सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By
Last Updated : शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (10:17 IST)

गुढीपाडवा माहिती मराठी, इतिहास, महत्त्व, पूजा विधी, आरती आणि शुभेच्छा

Gudi Padwa चैत्र महिना हा सनातन धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. चैत्र महिना हा हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. या तारखेपासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. या दिवशी गुढीपाडव्याचा सण देखील साजरा केला जातो. मराठी समाजासाठी गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण उत्साहात साजरा केला जातो. हिंदू नववर्षाच्या सुरुवातीच्या आनंदात साजरा होणाऱ्या गुढीपाडव्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.
 
गुढीपाडवा माहिती इतिहास Gudi Padwa History
गुढीपाडवा विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो. यामध्ये 'गुढी' म्हणजे 'विजय ध्वज' आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी सजवली जाते. या उत्सवाशी संबंधित अशी एक मान्यता आहे की या दिवशी शालिवाहन नावाच्या कुंभार पुत्राने मातीच्या सैनिकांच्या सैन्याने आपल्या शत्रूंवर विजय मिळवला होता. याच कारणामुळे शालिवाहन शकही याच दिवशी सुरू होतो.
 
गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली. या दिवसापासून सत्ययुग सुरू झाल्याचेही मानले जाते. पौराणिक कथांशी संबंधित अशी देखील एक मान्यता आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्री रामाने बळीचा वध करून दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांना त्याच्या दहशतीपासून मुक्त केले. यानंतर येथील लोकांनी आनंद व्यक्त करत घरोघरी विजयाचा झेंडा फडकावला. ज्याला गुढी म्हणतात.
 
आदिशक्तीचे प्रकटीकरण चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झाले. या दिवशी गणितज्ञ भास्कराचार्य यांनीही तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांच्या आधारे पंचांग रचल्याचे सांगितले जाते.
 
गुढीपाडवा महत्त्व Gudi Padwa Significance
गुढीपाडवा या सणाला  ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते आणि वातावरणात बदल झालेला असतो. जुनी वाळलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, तर आंब्याला मोहोर येतो. या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असल्यामुळे हा सण साजरा केला जातो. गुढीला सजवण्यात येणार्‍या प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र आहे. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातो. तर  या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. तसेच या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र आहे. कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो. होळीनंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते. या वातावरणात बदलाच्या काळात त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी-पडशांसारखे विकार फोफावण्याची शक्यता असते. अशावेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राखण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुलिंबाच्या सेवनाने करतात.
 
या प्रकारे उभारावी गुढी How to Make Gudi
गुढीची उंच काठी बांबू पासून तयार केली जाते. काठीला स्वच्छ धुऊन त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा, पितळ, किंवा चांदीचे गडू, तांब्या किंवा फुलपात्र बसविले जाते. ज्या भागाला गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून धुऊन पुसून घ्यावी. त्यावर रांगोळी काढून पाट ठेवून गुढीची काठी ठेवली जाते. तयार केली गुढी दारात, उंच गच्चीवर, गॅलरीत लावतात. गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करतात.
 
गुढीपाडवा पूजा विधी Gudi Padwa Puja Vidhi
गुढी उभारल्यावर गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करतात. निरंजन लावून उदबत्ती ओवाळतात. दूध साखर पेढ्यांचा नैवेद्य दाखवतात. दुपारी गुढीला गोडधोडाचे नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळीस परत हळद-कुंकू, फुले, अक्षता, वाहून गुढी उतरविली जाते.
 
गुढी पाडवा रेसिपी Gudi Padwa Recipe
गुढीपाडवा हा खास महाराष्ट्रीयन पदार्थांसाठीही ओळखला जाणारा सण आहे. या दिवशी श्रीखंड-पुरी, खीर-पुरी, बासुंदी-पुरी, भाजी-पुरी, पुरणपोळी, मसालेभात, कोशिंबीर, चटण्या, लोणचे, पापड, आलू वड्या, बत्तावडे खास साग्रसंगीत पद्धतीत शैलीत नैवेद्य तयार केलं जातं. 
 
गुढीपाडवा आरती Gudi Padwa Aarti
गुढी उभारू चैत्रमासी प्रतिपदा ही तिथी,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती
 
विश्व निर्मिती ब्रह्म करीतो, ब्रमहपुराणी असे,
अयोद्धेसी वनवासाहुनी राम पुन्हा परतसे,
गुढ्या-तोरणे रांगोळ्यांनी स्वागत ते करीती,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती
 
माधव तसे मधुमास ही वेदातील ही नावे,
पंचांगाचे पूजन सर्वही करती मनोभावे,
सरस्वतीस गंध अन पाटी ही पुजिती,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती
 
साखरमाळ कडुलिंबाची पाने फुलमाळा,
गडु चांदीचा रेशमी वस्त्र कुंकू ,केशर , टिळा,
आदराने ब्रह्मध्वज या गुढीस संबोघिती,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती
 
पिशाच्च जाई दूर पळुनी कडुलिंबाचा टाळा,
कडू रसाचे सेवन करूया गूळ जिरे घाला,
गुढीपाडवा सण हा पहिला वर्षाचा करीती
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती
गुढी उभारू चैत्र मासि प्रतिपदा ही तिथी
आरती करुनि वसंत ऋतुचा महिमा वर्णू किती
 
गुढीपाडवा शुभेच्छा Gudi Padwa Wishes
नवीन पल्लवी वृषलतांची,
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची,
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
 
नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र,
चांदीचा तांब्या,
कडुनिंबाची पानं,
साखरेची माळ,
अशी उभारूया समृद्धीची गुढी...