मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (13:22 IST)

खड्यांच्या गौरी

puja
अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात. गौरी पूजनाची वेगवेगळी पद्धत असून काही घरांमध्ये विशेषत: कोकणस्थ घरांमध्ये किंवा ज्यांचे मूळ कोकणातील आहे त्यांच्या घरात  खड्यांच्या रूपाने साक्षात देवीची पूजा केली जाते.
 
या पूजेसाठी नदी किंवा विहिरीच्या म्हणजे जलस्त्रोताच्या जवळील सात किंवा अकारा खडे कुमारीकांकडून किंवा सवाष्णींकडून गोळा केले जातात. त्यांना स्वच्छ धुऊन त्यांची हळद, कुंकु, फुले वाहून तिथेच पूजा केली जाते. त्यानंतर ताम्हणात ठेवून गौराई घेऊन घराकडे येतात. यावेळी रस्त्यात मागे वळून पहायचे नसते तसेच काही बोलायचे देखील नाही हा नियम पाळला जातो. घरात लक्ष्मीच्या पावलांचे रांगोळीने ठसे काढले जातात. घरी आल्यावर घराच्या अंगणात तोंडात चूळ भरली जाते तर आल्यानंतर घरातील कर्ती स्त्री दारातच गौराई जिचा हातात असते तिचे पाय दूध व पाण्याने धुऊन त्यांची पूजा करते. 
 
गौरींचे स्वागत हे वाजत गाजतच केले जातात. घंटा, शंख वाजवत गौराई घेऊन पावलावरुन चालत गौरींना घरभर फिरवले जाते. त्यानंतर घरातील देवघराजवळ चांदीच्या पात्रात ठेवून त्यांची पूजा केली जाते. गौरी स्थापन करताना घरातील सर्वांना उदंड आयुष्य मिळो, घरात कायम सुख- समृद्धी आणि ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना केली जाते. यावेळी देवीची आरती केली जाते. त्यांना कापसाचे वस्त्र वाहतात. 
 
दुसर्‍या दिवशी पूजन करतात. माता गौरीला हळद- कुंकू वाहून अक्षता आणि फूलं वाहतात. धूप, दीप आणि अगरबत्ती दाखवतात आणि पारंपरिक पदार्थांनुसार गौराई नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी सवाष्णीला जेवायला बोलावलं जातं. तिची ओटी भरली जाते.
 
गौरी पूजनादरम्यान माता गौरीचा जप करावा. देवीची कथा करावी आणि गौरीची आरती करावी.
 
या गौरींना पहिल्या दिवशी नेहमीच्या जेवणाचाच नैवेद्य दाखवला जातो. दुस-या दिवशी त्यांना तांदळाचे पीठ आणि नारळाचे दूध यापासून बनविलेल्या घावन घाटल्याचा 
नैवेद्य दाखवला जातो, तर तिस-या दिवशी म्हणजे विसर्जनाला दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो.
 
गौरी पूजनाने घरात आनंदाचे वातावरण निर्मित होतं आणि देवी आई सुख-समृद्धीचा आशीर्वाद देते.