शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

कपाळी गंध कशासाठी लावायचे ? ते नेमके कुठे लावावे ?

कपाळावर गंध लावण्याची पद्धत हळू-हळू कमी होत चालली आहे. गंध लावून बाहेर जाण्यास आजच्या काळी कमी पणा वाटतो. वास्तविक कपाळी गंध लावण्याचे अनेक फायदे आहेत. त्याच प्रमाणे गंधाद्वारे बुद्धीचे आश्रयस्थान असलेल्या मस्तकाची पूजा करण्याचाही हेतू आहे म्हणूनच ईशपूजनानंतर पूजकाने आपल्या कपाळी गंध लावण्याची प्रथा पडली. गंध म्हणजे केवळ कपाळाची शोभा नव्हे, तर बुद्धीचेही पूजन आहे. ईश्वर हे साध्य, तर बुद्धी हे साधन असल्याने बुद्धीची पूजा करणे आवश्यकच आहे!
 
गंध हे मांगल्याचेही प्रतीक आहे. कपाळी गंध लावलेला माणूस आणि गंध न लावलेला माणूस यातला फरक लगेच लक्षात येतो. गंधामुळे माणूस शुचिर्भूत बनतो. त्याचा चेहऱ्यावर मांगल्याचे भाव दिसू लागतात. आकाशाने देखील यासाठीच सूर्य-चंद्ररूपी दोन तिलक दिवसा व रात्री धारण केले आहे. मात्र हे गंध दोन्ही भुवयांच्या मध्ये (आज्ञाचक्रात) कधीही लावू नये. ते त्या वरील भागात लावावे. कारण आज्ञाचक्राच्या ठिकाणी असलेला सुप्तावस्थेतील तृतीय नेत्र बंद होता कामा नये.
 
नित्य गंध लावणारा मरणोत्तर वैकुंठलोकी जातो असे धर्मशास्त्र सांगतात.गंध लावण्याचा अधिकार प्रत्येक वर्णातील पुरुषाला आहे; श्रीकृष्णाचे उपासक उभे गंध लावतात, तर शिव उपासक आडवे गंध लावतात. गंध चंदनाचे, केशराचे, रक्तचंदनाचे व गोपीचंदनाचे जसे आवडेल तसे लावावे. बाहेर जाताना गंध लावून जाण्याची लाज वाटत असेल, तर निदान देवपुजेनंतर तरी कपाळी गंध आवर्जून लावावे.