श्रीक्षेत्र कुरवपूर येथे येणाऱ्या यात्रेकरूंची सोय व्हावी म्हणून श्रीस्वामी महाराजांनी रायचुरकर मंडळींना असे सांगितले की, "येथे येणाऱ्या सर्व यात्रेकरूंना राहण्यासाठी एक चांगली धर्मशाळा बांधावी." श्रीस्वामी महाराजांच्या या आज्ञेप्रमाणे रायचूरमधील मंडळींनी धर्मशाळा बांधण्याच्या कामाला सुरुवात केली. या कामी रायचूर येथील श्री. शंकरराव यांनी पुढाकार घेऊन बरीच मेहनत घेतली. या वेळीच श्रीक्षेत्र कुरवपूरला कोल्हापूरचे श्री. शेषो कारदगेकर हे श्रीस्वामी महाराजांच्या दर्शनासाठी सहकुटुंब आले होते. त्यांना संतती होत नव्हती व कर्जही बरेच झाले होते. त्यांची श्रीस्वामी महाराजांवर एकांतिक श्रद्धा होती." त्यामुळे आपली दुःखे आपल्या देवाजवळ सांगावयाची नाहीत तर दुसऱ्या कोणाजवळ सांगावयाची?" या विचाराने त्यांनी या दोन्ही गोष्टी श्रीस्वामी महाराजांच्या कानावर घातल्या.
त्यावेळी श्रीस्वामी महाराजांनी श्री. शेषो कारदगेकर यांच्या मंडळींच्या ओटीत प्रसादाचा नारळ घातला व संतती होईल आणि कर्ज फिटेल असा आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे पुढे त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली व त्यांचे सर्व कर्जही फिटले.
या प्रकारे आपल्या सर्व अडचणी दूर करून घेतल्यावर आपल्या प्रमाणेच सर्व लोकांचे कष्ट दूर व्हावेत, सर्व लोक सुखी राहावेत आणि सर्वांना अखंड मंगलाची प्राप्ती व्हावी म्हणून एके दिवशी श्री. शेषो कारदगेकर यांनी श्रीस्वामी महाराजांना अशी प्रार्थना केली की, "माझ्या प्रमाणेच सर्व लोकांचे कष्ट निवारण व्हावेत म्हणून श्रीपादश्रीवल्लभांचा धावा करता येईल असे एखादे स्तोत्र सर्वांसाठी करून घ्यावे."
श्री. शेषो कारदगेकर यांच्या इच्छेप्रमाणे श्रीस्वामीमहाराजांनी पुढीलप्रमाणे " घोरसंकटनिवारणपूर्वक श्रीदत्तप्रीतिकारक स्तोत्र " रचून दिले.
।।घोरसंकटनिवारणपूर्वक
श्रीदत्तप्रीतिकारकस्तोत्रम्।।
श्रीपादश्रीवल्लभ त्वं सदैव।
श्रीदत्तास्मानपाहि देवाधिदेव।।
भावग्राह्य क्लेशहारिनसुकीर्ते।।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते।।१।।
त्वं नो माता त्वं पितातापतोधिपस्त्वम्।।
त्राता योगक्षेमकृत्सद्गुरूस्त्वम्।।
त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते।।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते।।२।।
पापं तापं व्याधिमाधिम् च दैन्यम् ।।
भीतिम् क्लेशं त्वं हरा शुत्वदन्यम्।।
त्रातारं नो वीक्ष इशास्तजूर्ते।।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते।।३।।
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता।।
त्वत्तो देव त्वं शरण्यो कहर्ता।
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते।।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते।।४।।
धर्मे प्रीतिम् सन्मतिम् देवभक्तिम्।।
सत्संगाप्तिम् देहि भुक्तिम् च मुक्तिम्।।
भावसक्तिमचाखिलानन्दमूर्ते।।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते।।५।।
श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम्।।*
*प्रपठेन्नीयतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत।।६।।
।।इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितं अघोरकष्टोद्धरणस्तोत्रं सम्पूर्णम्।।
या स्तोत्राला पंडित कै. आत्मारामशास्त्री जेरे यांनी या स्तोत्राचे महत्त्व व माहात्म्य कथन करणारी एक अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली असून त्यातील श्लोकांचा अन्वय, अर्थ व विवरणही लिहिले आहे.
