गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Updated : शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (13:03 IST)

ज्येष्ठा गौरी पूजन 2022 पूजा विधी आणि आरती

Gauri Pujan 2022
अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात. तीन दिवस साजरा केल्या जाणार्‍या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. दुसर्‍या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसर्‍या दिवशी विसर्जन करतात.
 
पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.  याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हटले जाते. 
 
ज्येष्ठागौरी पूजन तिथी आणि मुहूर्त
यंदा 3 सप्टेंबर शनिवारी गौराईचं आवाहन तर 4 सप्टेंबर गौरी पूजन केले जाणार आहे. तर 5 सप्टेंबरला गौरी विसर्जन होणार आहे.
पंचांगानुसार ज्येष्ठागौरी पूजन तिथी आणि मुहूर्त
 
ज्येष्ठा गौरी आवाहन तारीख: 3 सप्टेंबर, शनिवार
वेळ: रात्री 10 वाजून 56 मिनिटांपर्यंत
 
ज्येष्ठा गौरी पूजन तारीख: 4 सप्टेंबर, रविवार
 
ज्येष्ठा गौरी विसर्जन तारीख: 5 सप्टेंबर, सोमवार
वेळ: रात्री 08:05 पर्यंत
 
पूजा करण्याची पद्धत -
हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्‍या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात. 
 
या उत्सवाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ करतात. रांगोळीने पावळे काढून शुभ मुहूर्तावर थाटामाटात गौरीला घरात आणतात. आणि आसनावर विराजित करतात. ज्येष्ठा गौरींसाठी सुंदर मखर सजवले जाते आणि गौरींना वेगवेगळे फळे अर्पण केली जातात आणि धान्यांच्या राशी लावल्या जातात. अनेक ठिकाणी आपल्या परंपरेनुसार नैवेद्याचा फुलोरा तयार केला जातो.
 
परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचे पाय दुध आणि कोमट पाण्याने धुतले जातात आणि त्यांचा पायावर कुंकाने स्वस्तिक काढलं जातं. घरात येताना पावलांवर पाऊल ठेवत गौरीचे आगमन करतात. शंख वाजवून गौरीचं घरात आगमन केलं जातं. गौरी स्थापना करण्यापूर्वी त्यानं घरातील देवघरासमोर ठेवून घरात ऐश्वर्य नांदो आणि वैभव निर्माण होवो समृध्दी येवो अशी प्रार्थना केली जाते. 
 
महापूजनात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी,१६ चटण्या,१६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.
 
तिसर्‍या दिवशी खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात. परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.
गौरीची आरती
भाद्रपद शुद्ध सप्तमीस प्रतिष्ठा
अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा
गणेशा सहित गौरी धनिष्ठा
बैसली येउनि सकळिया निष्ठा ।।१||
 
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।
 
ज्येष्ठा नक्षत्र पुजेचा महिमा
षडरस पक्वान्ने होती सुखधामा
सुवासिनी ब्राह्मण अर्पुनी निजनेमा
तुझे आशीर्वादे सकलही धामा ।।२।।
 
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।
उत्थापन मूळावर होता अगजाई
वर देती झाली देवी विप्राचे गृही
रुद्र विश्वनाथ भक्ताचे ठायी
वर देती झाली देवी सकळांचे गृही ।।३।।
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।