गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By

श्री गणेशगीता

ganesh geeta
(ओवी)
 
श्रीगजाननाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥
 
श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीमातापितृ० ॥
 
व्यास म्हणे ब्रह्मदेवा । जनसमूह पावन व्हावा ।
 
ऐसा उपाय सांगावा । विज्ञति हे परिसावी ॥१॥
 
विधी म्हणे ऐकें व्यासा । वरेण्य राजा भक्त ऐसा ।
 
दुजा न दिसे त्रिजगीं सा । गजाननासी तेधवां ॥२॥
 
पूर्वापर संक्षिप्त इतिहास । श्रवण करीं स्थिर मानस ।
 
इष्टफल साधावयास । सुलभ असे सर्वांसी ॥३॥
 
पूर्वीं महिष्मती पुण्यनगर । तेथें वरेण्य नृपवर ।
 
पुष्पिता राणी पतितत्पर । असे सुंदर रंभेपरी ॥४॥
 
संतान नाहीं तयांसी । शिवें जाणून मानसीं ।
 
निद्रित असतां राणी निशीं । कुशीं ठेववी स्वपुत्र ॥५॥
 
गजापरी नासीक कर्ण । चतुर हस्त इभवर्ण ।
 
विचित्र बालक परिपूर्ण । म्हणून त्यजिलें सरित्तीरीं ॥६॥
 
पराशर जातां सरित्तीरीं । बालक पाहून घेतलें करीं ।
 
आणून दिधलें कांते सत्वरीं । संतान लाधलें म्हणोनी ॥७॥
 
आनंदें लावी स्तनीं कुमारा । पय वाहे बत्तीस धारा ।
 
प्राशी गजानन सरसरा । तृप्त झाला निजांतरीं ॥८॥
 
पराशर पत्‍नी उभयतां । लालनपालन करिती सूता ॥
 
पुत्रस्नेहें जाणोन तत्त्वतां । सांभाळिती आनंदें ॥९॥
 
कांहीं काल तेथें क्रमितां । बालक बोले उभयतां ।
 
आज्ञा द्यावी कार्याकरितां । शुभाशीर्वादपूर्वक ॥१०॥
 
पहिलें कार्य सिंधूरहनन । दुजें वरेण्यदर्शन ।
 
दोनी कार्यें करोन । धरामर तोषवी ॥११॥
 
वरेण्यास अभय देऊन । उपदेश तया करुन ।
 
उद्धारुन सायुज्य सदन । द्यावें तया त्वरित पैं ॥१२॥
 
वरेणोपदेश पावन । गणेश गीता तया नाम ।
 
विख्यात त्रिजगीं होऊन । मुक्त करी साधकां ॥१३॥
 
वरेण्य गणेश संवादास । सविस्तर कथी कव्यासांस ।
 
त्यास तें कथी सूतास । गणेशपुराणीं प्रख्यात ॥१४॥
 
सूत कथिती शौनकादिकां । गणेशपुराणींचे भाग ऐका ॥
 
सविस्तृत करुन सकळिकां । श्रवणपठण याअर्थी ॥१५॥
 
गणेशगीतेचें अध्ययन । करुन स्वयें अध्यापन ।
 
गणेशभजनीं लावावें मन । कार्य योजिलें स्वयंस्फूर्ती ॥१६॥
 
गणेशपुराणीं गीतें वाचून । तें खंड दिसे मजलागुन ।
 
केलें असे पद्यमय कथन । अखंड करावें हा अर्थ ॥१७॥
 
महान्‌ महान्‌ कवीश्वर । त्यांत काय हा पामर ।
 
वर्णील कायसा चतुर । तें सज्जनीं जाणावें ॥१८॥
 
गजाननभक्ति आवडी । धरुन काव्यें करी कोडी ।
 
वेडींवाकुडीं अशीं रुपडीं । लवड सवडी रचितसे ॥१९॥
 
सज्जन चतुर पंडित । हंसक्षीरन्यायें सेवोत ।
 
प्रार्थीतसे तयांप्रत । नमन करोन यथामति ॥२०॥
 
बलभीम नामें पायपोस । गजाननचरणींचा खास ।
 
काव्यसुमनें पूजनास । भाषोद्यानीं आणीतसे ॥२१॥