।।घोरसंकटनिवारणपूर्वक श्रीदत्तप्रीतिकारकस्तोत्रम्।।
प्रस्तावना:- कलियुगातील चतुर्थ श्रीदत्तावतार प्रात:स्मरणीय परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमतवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज यांचे वास्तव्य" कुरुगड्डी " या श्रीक्षेत्री असताना त्यांनी हे स्तोत्र अंत:प्रेरणेने निर्माण करून श्रीक्षेत्र नरसोबाच्या वाडीस त्यांच्या आज्ञेने वास्तव्य करून असणारे त्यांचे पट्टशिष्य श्रीमत प.प.नृसिंहसरस्वतीस्वामी- महाराज म्हणजेच प्रसिध्द श्रीदीक्षित स्वामीमहाराज यांच्याकडे पोष्टाने पाठविले. श्रीस्वामी महाराजांचे बहुतेक सर्व लिखाण प.प. श्रीदीक्षित महाराजांकडे असलेले मूळ लिखित ग्रंथ श्रीदीक्षितमहाराजांच्या समाधीनंतर अमरापुरचे ट्रष्टी श्री.कडेकर यांच्याकडे कोल्हापुरात आहेत. मी श्रीक्षेत्र नरसोबावाडीचाच राहणारा व तेथील पुजारी कुलातच जन्माला आलेला असल्याने आणि लहानपणापासूनच सहज भाग्योदयाने श्रीदीक्षित स्वामीमहाराजांचे सान्निध्य लाभल्याने शाळा सुटल्यानंतर सायंसंध्या झाल्यावर श्रीमहाराजांच्या सान्निध्यात "श्रीपंचपदी " भजन करण्याचा लाभ मला होत असे.
श्रीमहाराजांच्या दिव्य मूर्तीचे दर्शन व त्यांची कृपा इतर मुलांप्रमाणे माझ्यावरही होती. श्रीमहाराजांच्याजवळ बसावे, त्यांचे सान्निध्य असावे व असे त्यांचे स्वरूप किंवा महत्त्व न जाणताच मला वाटत होते. त्यांच्याजवळ असेच काही विलक्षण आकर्षण होते. अशा या सहवासात असतानाच हे स्तोत्र श्रीक्षेत्र "कुरुगड्डी " हून श्रीदीक्षित स्वामीमहाराजां- कडे आले व श्रीमहाराजांनी लगेच रात्रीच्या भजनानंतर मलाही ते दिले आणि " हेपाठ करून ये " अशी आज्ञा केली.
त्यांच्या आज्ञेप्रमाणे ते मी पाठ केले व इतर एकादोघांना ते लिहूनही दिले. हे स्तोत्र रोज म्हणण्याची त्यांची आज्ञाही मला झाली व त्याप्रमाणे ते मी म्हणतही असतो. हल्ली तर श्रीक्षेत्र नरसोबाच्या वाडीस रोजच वारंवार हे स्तोत्र म्हटले जाते. या स्तोत्राचा अनुभव अनेक लोकांना आला आहे व येतही आहे. आता हे स्तोत्र सर्वत्र अत्यंत प्रसिद्ध झाली आहे व सर्व भाविक लोक याचा अपूर्व अनुभव घेत आहेत.
काहीजण तर याचा एकशे आठ वेळा पाठ रोज करणारे आहेत व त्यांचे ऐहलौकिक व पारलौकिक कल्याण झालेले दिसत आहे. हे स्तोत्र संस्कृत आहे व हल्ली मलाही काही थोडे संस्कृत काशीतील परमपूज्य पंडित न्यायाचार्य महामहोपाध्याय श्री.वामाचरण भट्टाचार्य गुरूमहाराजांच्या सान्निध्याने "र", " ट ", " फ " का होईना येते. वाडीतील पुजारी कुलोत्पन्न श्री.शिवराम हरी पुजारी यांनी या स्तोत्राचे भाषांतर मराठीत करण्याविषयी शके १८५९ साली प्रेरणा केली. माझ्या बुध्दिमांद्यास अनुसरून श्रीस्वामीमहाराजांची सेवा म्हणून मी हे भाषांतर त्यावेळी करून ठेवले.
" यदेवविद्ययाकरोति " या श्रुतीने अर्थ जाणून केलेल्या स्तोत्रपाठाचा अधिक उपयोग होतो असे आहे.
" यो थेज्ञइत्सकलभद्रमश्रुते " या निरुक्तकारांच्या उक्तीप्रमाणेही अर्थज्ञानाचे महत्त्व आहेच. या स्तोत्रपाठाचा अनुभव मला व इतरांनाही आलेला आहे असे सहर्ष लिहावेसे वाटते.
परमपूज्य श्रीगुळवणी महाराजांच्या वासुदेव निवासातून प्रसिध्द होणाऱ्या "पंथराज " या त्रैमासिकात भाषांतरासहित हे स्तोत्र अशी प्रेरणा श्री.केशवराव जोशी, संपादक, पंथराज, यांना श्रींनी दिली व त्यांच्या आदेशाप्रमाणे मी हे भाषांतर माझे परमभाग्य उदयाला आले असे समजून, त्यांना प्रसिद्ध करण्यास देत आहे.
