गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Updated : रविवार, 28 ऑगस्ट 2022 (17:45 IST)

Ganesh Chaturthi 2022 शुभ मुहूर्त आणि षोडशोपचार पूजा विधी

यंदा गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट 2022 बुधवारी आहे. या दिवशी गणेश मूर्ति स्‍थापना शुभ मुहूर्त- 
सकाळी : 6 वाजून 9 मिनिटांपासून
दुपारी : 11 वाजून 12.15 मिनिटांपर्यंत
संध्याकाळी : 5 वाजेपासून ते 6.30 मिनिटांपर्यंत
शुभ-लाभ चौघडिया मुहूर्त : रात्री 8 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत
 
इतर मुहूर्त :
विजय मुहूर्त : दुपारी 02:05 ते 02:55 पर्यंत
गोरज मुहूर्त : संध्याकाळी 06:06 ते 06:30 पर्यंत
अमृत काळ मुहूर्त : संध्याकाळी 05:42 ते 07:20 पर्यंत
रवि योग : सकाळी 05:38 ते रात्री 12:12 पर्यंत या दिवशी शुक्ल योग देखील असेल.
संध्याकाळ पूजा मुहूर्त : संध्याकाळी 05:42 ते 07:20 पर्यंत
 
गणेश पूजनाचे संपूर्ण साहित्य
भांडभर पाणी, दूध, पोळीचा तुकडा, औक्षणाचे ताट, तेल वाती, फुलवाती, कापसाची वस्त्रमाळ, कापसाचे वस्त्र, गणपतीसाठी सजावटीचे सामान (आवडीप्रमाणे), फुले, फुलांचे हार, दूर्वा, विड्याची पाने, पत्री, मोदक, फळे, नारळ, पंचामृत. चौरंग, लाल आसन, रांगोळी, रांगोळीचे रंग, समई, निरांजन, पंचारती, तांदूळ, घंटा, शंख, उदबत्ती, धूप, विड्याची पाने - 25 नग, सुट्टे पैसे- 10 नाणी, सुपारी - 10 नग, खारीक, बदाम, हळकुंड, खोबऱ्याचे तुकडे, हळद, कुंकू, अक्षता, अष्टगंध, गुलाल, अत्तर, कापूर, काडेपेटी, पत्री (शमी, रुई, आघाडा, केवडा इतर), जानवे, पाण्याने भरलेला तांब्या, पळी - भांडे, ताम्हण, उपवस्त्र, वस्त्रमाळ, 
 
देवपूजेसाठी काही नियम- 
पुजेला बसताना कायम धूतवस्त्र सोवळे इ. नेसून बसावे.
पुजा आसानावर बसूनच करावी. जमिनीवर बसू नये. तसेच आपले आसन देवतांच्या आसनापेक्षा उंच असू नये.
कपाळाला गंध असावे.
देवपूजा करताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे, मध्येच उठू नये.
देवघरात आपल्या उजव्या हाताला शंख व डाव्या हाताला घंटा ठेवावी.
आपल्या डाव्या बाजूला समई व उजव्या हाताला तुपाचे निरांजन ठेवावे.
फुले वाहताना कायम देठाकडची बाजू देवाकडे करावी.
विड्याची पाने कायम उताणी व देठ देवाकडे असावे.
नारळाची शेंडीसुद्धा देवाकडे असावी.
 
घरच्या घरी षोडशोपचार पूजा -
 
षोडशोपचारपूजा ही सोळा उपचारांनी करावयाची असते. थोडक्यात माहीती जाणून घ्या-
 
षोडशोपचार पूजा म्हणजे जी पूजा सोळा उपचारांनी केली जाते- 
1) आवाहन 
2) आसन
3) पाद्यं
4) अर्घ्य
5) आचमन
6) स्नान
7) वस्त्र
8) यज्ञोपवीत
9) गंध
10) पुष्प
11) धूप
12) दीप
13) नैवेद्य
14) प्रदक्षिणा
15) नमस्कार
16) मंत्रपुष्प
 
प्रथम आचमन करावे. डाव्या हातात पळी घेउन त्याने उजव्या हातावर पाणी ओतून ते पाणी प्राशन करावे, ही कृती तीन वेळा करून एकदा उजव्या हातावरून ताम्हनात पाणी सोडावे.
 
यानंतर कलश, शंख, घंटा, दीप पूजन करावे. प्रथम कलश पूजन करावे. आपण जे पाणी पूजेला वापरतो त्यामधे पुण्यनद्यांचे आवाहन करावे. मंत्र ज्ञात नसल्यास केवळ स्मरण करावे. कलशाला गंध, अक्षता, फुलं वहावे.
 
