शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By वेबदुनिया|

भगवान व्यास

गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुरूदेवांबरोबरच भगवान व्यासांचीही पूजा केली जाते. व्यासांचे पूर्ण नाव कृष्णद्वैपायन आहे. वेदांचे विभाग केल्यामुळे त्यांना व्यास किंवा वेदव्यास असे म्हटले जाते. महर्षि पाराशर व्यासांचे पिता आणि सत्यवती त्यांची आई होती. व्यासांना देवाचा अवतार मानले जात असून ते अमर आहेत. द्वापार युगाच्या शेवटी व्यास प्रकट झाले होते, असे म्हणतात.

कलियुगात मनुष्याची शारीरीक आणि बौद्धीक ताकद कमी होईल. त्यामुळे या काळातील मनुष्यप्राण्याला सर्व वेदांचा अभ्यास करणे शक्य होणार नाही. ते समजूनही घेता येणार नाही, हे ओळखून व्यासांनी वेदांचे चार विभाग केले. जे लोक वेद वाचू, समजू शकत नाही त्यांच्यासाठी त्यांनी महाभारत लिहिले.

महाभारतात वेदाची सर्व माहिती आहे. धर्मशास्त्र, नितीशास्त्र, उपासना आणि ज्ञान-विज्ञानाच्या सर्व बाबी महाभारतामध्ये आहेत. याव्यतिरिक्त पुराणांमधील कथांद्वारे आपला देश, समाज किंवा धर्माचा पूर्ण इतिहास समजतो. महाभारताच्या कथा मोठ्या रोचक आणि उपदेशात्मक आहेत.

मनुष्याचे कल्याण व्हावे या भावनेतून व्यासांनी अठरा पुराणांची रचना केली. पुराणात देवांची सुंदर चरित्रे आहेत. भाविकांच्या देवांप्रती असलेल्या भक्तीच्या कथा पुराणात आहेत. या व्यतिरिक्त व्रत, विधी, तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य, ज्ञान, वैराग्य, भक्ती, नीती आदी विषयांनी पुराण भरले आहे.

हिंदू धर्माची सर्व अंगे व्यासांनी पुराणात सामावली आहेत. विद्वानांसाठी त्यांनी वेदांत दर्शनाची रचना केली. वेदांत दर्शन लहान-लहान सूत्रात असून ते इतके अवघड आहे की त्यांचा अर्थ समजण्यासाठी मोठे ग्रंथ लिहिले गेले आहेत. या त्यांच्या कर्तृत्वामुळे गुरूपौर्णिमेच्या दिवशी व्यासांची पूजा केली जाते.