या स्तोत्रातील दुसऱ्या श्लोकात " नो प्रभो " असे वाक्य आहे. वाडीतील एका शास्त्रीबोवांनी " न: प्रभो " असे जर येथे असते, तर व्याकरणदृष्ट्या बरे झाले असते असा माझ्याजवळ प्रश्न उपस्थित केला. जेव्हा प.प.श्रीटेंबेस्वामी महाराज हे श्रीदत्तावतार आहेत व त्यांची वाणी वज्रलेपाप्रमाणे पक्की आहे तेव्हा यात काही आणखी अर्थ गूढ असला पाहिजे असे मनात आणून मी विचार करू लागलो. तो " अप्रभो " असे पद येथे काढले म्हणजे " नास्तिप्रभुर्यस्य सो प्रभु तत्सबुद्धो अप्रभो सर्वत्र इत्यर्थ न: अप्रभो नोप्रभो," असे वाक्य होऊन मला व त्यांना दोघांनाही आनंद झाला.
पुढे काही दिवसांनी पूज्य श्रीगुळवणी महाराजांच्या भेटीत सहज बोलता बोलता "नो प्रभो " बद्दल विषय निघाला असता श्रीगुळवणी महाराजांनी असे सांगितले की, "प्रत्यक्ष श्रीस्वामी महाराजांना एका संस्कृततज्ज्ञ भक्ताने हाच प्रश्न विचारला व श्रीस्वामी महाराजांनी "अप्रभो " असे येथे पद काढावे, कारण याच श्लोकात "प्रभु " या अर्थी "अधिप " असे पद आले आहे. "त्वंपितात्पो धिप: " असे लिहून पुनः प्रभो लिहिण्यात पुनरुक्ती होईल म्हणून "अप्रभो " असे येथे संबोधन आहे, असे येथे उत्तर दिले व ते पत्र आम्ही पाहिले आहे." असे श्रीमहाराजांचे वाक्य ऐकून मला परमानंद झाला.
मला शंका विचारणारे शास्त्रीबुवा आधीच स्वर्गवासी झाल्याने त्यांना हे वृत्त कळविता आले नाही. एव्हढ्याबद्दलच थोडा विषाद वाटला. असो. काही लोक आपल्या बुद्धिप्रमाणे या स्तोत्रात "न प्रभो " असे म्हणणारे आहेत. त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार करावा म्हणून हे सर्व विस्ताराने येथे लिहिले आहे. आता स्तोत्राच्या भाषांतरास आरंभ करू. प्रथम या स्तोत्राचा श्लोक, त्याचा अन्वय व संक्षिप्त भाषांतर देऊन त्याचे विवरण नंतर केले आहे.यापासून जर भाविक भक्तांना आनंद झाला तर भक्तांहून अभिन्न असणारे श्रीदत्तमहाराज यांनाच तो आनंद झाला असे मला वाटले.श्रीदत्तमहाराज सर्वांचे अखंड कल्याण करोत अशी त्यांच्या श्रीचरणी प्रार्थना आहे.
वास्तविक पाहता कोणत्याही ग्रंथाचा खरा अभिप्राय ग्रंथकर्त्यालाच समजत असतो, परंतु तो अर्थ आता मला श्रीस्वामीमहाराज कसे सांगणार? म्हणून त्यांचे स्मरण करून " अकरणान्ददकरणंश्रेय:।।" या न्यायाने यथामती स्तोत्राचा अर्थ देत आहे. तो श्रीस्वामीमहाराजांनी मान्य करून घ्यावा.
।।श्लोक पहिला।।
श्रीपादश्रीवल्लभ त्वं सदैव। श्रीदत्तास्मानपाहि देवाधिदेव।।
भावग्राह्य क्लेशहारिनसुकीर्ते। घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते।।१।।
अन्वय:- भो देवाधिदेव श्रीदत्त श्रीपाद श्रीवल्लभ भावग्राह्य क्लेशहारिनसुकीर्ते त्वं सदैवा स्मान पाहि अस्मान घोरात्कष्टात उध्दर ते नम:।।१।।
अर्थ:- हे श्रीदेवाधिदेवा! श्रीदत्ता! श्रीपादा! श्रीवल्लभा! श्रीभावग्राह्या ! श्रीक्लेशहारका! श्रीसुकीर्ते!तू सर्वदा आमचे रक्षण कर.आमचा या घोर कष्टातून उद्धार कर.तुला नमस्कार असो.।।१।।
विवरण:- सकल ऐश्वर्यांनी संपन्न सर्व सत्ताधीश असे जे ब्रम्हा, विष्णू, महेश व तदधीन इंद्र, वरून, यम, वायू प्रभृती तेहेतीस कोटी देव या सर्वांना आपल्यापासूनच हे महान ऐश्वर्य प्राप्त झाले असल्यामुळे आपणच सर्व देवांचे अधिदेव आहात. याकरिता इतर सर्व देवांची स्तुती करण्याचे सोडून हे देवाधिदेवा! आम्ही आपल्या श्रीचरणांजवळच आपल्या श्रीचरणांची स्तुती करण्याकरिता आलो आहोत.