त्यानंतर शंख पूजन करावे. शंखाला गंध-फुलं वाहून नमस्कार करावा. शंखाला अक्षता वाहू नये.
 
त्यानंतर घंटा पूजन करावे. घंटा वाजवावी.
 
नंतर दीप पूजन करावे व नमस्कार करावा.
 
पूजन झालेल्या शंख, कलश यातील थोडे पाणी एकत्र पळीमध्ये घेउन तुळसपत्र घेउन सर्व पूजासाहित्य व स्वत:वरती प्रोक्षण करावे.
 
ज्या देवतेची पूजा करणार त्यादेवतेचे मनात स्मरण करावे.
 
आवाहन - देवाच नाव घेउन नम्र भावाने देवाला बोलावावे. देवावरती अक्षता वहाव्या.
 
आसन - देवाला बसायला आसन द्यावे.
 
पाद्य - देवाचे पाय धुवावे.
 
अर्घ्य - गंध, फुलं, नाणे, सुपारी एकत्र घेउन पाण्याबरोबर देवाला द्यावे.
 
आचमन - देवाला आचमनासाठी पाणी द्यावे. मुर्तीवर पळीने पाणी वहावे.
 
स्नान - देवाला पाण्याने स्नान घालावे.
 
पंचामृत स्नान - प्रथम पयःस्नान म्हणजे दुधाने देवाला स्नान घालावे. नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फ़ूल वाहून नमस्कार करावा.
 
दधिस्नान - देवाला दह्याने स्नान घालावे. नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फ़ूल वाहून नमस्कार करावा.
 
घृतस्नान - देवाला तूपाने स्नान घालावे. नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फ़ूल वाहून नमस्कार करावा.
 
मधुस्नान :- देवाला मधाने स्नान घालावे. नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फ़ूल वाहून नमस्कार करावा.
 
शर्करास्नान :- देवाला साखरेने स्नान घालावे. नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फ़ूल वाहून नमस्कार करावा.
 
गंधोदकस्नान :- देवाला थोडे गंध-पाणी एकत्र करून त्याने स्नान घालुन नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फ़ूल वाहून नमस्कार करावा.
 
दिवा ओवाळावा. पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. देवाचे स्तुती मंत्र किंवा श्लोक म्हणून देवावर पाण्याने अभिषेक करावा. 
 
अभिषेक झाल्यावर देवाला अत्तराने स्नान घालून कोमट पाण्याने देवाची मूर्ती स्वच्छ करावी. त्यानंतर देवाला स्वच्छ वस्त्राने पुसून आसनावर ठेवावे.
 
वस्त्र - देवाला कापसाचे वस्त्र वहावे.
 
यज्ञोपवीत - देवाला जानवे घालावे. व आचमनासाठी आपल्या उजव्या हातावरून ताम्हनात पाणी सोडावे.
 
चंदन - देवाला अनामिकेने चंदन लावावे. त्यानंतर देवाला अलंकार घालावे. नसल्यास अक्षता वहाव्या.
 
परिमलद्रव्य :- हळद, पिंजर, शेंदुर, अबीर देवाला वहावे.
 
पुष्प - देवाला फुले, हार, तुळस, दूर्वा वहावे.
 
धूप - देवाला धूप- उदबत्ती ओवाळावी.
 
दीप - देवाला शुद्ध तुपाची निरांजन ओवाळावी.
 
नैवेद्य - देवाला नैवेद्य दाखवावा. जेवणाचा नैवेद्य केळीच्या पानावर वाढावे. व देवासमोर पाण्याने चौकोनी मंडल करावे. त्यावर नैवेद्याचे पान ठेउन देवाला नैवेद्य अर्पण करावा. हात धुणे, मुख धुणे, आचमनासाठी ताम्हनात चार वेळा पाणी सोडावे. देवाला अत्तर लावावे.
 
तांबूल - देवाला विडा अर्पण करावा. (दोन विड्याची पाने व सुपारी) तसेच एक नाणे ठेवावे. या विड्यावर वेलची, लवंग, चुना, कात इ. मुखवास पदार्थ सुद्धा ठेवू शकता.
 
फळ - देवाला श्रीफल अर्थात नारळ किंवा इतर फळे अर्पित करावी. 
 
देवाची आरती करावी.
 
प्रदक्षिणा करावी -. स्वत:भोवती उजव्या बाजूने फिरावे.
 
साष्टांग नमस्कार करावा.
 
मंत्रपुष्पांजली - दोन्ही हातात फुले घेउन मंत्रपुष्प म्हणून दोन्ही हाताने देवाच्या चरणाशी फुले अर्पण करावी.
 
प्रार्थना - हात जोडून अनन्य भावाने देवाची प्रार्थना करावी. क्षमा मागावी.