गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Modified: शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (22:42 IST)

ज्येष्ठा गौरीचे व्रत आणि फलप्राप्ती

gauri
ज्येष्ठ गौरी पूजा देवी गौरी म्हणजे पार्वतीला समर्पित आहे. गणेश चतुर्थी दरम्यान, हा सण भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या  सप्तमीला साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या तीन दिवसांनी ज्येष्ठ गौरी पूजनाची स्थापना केली जाते, याला ज्येष्ठ गौरी आवाहन असे म्हणतात. असुरांच्या जाचाला कंटाळून सर्व स्त्रिया देवी पार्वतीच्या धारणी गेल्या आणि त्यांनी त्या असुराचा संहार करण्यासाठी त्यांना आळविले.तेव्हा गौरीने स्त्रियांची हाक ऐकून भाद्रपदातील शुक्ल अष्टमीला असुरांचा संहार केला .आपले सौभाग्य अखंड राहण्यासाठी सुवासिनी स्त्रिया हे तीन दिवसांचे ज्येष्ठा गौरी व्रत विधी करतात. 

प्रत्येक घरोघरी त्यांच्या कुळाच्या परंपरा आणि पद्धतीनुसार हे ज्येष्ठा गौरी व्रत करतात. काही घरात देवीच्या धातूच्या मुर्त्या असतात, तर काही घरात मातीच्या प्रतिमा, तर काही घरात कागदावर देवीचा मुखवटा काढून त्याची पूजा करतात. तर काही घरात पाच खडे ठेऊन देवीची पूजा करतात. 

देवीच्या प्रतिमेला साडी नेसवून त्याला वरून मुखवटा घालून देवीला सौभाग्यालंकार अर्पण केले जाते. त्यानंतर घरात हळदी -कुंकवाचे पाऊले काढतात आणि मुख्य प्रवेश दारापासून देवीच्या मुखवट्याना घरात औक्षण करून आणतात. गौरी आली सोन्याच्या पाऊली असे म्हणत तिला घरात आणतात आणि ते मुखवटे देवीच्या संचावर बसवतात. देवीची स्थापना केल्यावर नंतर औक्षण करून आरती करतात .

परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचे पाय दुध आणि कोमट पाण्याने धुतले जातात आणि त्यांचा पायावर कुंकाने स्वस्तिक काढलं जातं. घरात येताना पावलांवर पाऊल ठेवत गौरीचे आगमन करतात. शंख वाजवून गौरीचं घरात आगमन केलं जातं. गौरी स्थापना करण्यापूर्वी त्यानं घरातील देवघरासमोर ठेवून घरात ऐश्वर्य नांदो आणि वैभव निर्माण होवो समृध्दी येवो अशी प्रार्थना केली जाते. 
 

दुसऱ्या दिवशी देवीआईला पुरणाचा नैवेद्य देतात महापूजनात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात.

माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबिरी,16 चटण्या,16 पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची 16 दिव्यांनी आरती करतात.

 देवीला दोरक काही ठिकाणी याला पोते देखील म्हणतात, ते घालतात. हे दोरक सुताचे सोळा पदर घेऊन त्याला हळदीत भिजवून रंगवून घालतात. सुवासिनीला जेवण्यासाठी बोलावतात. असे म्हणतात की त्या सुवासिनीच्या रूपात खुद्द देवीआई प्रसाद ग्रहण करते. नंतर सुवासिनींची ओटी खळ नारळाने भरतात.तिला वाण देतात. नंतर संध्याकाळी हळदीकुंकू समारंभ करून सुवासिनींना बोलावतात.आणि प्रसाद देतात. अनेक ठिकाणी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.
 
तिसऱ्या दिवशी म्हणजे गौरी विसर्जनाच्या दिवशी देवीआई ला सौभाग्य अखंड राहावे, आणि मुलं बाळ आणि कुटुंबातील सर्व सदस्य खुशाल आणि आनंदी राहावे आणि आईचा आशीर्वाद नेहमी या घरावर राहावे अशी मनोमनी प्रार्थना केली जाते. नंतर ज्येष्ठा विसर्जन करण्यासाठी देवी आईचे नदीत किंवा विहिरीत विसर्जन करतात आणि येताना रिते हस्ते येत नाही म्हणून नदीच्या जवळची वाळू माती किंवा माती घरी आणून देवीला स्थापित केलेल्या  ठिकाणी ठेवतात. विसर्जन करण्या पूर्वी देवीच्या गळ्यात घातलेले दोरक काढून घरातील सुवासिनी ते देवीचा प्रसाद म्हणून स्वतःच्या गळ्यात घालतात. हा दोरकाचा प्रसाद ग्रहण केल्याने घरात सौख्य आणि ऐश्वर्य नांदते, हा शुभफळ देणारा दोरक असतो. नंतर हे दोरक आपल्या तिजोरीमध्ये किंवा लॉकर मध्ये ठेवतात जेणे करून घरात नेहमी
लक्ष्मीचा वास्तव्य व्हावा. 
 
व्रत आणि फलप्राप्ती-
हे व्रत केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. 
घरात सुख आणि आनंदाचा भरभराट होते.
घरात लक्ष्मी आणि ऐश्वर्य प्राप्ती होते. 
घरात नेहमी देवी आईचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत भरभराट होऊन देवी आईचा आशीर्वाद मिळतो.