बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. गुजरात विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (08:01 IST)

गुजरात एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

गुजरातमध्ये दोन्ही टप्प्यांचं मतदान पूर्ण झाल्यानंतर 5 डिसेंबर रोजी एक्झिट पोलचे आकडे यायला सुरुवात झाली होती.
 
'न्यूज एक्स'च्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला 117 ते 140 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला 34-51 जागा मिळू शकतात. या एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टीला 6-13 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
'टीव्ही 9 गुजराती'च्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला 125 ते 130 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला 40 ते 50 आणि तिकडे 'आप'ला 3 ते 5 जागांवर समाधान मानावं लागू शकतं.
 
'रिपब्लिक टीव्ही' आणि 'पी-मार्क' यांच्या अंदाजानुसार, भाजपला 128 ते 148, काँग्रेसला 30 ते 42, आम आदमी पार्टीला 2 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे.
 
या निवडणुकीत भाजपला 48.2 टक्के, काँग्रेसला 32.6 टक्के, आप 15.4 टक्के आणि इतरांना 3.8 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.
 
या निवडणुकीत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त आम आदमी पार्टी सोबतच एआयएमआयएमनेही उडी घेतली होती. या नव्या राजकीय समिकरणांमुळे उमेदवारांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होऊ शकतो.
 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाा यांच्या गृहराज्यात होत असलेली ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.
 
गुजरातच्या निकालाचे पडसाद राष्ट्रीय राजकारणातही उमटू शकतात असं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जातंय.
 
गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी 1 डिसेंबरला पार पडलं होतं. यात 63.31 टक्के मतदान झालं. मागच्या निवडणुकीतील सरासरी पाहता मतदानाचा हा टक्का खूपच कमी आहे.
 
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत 71 राजकीय पक्ष आणि अपक्षांसह एकूण 1,621 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.
 
(बीबीसी स्वतः निवडणुकांपूर्वी किंवा निवडणुकांनंतर कोणत्याही पद्धतीचे एक्झिट पोल घेत नाही. किंवा इतर कोणत्याही संस्थेच्या माध्यमातून हे पोल घेतले जात नाहीत. बऱ्याचदा फेसबुक, ट्विटर किंवा व्हॉट्स अॅपवर बीबीसीच्या नावे एक्झिट पोल फिरत असतात. यात कोणतंही तथ्य नाही.)