शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By Author स्नेहल प्रकाश|
Last Updated : शनिवार, 4 एप्रिल 2020 (18:00 IST)

देवी दुर्गे.... भवानी

सध्या चैत्रातील देवीचे नवरात्र बसले आहे त्या निमित्ताने. मला माझ्या आसपास भेटलेल्या दुर्गा -
1) गिरीजाबाई खूप आशेनी येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांकडे बघत होती. गेल्या चार दिवसांपासून तिच्या मालाची विक्री झाली नव्हती. गडावरून बायका माणसे परतत होती तेव्हा ही कुंकू विकत घेण्याचा आग्रह करीत होती. मी तिला तसेच 50/- रु देवू केले तर रागावली.... आजपर्यंत मी गडावरच्या देवीचे दर्शन घेतले नाही पण तिच्या नावानी उगाच पैसे नाही घेणार.... भक्ति रुपेण संस्थिता

2) डॉ. नीताच्या घरी आज सप्तशप्तीचा पाठ होता. खाली दवाखाना वर घर. पूजा सुरू असताना अचानक दारात डीलिवरी साठी एका आदिवासी बाईला घेऊन तिचा नवरा आला. तिची स्थिति गम्भीर होती. डॉ. ने पूजेचे सूत्र नातेवाईकांवर सोपवले. डॉ. च्या त्वरित प्रयत्नांमुळे गोंडस मुलीचा जन्म झाला.. डॉ. मनोमन समाधान पावल्या... पूजा जन्माला आली होती.... कर्तव्य रुपेण संस्थिता

3) नविन दुर्गम भागात यजमानांची बदली झाली. सगळेच अनोळखी गाव. कविताच्या लक्षात आले आजुबाजुची मुले शाळेत न जाता टवाळक्या करीत फिरत असतात. कविताने आधी त्यांना खाऊ घालण्याचे आमिष दाखवून शिक्षण देण्यास सुरुवात केली. आज 60 मुले तिच्याकडे विनामूल्य शिकतात आणि शाळेतही जातात... विद्या रूपेण संस्थिता

4) योगेशची तब्येत खलावू लागली तसा डॉ. नी किडनि ट्रांसप्लांटचा सल्ला दिला. त्याच्या सासुबाई लगेच तयार झाल्या त्यांची किडनी द्यायला... त्याग रूपेण संस्थिता

5) बाकीच्यांनी केलेल्या गैरव्यवहारामुळे शीलाजींच्या ऑफीसवर बालंट आलं. आपण येथे फसू म्हणून इतर लोक राजीनामा देवून मोकळे झालेत. पण शीलाजींनी सगळी संकटे झेलत मालकांच्या पाठीशी उभ्या राहील्या..... निष्ठा रुपेण संस्थिता

ह्या माझ्या आजुबाजुच्या दुर्गांकडून बरेच काही शिकून त्यांचे ओज मला प्राप्त होवो हीच आई जगदम्बेकडे प्रार्थना.
विनीत - स्नेहल खंडागळे