सहस्रार्जुन, अलर्क, आयु, यदुराजा, विष्णुदत्त प्रभृती अनेक भक्तांना आपण इहलौकिक साम्राज्यादि लक्ष्मी, स्वर्गादि पारलौकिक संपत्ती व परमनि:श्रेयसरुप मोक्षलक्ष्मी श्री दिली आहे.त्यामुळे श्रीदत्त हे आपले अन्वर्थक नाम आहे.हे ऐकून आम्ही आपल्या श्रीचरणांजवळ आलो आहोत.
श्रुतिस्मृतिपुराणात आपले " आप्तकाम " असे ब्रीद आहे.सर्व सद्गुणांना मंडन करणारे असे आपले श्रीचरणकमल आहेत, असा विचार करून महामाया श्रीलक्ष्मी हिने आपल्या पायांचा आश्रय केला.आपल्यापेक्षा या जगात श्रेष्ठ कोणीही नाही असे पाहून श्रीविषयी आपण विरक्त असताही श्रीनेच आपणास वरले आहे.म्हणून श्री आपल्या पायांचा आश्रय करीत आहेत.अतएव आपणास श्रीपाद, श्री ज्यांचा पायांचा आश्रय करते, हे नाव आहे.भक्तांना श्री देण्यास आपणास कठीण पडणार नाही हे जाणून आम्ही आपल्या श्रीचरणांजवळ आलो आहोत.
श्रीलक्ष्मी मातेने आपला विरह होऊ नये म्हणून आपल्या श्रीचरणांचा आश्रय केला.ती लक्ष्मीरूप श्री आम्हास दिल्यास आपल्या श्रीचरणांचा तिला वियोग होईल अशी शंका येऊ नये, कारण आम्हीही आपले अनन्य भक्त असल्याने आपल्या श्रीचरणांजवळच राहू अर्थात श्रीला आपल्या श्रीचरणांचा वियोग होणार नाही.शिवाय साध्वी स्त्रियांचे कर्तव्य पती आज्ञा पालन करणे हे आहे.श्रीमहालक्ष्मी ही महासाध्वी असल्याने अस्मदनुग्रहरूप आपली आज्ञा ती मोडणार नाही.हे सर्व लक्षात आणून श्रीवल्लभ असे आपण आपले नाव ठेवून घेतले आहे.हे ऐकूनच आम्ही आपल्या श्रीचरणांजवळ याचनेकरिता आलो आहोत.
" आचारातश्रीयम्आप्नोति " आचारापासून लक्ष्मीची प्राप्ती होते, असे " श्रीमनुस्मृती " कारांचे वचन आहे.कलिकालातील लोक अनाचारी असल्यामुळे त्यांना श्री देता येत नाही अशी शंका घेण्याचे कारण नाही, कारण कर्माचरण यथासांग घडणे फार कठीण आहे.श्रीसमर्थांनी " यथासांग तें कर्म कांहीं घडेना " असे उद्गार काढले आहेत म्हणूनच त्यांनी व इतर साधुसंतांनी सोप्या अशा भक्तीमार्गाचाच प्रसार कलिकालात चहूकडे केला.आपणास जाती, आचार, वय, रूप, कुल व शील हे काहीच प्रिय नसून केवळ भक्ती हीच प्रिय आहे.
" भक्त्याहमेकयाग्राह्य: " असे उद्धवास आपण वचन दिले आहे.अजामिळ, गणिका, गृध, व्याध वगैरे अनाचारी व दुराचारी लोकांवरही आपण त्यांची भक्ती पाहूनच अनुग्रह केला व आपले भावग्राह्य म्हणजे भक्तिवश असे ब्रीद गाजविले.तरी आमचा दुराचार व अनाचार यांकडे दुर्लक्ष करून आमच्या भोळ्या भावास आपण वश व्हाल या आशेने आम्ही आपल्या श्रीचरणी शरण आलो आहोत.
