गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Modified: शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (10:34 IST)

Jyeshtha Gauri Puja 2021 ज्येष्ठागौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन शुभ मुहूर्त

Jyeshtha Gauri Puja 2021
पुराणात सांगितल्याप्रमाणे आणि परंपरेनुसार प्रत्येक कार्यांच्या सुरुवातीला सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते. सर्वप्रथम गणेशाची पूजा केल्यानंतरच इतर देव -देवतांची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना केल्यानंतर मन वाट बघत असतं गौरीच्या आगमनाचे. दहा दिवसांच्या गणेशोत्सवात गौरीचीही पूजा केली जाते. यंदा 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून षष्ठी म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाईल. यानंतर सप्तमीला पूजन तर अष्टमीच्या दिवशी म्हणजेच 14 सप्टेंबरला गौर विसर्जन केले जाईल.
 
ज्येष्ठागौरी आवाहन शुभ मुहूर्त
अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यात गौरीची पूजा करतात. तीन दिवस चालणाऱ्या या पूजेची सुरुवात भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीपासून होते. या दिवशी गौरीचं आवाहन केलं जातं. दुसऱ्या दिवशी पूजन करुन नैवेद्य दाखवलं जातं तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच अष्टमीला विसर्जन होते. या वर्षी गौरीचे आगमन 12 सप्टेंबर रोजी आहे. गौरीची स्थापना सकाळी 9.49 मिनिटानंतर कधीही करता येऊ शकते. तर 14 सप्टेंबर रोजी अष्टमीच्या दिवशी गौरी विसर्जनासाठी सकाळी 7.04 मिनिटानंतर मुहूर्त आहे.
 
गौरीपूजन यास महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात.
 
एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली.त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले.महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.