आधी वंदु तुज मोरया
- पूज्य पांडूरंगशास्त्री आठवले
भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी सर्वत्र 'गणपती बाप्पा मोरया' चा जयघोष कानी पडतो. मोरया म्हणजे नमस्कार. अर्थात गणपती बाप्पा मोरयाचा अर्थ गणपतीस दंडवत असा होतो. गणेशाचा मोरेश्वर नावाचा भक्त होऊन गेला. त्यावरून हा मोरया शब्द रूढ झाला असावा. '
मद् भक्तांनाच ये भक्ता: ते प्रियतमा मता:।।
अर्थात माझ्या भक्तांचे भक्त मला अधिक प्रिय आहे. परमेश्वरानेच स्वत: असे म्हटले आहे. त्यामुळेच मोरया हे नाव गणपती सोबत जोडण्यात आले असावे. गणेश चतुर्थी, गणरायाची चतुर्थ अवस्था तुर्यावस्थेपर्यंतची सिद्धीच सूचित करते. चंद्र मनाचा परमेश्वर आहे. 'चंद्रमा मनैसो जात.। चंद्र कलेकलेने वाढतो व घटतो. मनाचेही तसेच आहे. तुर्यावस्थेपर्यंत पोहचण्याची इच्छा ठेवणार्या मनुष्याचे मन चंचलतेचे दास होता कामा नये. मनाच्या आधीन झाल्यास तो अध:पतनाचा मार्ग समजावा.
कोणत्याही आईस आपल्या मुलाचे नको असेच गणपतीचे रूप आहे. मात्र तरीही आपल्या ऋषीच्या दृष्टीने गणपतीचे महत्व अगाध आहे. कोणत्याही शुभकामास त्याच्या पूजनानेच सुरूवात होते. प्रसंग कोणताही असो, लग्नकार्य, लक्ष्मीपूजन, भूमीपूजन. मंदिरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा या सर्वांत गणपतीचे पूजन आवश्यक आहे. गणपतीची मूर्ती असायलाच पाहिजे असे नाही, सुपारीचा गणपती केला तरी चालेल. मात्र, प्रथम पूजन होणार ते गणपतीचेच. पुराणकथेनुसार गणपतीचे डोके उडवल्यानंतर पार्वतीस प्रसन्न करण्यासाठी भगवान शिवसंकराने आपल्या एका गणास चांगले शिर शोधण्यास पाठवले. तो हत्तीचे डोके घेऊन आला. गणपतीच्या धडावर ते ठेवल्यावर तो जिवंत झाला. अशाप्रकारे गणपतीचा गजानन झाला.