देहादिकांच्या ठिकाणी अहंपणा व पुत्रस्त्रियांदिकांवर ममतारुप अज्ञान म्हणजे अविद्या, अस्मिता म्हणजे गर्व, विषयाच्या ठिकाणी आसक्ती म्हणजेच राग, शत्रुत्व म्हणजे अहितकर्ते जे लोक त्यांच्यावर क्रोध म्हणजे द्वेष, जाती कुलशीलादिकांचा अभिमान म्हणजे अभिनिवेश, हे अविद्याअस्मितारागद्वेषाभिनिवेशरूप पाच क्लेश आमच्या अंगी पूर्णपणे वास करीत असल्याने आम्ही कृपेस पात्र नाही.हे जरी खरे असले तरी या सर्व क्लेशांचे समूळ उच्चाटन करणे हे आपले ब्रीद आहे.हे ऐकून हे भो क्लेशहारिन! आपल्या श्रीचरणास आम्ही शरण आहोत.आपण शरणागताची उपेक्षा केलेली ऐकिवात नाही व " मी शरणागताची उपेक्षा करणार नाही," अशी आपली प्रतिज्ञा आहे.तरी आपण ती प्रतिज्ञा मोडणार नाही अशी आमची पूर्ण खात्री आहे.
देवा! आपण मृत सतीपतीला उठविले, अंत्यजाचे मुखातून वेद वदविले, साठ वर्षांच्या वंध्येला कन्यापुत्र दिले, शिरोळग्रामस्थ द्विजस्त्रीला पुत्र देऊन तो मृत झाला असता त्याला पुन्हा जिवंत केले, चोरहतवल्लभद्विजरूप उदिमास वाचविले, दीनकुष्टी विप्राचे अंग सुवर्णमय केले, त्रिविक्रमभारतीला विश्वरूप दाखविले, किडलेल्या काष्ठाचा प्रफुल्लित तरू केला, दीपावळीस अष्टरुप धारण करून स्वभक्तवांछा पुरविली, कुलवाडी शूद्र भक्तास हजारो खंडी धान्य दिले, अमरापूरस्थ द्विजाचे दारिद्रय हरण करून सुवर्णकुंभ दिला, तंतुकाला एका क्षणात श्रीशैल्यास नेऊन आणले व नरकेसरीला " सर्वदेवस्वरूप मीच आहे " असे प्रत्ययास आणले.हे आपले गुणवर्णन करता करता शेषादिक सुध्दा थकले अशी आपली सुकीर्ती आहे.तरी हे श्रीसुकीर्ते! श्रीगुरुराया! या सर्व भक्तांप्रमाणे आमच्यावरही आपण कृपादृष्टी करा व आमची आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक अशी जी सर्व दुःखे, दुःखांपासून व घोर संकटांपासून आमचा उध्दार करा.आमच्या जवळ आपणास वश करण्याकरिता इतर भक्तांप्रमाणे काहीच साधने नाहीत.आमचा केवळ आपणास नमस्कार आहे.आपण नमस्कार प्रिय आहात. त्यानेच आपण संतुष्ट व्हावे व आम्हा दीनांवर अनुग्रह करावा अशी आपल्या श्रीचरणकमलांपाशी आमची अनन्यभावाने प्रार्थना आहे.।।१।।
।। श्लोक दुसरा ।।
त्वं नो माता त्वं पितापतोधिपस्त्वम्।
त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम्।
त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते।।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते।।२।।
अन्वय:-हे अप्रभो विश्वमूर्ते त्वं नो माता त्वं न: पिता त्वं:आस्त्वम् नो आधिपस्त्वम् नो योगक्षेमकृत त्वं न:सद्गुरूस्त्वम् न: सर्वस्त्वम् न: सर्वस्वं अस्मान घोरात्कष्टादुद्धर ते नम:।।२।।
अर्थ:- हे अप्रभो! ( नाही प्रभू ज्याला तो अप्रभू म्हणजे सर्वप्रभो) सर्वप्रभो! विश्वमूर्ते! तुम्ही आमची माता, पिता, मालक, योगक्षेम चालविणारे सद्गुरू व सर्वस्व आहात म्हणून आमचा या घोर कष्टातून उध्दार करा.आपणाला नमस्कार असो.।।२।।
विवरण:-ज्याला दुसरा प्रभू असतो त्याला सप्रभू म्हणतात.देवा! आपण सर्वांचे प्रभू असल्यामुळे " नाही प्रभू ज्याला असे " आपण अप्रभू आहात, सर्वश्वर आहात. सर्व चराचर विश्व ही आपली मूर्ती असल्यामुळे आपण विश्वमूर्ती आहात. भूत,भविष्य व वर्तमान सर्वविश्व हे आपले सगुणरूप आहे.आपले स्वरूप या विश्वाहून वेगळे असे जरी दिसत असले तरी " सर्वंखलविदंब्रह्म " या श्रुतीवाक्याने ते आपले स्वरूपच आहे.
