भीमरूपी महारुद्रा वजहनुमान मारुती । वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ।। १ ।।
अर्थात हे मारुतीराया आपण भीमरूप, महारुद्र कारण मारुती हे शंकराचे अवतार मानले गेले आहे, वजहनुमान अर्थात वज्रासारखी अभेद, वायुदेवता, वनाचा शत्रु, माता अंजनीचे पुत्र प्रभू रामचंद्रांचे दूत आणि प्रभंजन अर्थात बळाच्या जोरावर मोठा विनाश घडवून आणणारे आहात.
महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळे । सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका ॥ २ ॥
अर्थात हे मारुतीराया, आपण महाबळी आणि प्राणदाता (संजीवनी आणून लक्ष्मणाचा जीवन वाचवणारा), आपल्या बळावर लोकांना उठवणारे, सुख देणारे, दुःखाचे हरण करणारे आहात. विष्णुस्वरूप रामाची कृपा मिळवून देणारे आहात.
दिनानाथा हरीरूपा सुन्दरा जगदन्तरा । पाताल देवताहन्ता भव्यसेन्दूर लेपना ॥३॥
अर्थात हे मारुतीराया आपण दीन-गरीबांचा वाली आहात, हरीरूप, अतिशय सुंदर असून सर्व जगताच्या अंतर्यामी आहात. पाताळाच्या दृष्ट शक्ती अहीरावण आणि महीरावण यांचा विनाश करणारे, सर्व शरीरावर शेंदूर लावल्यावर आपण भव्य दिसणारे आहात.
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना । पुण्यवन्ता पुण्यशीला पावना परितोषका ॥४॥
अर्थात हे मारुतीराया आपण लोकनाथ आहात अर्थात जगाचे पालक आहात, जगन्नाथ आहात आणि प्राणनाथ म्हणजे जीवनाचे रक्षक आहात. आपण अत्यंत पुरातन, पुण्यवान, पुण्यकर्म करणारे, पवित्र असून भक्तांना आनंदित करणारे आहात.
ध्वजांगे उचली बाहू आवेशे लोटला पुढे । काळाग्नि काळरुद्राग्नी देखतां कापती भये ।।५।।
अर्थात प्रभू रामचंद्र यांचा विजयी ध्वज आपल्या हातात धरून आपण मोठ्या आवेशाने सर्व सैन्याच्या पुढे निघालात. आपले हे रूप पाहून काळाग्नि म्हणजे काळ अर्थात मृत्यूरुपी अग्नी आणि रौद्र म्हणजे भयंकर अग्नी देखील भीतीने थरथर कापू लागतात.
ब्रह्मांडें माईली नेणों आवळें दंतपंगती ।नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा भृकुटी त्राहिटिल्या बळे ॥६॥
अर्थात हे मारुतीराया आपण दात-ओठ खाताना वाटते जणू आपल्या डोळ्यात सर्व ब्रह्मांड मावले आहेत. भिवया ताणून रागाने बघत असताना डोळ्यातून क्रोधाच्या ज्वाला जणू बाहेर पडतात.
पुच्छ ते मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरी । सुवर्णकटिकांसोटी, घंटा किंकिणी नागरा ।।७।।
अर्थात आपण आपले शेपूट वळवून मस्तकाजवळ आणून ठेवली असून मस्तकावरील मुकुट आणि कानांतील कुंडले शोभून दिसतात. आपल्या कमरेला सोन्याची कासोटी बांधलेली आहे, तर त्याचा कडदोरा आपटून मंजुळ घंटानादासारखा आवाज येतो.
ठकारे पर्वताऐसा नेटका सडपातळू । चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥
अर्थात हे मारुतीराया, मुळात बांधेसून आणि सडपातळ असून पर्वतासारखे उभे ठाकलेले आहात. शेूपट मोठी आणि विजेसारखी चपळ आहे.
