शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By वेबदुनिया|

ग्रामीण उत्कर्षासाठी ज्ञानदीप विद्यावर्धिनी

प्राचीन गुरूकूल पध्दती, गुरूदेव टागोरांचे शांतीनिकेतन, योगी अरविंदांचा पॉंडिचेरीचा आश्रम, कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्थाया सार्‍यांचा सर्वोत्तम तत्त्वांचा संकर असलेली आणि राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता यासाठी कटिबध्द असणारी एक प्रचलित चाकोरीबाहेरची शिक्षण संस्था इगतपुरी तालुक्यातील 'वाघाची वाडी' या आदिवासी पाड्यात नजिकच्या भविष्यकाळात साकारत आहे. या आगळ्यावेगळ्या प्रकल्पाचे शिल्पकार आहेत मध्य व कोकण रेल्वेच्या सेवेतून निवृत्त झालेले अभियंता शिक्षण समर्पित सेवाव्रती सुरेश तांबोळी!

नोकरी सांभाळून समाजसेवेचा वसा घेतलेल्या या सरांच्या डोक्यात या प्रकल्पाच्या नानाविध योजना अनेक वर्षापासून घोळत होत्या. आकाशानंदानी स्थापन केलेल्या 'ज्ञानदीप महासंघ' या सेवाभाव‍ी संस्थेचे ते सध्या अध्यक्ष आहेत तसेच इगतपुरीतील 'विद्यावर्धिनी' या संस्थेचे ते संस्थापकसुध्दा आहेत. या दोन ज्ञान व सेवा यासाठी व्रतस्थ असणार्‍या संस्थांनी इगतपुरी येथे 'ज्ञानदीप विद्यावर्धिनी ग्रामीण उत्कर्ष समिती' ची स्थापना केली. त्यादिवशी प्रकाशित झालेल्या 'संकल्प' या पुस्तिकेत 21 प्रकारातील सुमारे 75 उपक्रम समाविष्ट आहेत.

शिक्षण माणसाला घडविते म्हणून गुरूकुल विद्यालय, आरोग्यनिगा त्याला जगविते म्हणून आरोग्यधाम, कला-क्रीडा-व्यायाम या परंपरागत भारतीय गुणांचे संवर्धन, वयस्क वृध्दांच्या आत्मीय देखभालीसाठी वृध्दाश्रम, महिलांच्या सृप्तशक्तीचा सर्वांगीण सुजाण जागर, अपंगांना स्वावलंबी बनविणारे निर्धारालय, प्रौढ स्त्री-पुरूषांसाठी साक्षरता प्रसार, युवकांच्या उदयोन्मुख अस्मितेची जागृती, विधवा/परित्यक्ता पुनर्वसन केंद्र, निराधार बालकांसाठी अनाथालय, गायन-वाद्य-नृत्य-नाट्य व कला प्रबोधिनी, 'रूरबन' संस्कृतीची बांधणी आदी उपक्रमातून धर्म जात-प्रांत व भाषावादापासून मुक्त असा एकात्मता जोपासणारा राष्ट्रनिष्ठ समाज घडविण्याचे या संस्थेचे ध्येय आहे.

व‍िपश्यना व स्वाध्याय यांचा प्रसार करण्याच्या संकल्पासोबत सर्व धर्मांच्या तत्त्वज्ञानांचा तौलनिक अभ्यास, गीता7दासबोध-ज्ञानेश्वरी- गाथा यांचे सखोल अध्ययन तसेच अंधश्रध्देपासून दूर असणारी डोळस ईश्वरनिष्ठा यासाठी देखील ही संस्था समर्पित राहणार आहे.

गोधनाच्या शास्त्रीय संगोपनासाठी गोशाळा व परिसरातील पशुधनासाठी आरोग्य तपासणी या समवेत आदिवासी, दलित व आर्थिक दुर्बल यांना सहाय्यभूत होणार्‍या धान्य, वस्त्र, व वर्तन पतपेढ्यांचा प्रारंभ. या योजनाही या पुस्त‍िकेच्या धोरणात अनुस्यूत आहेत. आणखी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणजे राष्ट्रीय चित्र प्रदर्शिनी यात प्रथमत: स्वातंत्र्ययोध्दे तद्नंतर समाजसेवक व त्यानंतर भारतीय संतांची प्रदर्शिनी निर्माण करण्याचा मनोदयसुध्दा ग्रंथित आहे.

प्रदूषण-निर्मूलन पर्यावरण संगोपन, जलसंवर्धन, ग्रामसुधार व अपारंपरिक ऊर्जानिर्मिती या समाजापुढे 'आ' वासून ठाकलेल्या समस्यांसाठीदेखील संस्था कालबध्द कार्यक्रम आखणार आहे. या अनेकविध उपक्रमातून आपले माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातला 'विज्ञाननिष्ठ भारत' जनसामान्यांच्या सर्वंकष सहकार्यातून उभा करण्याचा या अनोख्या ध्येयवादी संस्थेचा मानस आहे!

याखेरीज ही संस्था आपल्या पायावर भक्कम उभी राहिली की, मतदान जागृती अभियान, ग्राहकहित अभियान, हुंडाविरोधी अभियान, नागरिक सदाचार अभियान, ग्रमीण सर्वेक्षण अभियान हाती घेणार असून, त्यासोबतच जेष्ठ नागरिक सहाय्यता संघ व सामुदायिक विवाहप्रथेच्या उपक्रमाचाही 'संकल्प' संस्थेने केला आहे.

झपाट्याने होणारी वृक्षतोड लक्षात घेऊन या प्रकल्प समितीने एक एकरात फलोद्यान, एक एकरात मसाल्याच्या वनस्पती, एक एकरात स्वाध्यायप्रणीत योगेश्वर कृषी अ एक एकरात वनौषधी उद्यान उभारण्याचा तसेच उत्तम रोगवाटीका तयार करण्याचाही या संस्थेचा संकल्प आहे. संस्थेच्या कार्यासाठी दानशूर स्व. खेतमलजी लुणावत यांनी आठ एकर जमीन दानरूपाने दिली आहे.

या संकल्प पुस्तिकेतील सर्वच उपक्रम एकाचवेळी प्रारंभ करणे व्यवहार्य नाही, याची जाणीव संस्थेला असून, ते अग्रक्रमाने निधी उपलब्धतेनुसार हाती घेण्याचा त्या संस्थेच्या अध्वर्यूंचा इरादा आहे. या संपूर्ण संकल्पना साकार होण्यासाठी द्रव्यबळापेक्षाही समर्पित कार्यकर्त्यांच्या निश्चयी मनुष्यबळाची आवश्यकता अधिक आहे. या संस्थेचे काम सुरू झाले असून यातील अनेक प्रकल्प आकाराला येत आहेत. या प्रकल्पासाठी आता तुमच्या आर्थिक व प्रत्यक्ष शारीर सहकार्याची आवश्यक्ता आहे. त्यासाठी आपण खालील पत्त्यावर संपर्क साधू शकता.