शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By Author वेबदुनिया|

मॉडेल ते संत- असाही एक प्रवास

प्रतिकूलता व वाईट चालीरिती मोडण्यासाठी, संस्कारांना जिवंत ठेवण्यासाठी आणि सकारात्मक सुधारणा होण्यासाठी मांडलेले विचार हे त्या युगाचे मत असते. त्या-त्या काळात जीवन जगण्यासाठी लागणारी आचारसंहिता म्हणजेच धर्म होय. म्हणूनच धर्माच्‍या उत्‍थानासाठी आणि मानवजातीला दिशा देण्‍यासाठी संतांची आवश्‍यकता असते, समाजाच्‍या या परंपरेतूनच गुरू-शिष्‍य परंपरेचा जन्‍म झाला असावा, श्री सदगुरू दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट (इंदौर) आणि सूर्योदय परिवाराचे अध्‍वर्यु राष्‍ट्रसंत भय्यूजी महाराज बोलत होते.

गुरुपौर्णिमेच्‍या पूर्वसंध्‍येला जीवनात गुरूचे महत्‍व आणि महाराजांचे कार्य या‍ विषयी त्‍यांना बोलतं केल असता, ते म्हणाले, की प्रत्येक देशाची संस्कृती तेथील आदर्शांवर अवलंबून असते. त्या आदर्शांचेच नागरिक अनुकरण करत असतात. गुरूदेखिल आपल्‍या शिष्‍यांसाठी समाजात हेच काम करतो. देशाने एवढी प्रगती करूनही आज आपल्याला शांतता नांदताना दिसत नाही आणि म्हणूनच ठिकठिकाणी मठ व मंदिरे उभारली जात आहेत. धर्म हीच भारताची खरी ओळख असून संवेदनशीलतेचेही दर्शन केवळ भारतातच घडते. त्यामुळे अध्‍यात्मिक अधिष्‍ठान हा भारताचा आत्मा असल्‍याचे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

सन्मार्गाच्‍या दिशेने नेतो तो खरा सदगुरू. समाजाला केवळ अध्‍यात्म आणि कर्मकांडांच्‍या मागे न लावता राष्‍ट्रभक्त पिढी घडविण्‍यासोबत पुरोगामी विचारांतून समाज निर्मिती व समाजसेवा करणेही तितकेच महत्‍वाचे असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

आकर्षक व्‍यक्तिमत्‍व आणि आधुनिक जगात वावरताना दैवी तेज चेह-यावरून ओसंडून वाहणा-या भय्युजी महाराजांनी अध्‍यात्मासोबतच राष्‍ट्रभक्तीची ज्योत त्‍यांच्‍या शिष्‍यगणांमध्‍ये प्रज्वलित केल्‍याने उच्‍चशिक्षित अधिका-यांपासून राजकारण्‍यांपर्यंत सर्वांनीच त्यांचे शिष्‍यत्‍व पत्‍करले आहे.

मॉडेल ते संत
पूर्वाश्रमीचे उदयसिंह देशमुख ते आजचे युगपुरुष भय्युजी महाराज हा त्‍यांचा प्रवासही तितकाच रोमांचक आहे. वयाची चाळीशी गाठण्‍यापूर्वीच त्‍यांनी अनेक सिध्‍दी प्राप्‍त केल्‍याचा त्‍यांच्‍या भक्तांचा दावा आहे.

नाथ संप्रदायातील कठोर व्रत आणि श्री गुरूदत्तांना आपले गुरू मानणार्‍या भय्युजी महाराजांच्‍या रोमारोमात या संप्रदायाची शिकवण भिनलेली आहे. एकेकाळचे सियाराम शुटिंगचे ब्रॅंड अम्बेसेड असलेल्या व अतिशय कुशल आणि वेगवान वाहन चालक असलेले आणि आधुनिक युगातील तंत्रज्ञानाचा तितक्‍याच मोकळेपणाने स्‍वीकार करणा-या भय्युजी महाराजांनी अध्‍यात्म आणि आधुनिकता यांचा संगम घडवून आणला आहे.

त्‍यामुळे राजकारणी, उद्योजकांपासून अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांचे शिष्‍यत्व पत्‍करले आहे. त्‍यांच्‍या शिष्‍यांमध्‍ये केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्‍यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, अभिनेता शेखर सुमन यांच्‍यासह सर्वपक्षीय अनेक आमदारांचा समावेश आहे.

भारतात अनेक गुरू, संत आणि विचारवंतांची मोठी परंपरा आहे. मात्र या गर्दीत ते केवळ अध्‍यात्मिक गुरू न ठरता राष्‍ट्रीयतेच्‍या भावनेने झपाटून समाजातील
गरीब, महिला व बेरोजगारांसाठी त्‍यांनी भरीव कार्य केले आहे.

महाराष्‍ट्रासह मध्‍य प्रदेशातही त्‍यांनी आपल्‍या सुर्योदय चळवळीच्‍या माध्‍यमातून मोठे काम उभारले आहे. त्‍यांच्‍या सुर्योदय आश्रमाच्‍या माध्‍यमातून शेतीच्‍या विकासासाठी सुर्योदय कृषी तीर्थ प्रकल्‍प, पर्यावरण संवर्धनासाठी सुर्योदय ग्राम समृध्‍दी योजना, सुर्योदय स्‍वयंरोजगार योजना, तीर्थ क्षेत्र स्‍वच्‍छता अभियान, दारिद्र्य उन्‍मुलन अभियान, आयुर्वेदीक औषधी प्रकल्‍प, एडस् जनजागृती अभियान, कन्‍या भ्रुण हत्‍या जनजागृती अभियान, बळीराजा ज्ञान प्रबोधन योजना संस्‍कार कला, क्रिडा केंद्र आदी प्रकल्‍प चालविले जातात.

ते म्हणतात, मी कधीही स्‍वतःला देव किंवा दैवी पुरुष म्हणून संबोधून घेत नाही. माझे विचार सहज स्‍वीकारले जातात कारण मी सामान्‍य माणसाची भाषा बोलतो. वैफल्‍यग्रस्‍त झालेले आणि परिस्थितीशी लढताना हतबल झालेले लोक माझ्याकडे येतात आणि माझे विचार ऐकून पुन्‍हा नव्‍या जोमाने कामाला लागतात. माझे विचारांना अंधश्रध्‍देपेक्षा बौद्धिकतेचे अधिष्‍ठान आहे.

एक यशस्‍वी मॉडेलचे आयुष्‍य जगत असताना महाराजांना एका अज्ञात शक्तींची जाणीव झाली आणि त्‍या शोधसाठी त्‍यांनी मॉडेलिंगमधून संन्‍यास घेऊन सहा महिन्‍यांचा काळ अज्ञातवासात घालविला. या काळात भरपूर वाचन आणि चिंतन केल्‍यानंतर दैवी आशिर्वाद घेऊन ते संत म्हणून समाजाच्‍या समोर आले.