंडोल पक्षि ते प्रभात कालाला।
सूर्या बघण्या आतुर होऊनि घालिती घिरट्याला॥३॥
तेवीं बघण्या तुला पातले भक्त तुझे द्वारी।
दर्शन देउनि तयास तारा गणु म्हणे संसारी॥४॥
भूपाळी
दयाघना श्रीस्वामीसमर्था गजानना गुरुवरा।
कृपाकटाक्षें त्रिताप वारुन रक्षण शिशुचें करा।।धृ॥
अज्ञानाची रात्र भयंकर चहूंकडे पसरली।
विषयवासना सटवी टिटवी टी टी करु लागली।।१ ।।
दिवाभीत हा मत्सर पिंगळा अहंकार साजिरा ।
मनवृक्षावर बसुन अशुभसा काढुं लागला स्वरा ॥ २ ॥
नानाविध संकटे चांदण्या चमकाया लागल्या।
त्यायोगानें सत्पथ वाटा लोपुनी गेल्या भल्या ॥३।।
अरुणोदय तो तुझ्या कृपेचा होऊं दे लवकर ।
चित्त प्राचिला उदय पावुं दे बोधाचा भास्कर ॥४।।
दशेंद्रिये हीं दहा दिशा त्या उजळतील त्यामुळें।
सत्पथ वाटा दिसूं लागुनी हितानहित तें कळें।।५ ।।
तुझ्या कृपेचा अगाध महिमा ज्ञाते जन सांगती ।
म्हणुन तुला मी दीनदयाळा येतो काकूळती ।।६ ।।
अंताचा ना मुळीच बघवे वरदकर धरा शिरीं ।
पापताप हें दु:खयातना दासगणूच्या हरी ।।७ ।।
भूपाळी
मुखमार्जन तें तुम्हा कराया उष्णोदक साचें।
गंगा, यमुना, गोदा, तुंगा, रेवा, कृष्णेचें।।धृ॥
दंत-धावना लवण, बसा या चौरंगावरती।
उपहारसी शिरापुरी ही सेवा गुरुमूर्ती ।।१ ।।
जाई, मालती, बकुल, शेवंती, कुंद मोगर्याचा।
हार गुंफीला रेशिमतंतू कल्पुन प्रेमाचा ॥ २ ॥
अष्टगंधी अर्गजा हिना घ्या कफनि शालजोडी।
दासगणू म्हणे तव भक्तांचे क्लेशपाश तोडी ॥३।।