आत्मा न स्त्री असते न पुरूष
जीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा संबंध तयार होतो. यावरून असे स्पष्ट होते की आत्मा ही स्त्री किंवा पुरूष नसते. तर मग समाजामध्ये स्त्री- पुरूष यात भेदभाव का होतो? हा तर एक प्रकारचा विरोधाभास आहे, एकीकडे आपण मंदिरांमध्ये देवींच्या मूर्ती स्थापन करून त्याची पूजा करतो, नवरात्रीमध्ये 9 दिवस व्रत करतो, दिवाळीमध्ये लक्ष्मी देवीचे आवाहन करतो आणि दुसर्या बाजूला काही स्वत:ला सभ्य म्हणवून घेणारे लोक, लहान कन्यांचे तसेच महिलांचे लैंगिक शोषण करतात. या सर्वांमध्ये कोणाचा दोष आहे? या भेदभावाचे कारण कोणते? आजच्या तांत्रिक जीवनामध्ये जगणारा आधुनिक मनुष्य याने जरी बाकीच्या गोष्टी बदलल्या असल्या तरी स्त्री ही त्या सर्व क्षेत्रांमध्ये निपुणतापूर्वक कार्य करू शकते, जे केवळ पुरुषांसाठी आरक्षित होते.
काही वर्षांपूर्वी महिला या फक्त ऑफिसमध्ये कार्यरत होत्या परंतू आता असे एकही क्षेत्र राहिले नाही की ज्यामध्ये स्त्रियांचा वाटा नाही. विशेषज्ञांनुसार महिला या जन्मजात व्यवसायी असतात. घर चालवणे, वाढत्या महागाईमध्ये आर्थिक संतुलन सांभाळणे, मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे, परिवारातील सर्व व्यक्तींना प्रेमाने वागवणे, या सर्व गोष्टींसाठी व्यावहारिक ज्ञान, संयम, विवेक, सदबुद्धी, मानसिक संतुलन असे सर्व गुण नारीमध्ये असतात.
आपण बघत आलो आहोत की सुरुवातीपासूनच नारीचे शोषण होत आले आहे, परंतु आता हे सर्व थांबवून नारीला तिथे उच्चस्थान देण्याची वेळ आली. स्त्री पुरूष समानतेसाठी, मुलगा- मुलगी, वर- वधू अशा प्रकारचा भेदभाव करण्याची कुप्रथा बंद करायला हवी. मुलगा आणि मुलगी दोघांही समान वागणूक द्यायला हवी, तसेच समान शिक्षण, समान आदर द्यायला हवं. परिवारातील प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील मुलगा आणि मुलगी हा भेदभाव संपवून दोघांनाही समान संधी द्यायला हवी.
आजच्या नव्या काळातील स्त्री ही खूप काळानंतर जागी झाली आहे आणि पुरुषांपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाही. नारीमध्ये प्रज्वलित झालेल्या या ज्वालेला आता कुणीही थांबवू शकत नाही. सर्व भेदभावांचा नाश करून नारी आपली प्रतिभा सर्वांसमोर निर्माण करेल. तर मग समाजातील सर्व पुरूष मंडळींनी या गोष्टीला कोणत्याही प्रकारचा विरोध करू नये, उलट स्त्रीचा होणारा सर्वांगीण विकास याला प्रोत्साहन द्यावे.
परमेश्वराच्या स्मृतीमध्ये आपण म्हणतो की त्वमेव माता-पिता त्वमेव, म्हणेच परमेश्वराला दोन्ही रूपांमध्ये अर्थात नर आणि नारी रूपात आपण नमस्कार करतो. दैवांनाही स्त्री- पुरूष असा भेद कधीच केला नाही तर मग आपण का करावा? चला तर मग आपण कराल? चला तर मग आपण सर्व स्त्री आणि पुरूष भेदभाव या कुप्रथेला विसरून, स्त्री पुरूष समानता या संकल्पनेचा स्वीकार करूया.
- राजयोगी ब्रह्माकुमार निकुंजजी