हे श्रीसर्वेश्वरा! श्रीविश्वमूर्ते! मातापिता, आप्तेष्ट, राजा व रक्षक योगक्षेम करणारे म्हणजे प्रपंचात व परमार्थात भक्तास अपेक्षित असेल ते देऊन त्याचे रक्षण करणारे सद्गुरू या सर्व स्वरूपाने आपणच नटलेले आहात व त्या त्या रूपाने सर्व प्रजांचे पालन आपणच करीत आहात.हे मातापितादि सर्व लोक निमित्तमात्र आहेत.आपल्या सत्तेशिवाय जगात कोणतेही कार्य होत नाही.जर आपण पर्जन्यवृष्टीच केली नाही तर प्रजांचे जीवन कोण करील? जर मातेच्या स्तनात दुग्धोत्पत्तीच केली नाही तर माता शिशुचे रक्षण कसे करील? जर आपण सामर्थ्य व ज्ञान दिले नाही तर रक्षक लोक रक्षण कसे करतील? व शिक्षक तरी शिक्षण कसे देतील? तर देवा! आपणच खरे मातापिता वगैरे आहात. हे सर्व लोक खांबसूत्री बाहुल्याप्रमाणे परतंत्र व भवदधीन आहेत.असे आम्ही पूर्णपणे ओळखले असल्याने, आमच्या रक्षणाची किंवा योगक्षेमाची अथवा ज्ञानोपदेशाची याचना इतरांस न करता आमचे सर्वस्व आपण आहात असे जाणून आपल्या श्रीचरणांस आम्ही शरण आलो आहोत.तरी हे सर्वेश्वरा! आम्हाला या घोर संकटातून पार करा.आपल्या श्रीचरणांना आमचा नमस्कार असो.।।२।।
।। श्लोक तिसरा ।।
पापं तापं व्याधिमाधिं च
दैन्यम्।।
भीतिं क्लेशं त्वं हराशुत्व-
दन्यम्।
त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते।।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते।।३।।
अन्वय:- हे ईश त्वं पापं तापं व्याधिं दैन्यम् भीतिं क्लेशं च आशु हर हे अस्तजूर्ते त्वदन्यम् त्रातारं नो वीक्षे अस्मान घोरात कष्टात उध्दर ते नमः।।३।।
अर्थ:-हे श्रीईश्वरा! आपण आमचे पाप, ताप,शारीरिक व्याधी, मानसिक आधि, दारीद्र्य, भीती व क्लेश यांचे सत्वर हरण करा.हे श्रीपीडानाशका! तुमच्यावाचून अन्य त्राता आम्हाला दिसत नाही.याकरिता आमचा या घोर संकटातून उध्दार करा.आपणास नमस्कार असो.।।३।।
विवरण:- हे श्रीईश्वरा! आमच्याकडून या जन्मी पदोपदी घडत असलेल्या कायिक, वाचिक, मानसिक, सांसर्गिक, ज्ञात व अज्ञात अशा सर्व पापांचे हरण करा.तसेच पूर्वीच्या अनंत जन्मांमध्ये साठलेल्या कायिकादि सर्व पापांचे समूळ उच्चाटन करा.तसेच पांचभौतिकांपासून होणारे आधिभौतिक ताप, भूत, प्रेत, पिशाच्चयक्षराक्षसादिकां-पासून होणारे आधिदैविक ताप, शरीरास व्याधी रूपाने व मनास आधिरूपाने जे पीडा करतात त्यांचा समूळ उच्छेद करा.सर्व सद्गुणांवर आच्छादन घालणारी दरिद्रता, व्याघ्रादि हिंस्त्रप्राणी व शत्रू, यमधर्म इत्यादिकांपासून वाटणारी भीती व पूर्वी वर्णन केलेले व त्याहून इतर सर्व जे क्लेश आम्हास फार पीडा देतात त्या सर्वांचा नायनाट करा.पूर्वी रोगांनी सर्व प्रजा व्याप्त झाल्या असता श्रीअत्रिऋषी व श्रीपतंजलींचा अवतार धारण करून औषध योजनेने सर्वांची शारीरिक पीडा आपण नष्ट केली.भूतप्रेतसमंधादिकां-पासून होणारी मानसिक व शारीरिक आधिव्याधी आपण घालविली.याबद्दल शिरोळ ग्रामीची द्विजस्त्री प्रभृतींची कथा ऐकिवात आहे व प्रत्यही आरतीसमयी शेकडो लोकांची बाधा दूर होत असलेले अनुभवात आहे.याकरिता आपणच खरे " नष्ट झाली आहे जूर्ती म्हणजे पीडा ज्यांच्यापासून असे अस्तजूर्ती " आहात. हे जाणून आम्ही आपणास शरण आलो आहोत.आमच्या शरीरात आजन्म वास करीत असलेले आधिव्याधी व कामक्रोधादि समंध यांचा समूळ उच्छेद करा. आपल्या वाचून दुसरा कोणीही त्राता आम्हास दिसत नाही." भय नाशन " असे आपले ब्रीद आहे.तरी हे अस्तजूर्ते! आमचा या घोर संकटातून उध्दार करा.आपणाला आमचा नमस्कार असो.।।३।।
