महालक्ष्मी : एक दृष्टिक्षेप
स्वातंत्र्पूर्व काळात एका खेडय़ात घडलेली ही सत्य घटना. गौरी-गणपतीचे उत्साहाचे दिवस होते. गणपती आले होते आणि घरोघरी ग्रामीण स्त्रियांची गौरी आणण्याची लगबग सुरू होती. जानकीकाकूही उत्साहाने कामाला लागल्या. त्यांनी महालक्ष्मी (गौरी) साठी लाडू, करंज्या, अनारसे, चकली इत्यादी पदार्थ हौसेने बनवले होते. त्यांचे सोवळे-ओवळे ही फारच कडक होते. महालक्ष्मीसाठी केलेल्या फराळाचे पदार्थ महालक्ष्मी सण पार पडल्याशिवाय कोणीही खायचे नाही, असा त्यांचा दंडकच होता. विशेष म्हणजे तंच आज्ञाबाहेर जाण्याची घरात कुणाची प्राज्ञा नव्हती.
झाले! जानकीकाकूंनी गौरी आणल्या. त्याकाळात खेडय़ातील पद्धतीप्रमाणे कणगीमध्ये सगळेच लाडू-करंज्या इत्यादी पदार्थ भरून टाकले आणि त्या कणगीवर गौरीही बसवल्या. गौरींना सुंदर साडय़ा घालून दागिने घातले. सारे काही मनासारखे झालच्याचे समाधानाने त्यांनी सुस्कारा सोडला. त्याकाळी जानकीकाकूंना चांगली सहा-सात मुले-मुली होती. ती सर्व ‘लाडू खायला दे’ असा सारखा हट्ट करत होती. पण या बाईचे मन काही द्रवले नाही. शिवाय गौरीने खाण्याच्या (?) आधी मुलांनी लाडू खाल्ले तर ती रागावेल, आणि घरात काहीतरी वाईट होईल ही अज्ञानमूलक भीती होतीच.
सारे काही झाल्यावर जानकी काकू शेजारी-पाजारी हळदी-कुंकवासाठी गेल्या. आई घराबाहेर पडायची मुले वाटच बघत असावीत. मुलांनी कणगीवरील लक्ष्मीचा मुखवटा बाजूला काढला आणि भराभर कणगीतील लाडू-करंज्या काढून घेतल्या. तेवढय़ात ‘आई आली’ कोणीतरी एकाने सांगितले. मुलांची धांदल उडाली. त्यांनी गडबडीने लक्ष्मीचा मुखवटा कणगीवर ठेवला तो पलीकडे तोंड करून. आणि मुले पसारही झाली.इकडे काकू आत य ऊन पाहतात तो लक्ष्मीने तोंड फिरवलेले. ते पाहून त्या घाबरून बेशुद्धच पडल्या. शेजारी-पाजारी जमा झाले. मुलांना हे कळताच मुले घरात येऊन रडू लागली. आई, उठ आम्हीच लाडू घेऊन मुखवटा ठेवला, असे म्हटलवर थोडय़ा वेळाने काकू एकदाच शुद्धीवर आल्या. पण आजही आपण शुध्दीवर आलोत का? याचा विचार करावा लागेल. ही घटना ग्रामीण भागात जुन्या काळात घडली असली तरी आजही ग्रामीण आणि शहरी भागातही असंख्य स्त्रिया महालक्ष्मीचा सण म्हणजे फार कडक, थोडे काही चुकले तर आपले वाईट होईल, या भीतीपोटी वागत असतात. लहान ङ्कुलांनाही लाडू न देणारी जानकीकाकू आणि आजच्या स्त्रियांमध्ये फारसा फरक पडलेला नाही.