भाजपची सत्तेसाठी प्रादेशिक पक्षाची चाचपणी सुरु
केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे भाजपने सत्तेसाठी प्रादेशिक पक्षाची चाचपणी सुरु केली आहे. मात्र, भाजपला अन्य पक्षांची गरज लागणार नसल्याचा अंदाज बहुतांश एक्झिट पोलने वर्तवला आहे. तरी देखील भाजपने प्रादेशिक पक्षांसाठी दरवाजे खुले ठेवले आहेत. बिजू जनता दल, तेलंगना राष्ट्र समिती आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.
प्रादेशिक पक्ष एनडीएला अधिक मजबूत करणार असल्याचे मत भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगमोहन रेड्डी आणि भाजपचा मित्रपक्ष तेलगू देसम पार्टीचे ए.चंद्राबाबू नायडू यांचे सीमांध्रावरुन चांगले संबंध नाहीत. मात्र, जगमोहन यांचे काँग्रेसशी चांगलेच वाजले आहे. त्याचा फायदा घेवून त्यांना आपल्या गोटात ओढून रणनीती भापने आखली आहे. जगमोहन रेड्डी यांनी एनडीएचा घटक बनण्याचे संकेतही दिले आहेत. तर टीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर यांच्याशीही भाजपने एप्रिलच्या अखेरीस बातचीत केली असून त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशिल आहे. तर बिजू जनता दल पुन्हा एनडीएचा घटक बनण्याची शक्यता आहे.