।। श्लोक चौथा ।।
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता।त्वत्तो देव त्वं शरण्योकहर्ता।
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते।।४।।
अन्वय:- हे देव त्वत्तोन्यस्त्राता न, दाता न,भर्तापि न, त्वं शरण्य: अकहर्तासि हे अत्रेय अनुग्रहं कुरु हे पूर्णराते घोरात्कष्टादस्मानुद्धर ते नमः।।४।।
अर्थ:- हे देवा! आम्हास तुझ्यावाचून त्राता नाही.दाता नाही.भर्ताही नाही.तू शरणागत रक्षक व दुःखहर्ता आहेस.हे अत्रेया! आमच्यावर अनुग्रह कर.हे पूर्णकामा! घोर संकटापासून आमचा उध्दार कर.तुला नमस्कार असो.।।४।।
विवरण:- हे देवा! आम्हाला आपल्याशिवाय दुसरा त्राता कोणीही नाही.जगामध्ये आई, बाप, बंधू, बहीण वगैरे पुष्कळ त्राते आहेत, अशी सर्वांची समजूत आहे, परंतु खरा त्रातेपणा आपल्या ठिकाणी आहे.श्रीतुकाराममहाराजांनी आपल्या अभंगात
काळाची ही उडी पडेल बा जेव्हां।
सोडविना तेव्हां मायबाप।।
सोडविना बंधू पाठीची बहीण।।
शेजेची कामीण दूर राहे।।
सोडविना राजा देशाचा चौधरी।
आणिक सोयिरी भली भली।।
तुका म्हणे तुज सोडविना कोणी।।
एका चक्रपाणी वाचोनियां।।
असे वर्णन करून आपल्याशिवाय दुसरा त्राता नाही असे दर्शविले आहे.अंती धन जागच्या जागी राहते, पशु गोठ्यात, भार्या गृहद्वारात, जन स्मशानापर्यंत व देह चितेपर्यंत येतो.सर्वदा बरोबर राहून रक्षण करणारे आपणच आहात. आपण धन-धान्यादिकांची समृद्धी व सद्बुद्धी दिल्यास इतर लोक दानशूर होतात.म्हणून आपल्यावाचून दाताही कोणी नाही.याप्रमाणे अन्नादिकाने दीन जनांचे पोषण करणारे लोक केवळ निमित्तपात्र आहेत.खरे पोषक भर्ता आपणच आहात. श्रीभगवन! आपण शरणागतांचे रक्षक व आश्रय असे आहात. आजपर्यंत अनेक शरणागतांना आपण आश्रय देऊन त्यांचे रक्षण केले म्हणून आपले शरण्य हे ब्रीद आहे.आपण पूर्णराती म्हणजे पुर्णकाम व नित्यतृप्त आहात.आमच्यापासून आपल्यास कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही.तरी हे श्रीअत्रिसुता ! श्रीअत्रिऋषी व श्रीअनसूया यांच्या भक्तिभावास भुलून जशी त्यांच्यावर कृपा केलीत तसाच अनुग्रह आपण आमच्या ठिकाणी भक्ती वगैरे काही नसताही करावा व आम्हास या घोर कष्टातून उद्धरावे. आमचा आपल्याला नमस्कार असो.।।४।।
।। श्लोक पाचवा ।।
धर्मे प्रितिं सन्मतिं देवभक्तिम्।
सत्संगाप्तिम् देहि भुक्तिं च मुक्तिम्।।
भावा सक्तीम् चाखिलानन्दमूर्ते।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।।५।।
अन्वय:-हे अखिलानन्दमूर्ते देव! धर्मे प्रितिं सन्मतिं भक्तिम् सत्संगाप्तिम् भुक्तिं मुक्तिम् भावासक्तिम् च देहि अस्मान घोरात्कष्टादुद्धर ते नमः।।५।।
अर्थ:- हे अखिलानंदकारमूर्ते श्रीदेवा! आम्हाला धर्माच्या प्रीती, भक्ती, मुक्ती व भक्तीच्या ठिकाणी आसक्ती देऊन सर्व घोर कष्टातून आमचा उध्दार कर.तुझे श्रीचरणारविंदी आमचे शतशः प्रणाम असो।।५।।