कोटिच्या कोटि उड्डाणें झेंपावे उत्तरेकडे । मन्द्राद्रीसारखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळे ॥९॥
अर्थात आपल्या चरित्रात आपल्या उड्डाणाचे असंख्य प्रसंग आहेत. विशेषतः लक्ष्मण बेशुद्ध पडल्यावर मारुती उत्तरेकडे झेपावलात तेव्हा मंदर पर्वतासारखे प्रचंड द्रोणागिरी पर्वत क्रोधाने मुळासकट उपटून काढणतात.
आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती । मानसी टाकिले मागे, गतीसी तूळणा नसे ।।१०।।
अर्थात आपण तो पर्वत आणून पुन्हा परत जागेवरुन नेऊन ठेवला. हा उत्तरेचा प्रवास अत्यंत मनाच्या चपळाईने अर्थात वेगाने केला. आपल्या उड्डाणाची गती मनाला मागे टाकणारी आहे. अशात आपल्या गतीची तुलना करण्याचे सामर्थ्य जगात नाही.
अणूपासूनि ब्रह्मांडा एवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठें मेरुमंदार धाकुटे ।।११।।
अर्थात हे मारुतीराया आपण अणू ऐवढे लहान देहापासून ब्रह्मांडाएवढे मोठे आकार घेत जाता. या विशाल रूपाची तुलना करणे शक्य नाही. विशालतेसाठी प्रसिद्ध असलेले मेरू आणि मंदार हे पर्वत देखील आपल्यापुढे चिमुकले वाटू लागतात.
ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें घालू शके । तयासी तूळणा कैची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥
अर्थात हे मारुतीराया वज्रासारखे शेपटाने अवघ्या ब्रह्मांडाला गुंडाळता येईल. अशात संपूर्ण ब्रह्मांडात मारुतीची तुलना करता येणार नाही.
आरक्त देखिलें डोळा, गिळिले सूर्यमण्डळा । वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमण्डळा ।।१३।।
अर्थात हे मारुतीराया, आपण पाळण्यात आरक्तवर्ण सूर्यबिंब पाहिले. फळ समजून ते गिळले. सूर्यबिंब गिळण्यासाठी आपण उड्डाण घेतली. यासाठी आपल्याला खूप मोठे व्हावे लागले. मोठे होत असताना आपण वाढत वाढत सूर्यमंडळ ग्रासून टाकले.
भूतप्रेतसमन्धादि रोग व्याधि समस्तही । नासती तुटती चिन्ता, आनन्दे भीमदर्शने ।। १४ ।।
अर्थात हे मारुतीराया, आपल्या दर्शनाने सर्व आजार, सर्व प्रकारची काळजी, एवढेच नव्हे तर भूत, प्रेत, समंध यांच्याद्वारे होणारा त्रास कायमचा नाहीसा होतो, मन चिंतामुक्त आणि आनंदी राहते.
हे धरा पन्धराश्लोकी लाभली शोभली वरी । दृढदेहो निसन्देहो संख्या चंद्रकला गुणे ।।१५।।
अर्थात हे मारुतीराया, हे पंधरा श्लोकांद्वारे आपले केलेले हे स्तवन चांगले लाभदायी ठरु दे. यामुळे शरीर सुदृढ झाले आणि मन निःशंक झाले.
रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू । रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ।।१६।।
अर्थात हे मारुतीराया, समस्त रामभक्तांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ, वानरकुळाला भूषणावह, ज्यांची अंतरात्मा प्रत्यक्ष रामाच्या ठिकाणी आहे अशा मारुतीच्या दर्शनाने सर्व दोष, पापांचे परिहार होते.
इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं श्री मारुतिस्तोत्रम् संपूर्णम्
अर्थात अशा प्रकारे समर्थ रामदासांनी रचलेले आणि संकटांचे निरसन करणारे हे मारुतिस्तोत्र येथे संपूर्ण झाले.