विवरण:-हे श्रीदेवा! अखिलांना आनंद देणारी अशी आपली मूर्ती आहे.आपण धारण केलेल्या सगुणरूपाकडे पाहात बसले असता सर्वांना परमानंद होतो.सर्वानंदाचा अंतर्भाव ज्यामध्ये होतो असा जो ब्रम्हानंद त्या ब्रम्हानंदाची आपण मूर्ती आहात. आपल्या मनोहर निर्गुण पादुकांकडे व वदन कमलाकडे पाहणाऱ्यांची क्षुधा व तृषा हरून जाऊन " ब्रम्हानंदी लागली टाळी। कोण देहाते सांभाळी।। " अशी अवस्था होते.तेथून चित्तवृत्ती बाहेरच येत नाही.यदाकदाचित प्रारब्धवशात जर ती चित्तवृत्ती बाहेर आलीच तर हे देवा ! पुन्हा ती आपल्या आनंदमय स्वरूपात लीन होण्याकरिता आपल्या भागवत धर्माच्या ठिकाणी व तदनुकूल श्रुतिस्मृत्युदित धर्माच्या ठिकाणी आमच्या अंतःकरणात प्रीती असावी.दुर्बुद्धीचा लय होऊन सर्वदा सतस्वरूपाच्या ठिकाणी चित्तवृत्ती ठेवण्यास आम्हास चांगली बुद्धी असावी आणि ती बुद्धी सती म्हणजे पतिव्रतेसारखी एकनिष्ठ व अव्यभिचारिणी अशी व्हावी.प्रारब्धकर्मवशात कोणत्याही योनीत जरी वारंवार जन्म आले तरी आपल्या श्रीचरणारविंदी आमची दृढ भक्ती असावी.आपली अखंड सेवा आमच्या हातून घडावी.आपल्या स्वरूपात अखंड लीन असणारे संत व श्रीसद्गुरू यांची अखंड संगती असावी.दारिद्र्यादिकांपासून संतसंगतीत विघ्न न यावे म्हणून भुक्ती म्हणजे जे पोटभर अन्न व वस्त्र अर्थात प्रपंचातील कोणत्याही गोष्टीची उणीव नसावी.सर्व सांसारिक बंधनांचा नाश होऊन अखंड, अद्वितीय, परिपूर्ण आणि सच्चीदानंद अशा आपल्या स्वरूपाशी ऐक्यरुप जी मुक्ती तीही व्हावी व मुक्तीच्या नंतरची जी भक्ती तिच्या ठिकाणी सर्वात्मना अंतःकरणात आसक्ती असावी.आपल्या यश:कीर्तनाने व नामस्मरणाने ब्रह्मांड गाजविण्याचे सामर्थ्य जिच्या ठिकाणी आहे अशी जी भावासक्ती, ज्ञानोत्तर भक्ती ती निरंतर हृदयात असावी, अशी आमची अखेरची व निर्वाणाची प्रार्थना आहे.तरी देवा! श्रीपादश्रीवल्लभा!! श्रीनृसिंहसरस्वते!! आमचा घोर अशा संकटातून उध्दार करून आमच्या सर्व कामना परिपूर्ण कराव्यात.आमच्या जवळ आपणास संतुष्ट करण्यास दुसरे काहीच नाही म्हणून आपल्या श्रीचरणकमलास आमचे अनंत प्रणाम असोत.।।५।।
।।श्लोक सहावा।।
श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम्।।
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत।।६।।
अन्वय:-लोकमंगलवर्धनमेत च्छलोपंचकं नियत:
य: भक्त्या प्रपठेत स श्रीदत्तप्रियो भवेत।।
अर्थ:-श्रीसद्गुरूनाथ महाराज असे म्हणतात की, सर्वांचे कल्याण करणारे हे श्लोकपंचक नियमपूर्वक नित्यश: भक्तिभावाने जो पठण करील तो मनुष्य श्रीदत्तांना अत्यंत प्रिय होईल व श्रीदत्तही उत्तरोत्तर या भक्ताला प्रिय होतील असा माझा आशीर्वाद आहे।।६।।
।। श्रीगुरुदेवदत्त ओमतत्सत श्रीगुरुदेव दत्त।।
।। श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।।
अशा रीतीने हे स्तोत्र श्रीस्वामीमहारांजाकडून मिळाल्यावर श्री.शेषो कारदगेकर यांनी आपली उपास्य देवता श्रीव्यंकटेश्वर यांवरहीएक पद करून देण्यासंबंधी श्रीस्वामीमहाराजांची प्रार्थना केली.त्यांच्या प्रार्थनेप्रमाणे त्यांनी पुढील पद तयार करून दिले.
।। श्रीवेंकटरमणाचे पद।।
शेषधरावरि जो हरि राहे।
वेंकट ईश्वर मेश्वर नोहे।।
निद्रित जो द्रुतकामित दे हा।
मुद्रित जेथिल भाविती देहा।।१।।
जो नवकोट्यधिपेश्वर वित्त।
अक्षय राहत जेथिल वित्त।
मत्त खलान्तक पातकहर्ता।
चित्तचमत्कृतिकारक कर्ता।।२।।
जो जगदीश रमेश मुकुंद।
कुडमलदन्त लसत मुकुंद।
मुक्त करो निज भक्तजनांते।
भक्तिविना न च जो धरि नातें।।३।।
श्रीगुरुदेव दत्त
- साभार सोशल मीडिया