1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 7 डिसेंबर 2020 (14:49 IST)

वाराणसीचे कालभैरव

आज कालभैरव जयंतीतनिमित्त  ....
वाराणसं भैरवो देवः । संसारभ नाशनः।
अनेक जन्मकृतं पापम् । स्मरणेन विनश्यति ॥
 
देवाचे अनेक अवतार भक्तांचा अहंकार नाहीसा करून त्याला सद्‌बुद्धी आणि त्याचे मन निर्मळ बनविण्यासाठी झाले आहेत. अहंकार सर्वस्वाचा नाश करतो. ज्याने या विश्वाची निर्मिती केली, ज्याने या विश्वाच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली अशा देवांनाही या अहंकाराची बाधा झाली. मग, सर्वसामान्यांची काय व्यथा !
 
भगवंत या आपल्याला जडलेल्या अहंकाराला लीलया दूर करतो. त्याला फक्त समजून घेता आले पाहिजे. कालभैरव हा निर्गुण निराकार व वैराग्यशील भगवान शंकरांचा अवतार मानला जातो. याच्या जन्माची अजबच कहाणी आहे. भगवान शंकर यांचा भोळा स्वभाव तर सर्वश्रुतच आहे. परंतु जसा त्यांचा स्वभाव शांत, गंभीर आहे, तसाच तो भयंकर उग्रही आहे.
 
हा स्वभाव अगदी कामदेवांपासून ते त्यांच्याच पार्षदांमधल्या पुष्पदंतापर्यंत सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे त्यांची सुचेष्टा सुद्धा करण्याचे धारिष्ट्य कोणत्याही देवांमध्ये नाही. याविषयी शिवपुराण खूप काही सांगून जाते. तसेच या भयंकर रागातूनच चांगले धारिष्ट (अवतार) निर्माण झाल्याचे कथा पुराण सांगते. ‘रूतं राति इति रूद्रः'..... रुद्र हा म्हणजे दुःख आणि राती म्हणजे नाश करतो. दुःखांचा समूळ नाश करणारा तो रुद्र. दुःख म्हणजे अविद्या किंवा संसार. रुद्र म्हणजे अविद्येतून किंवा संसारातून निवृत्त करणारा. या रुद्राचा अंशावतार म्हणजेच भगवान काल भैरव. यांच्याही जन्माची कथा विलक्षण सुंदर आहे. स्वयम् ब्रह्मदेवालाही अहंकाराच्या बाधेने सोडले नाही.
 
एकदा भगवान शंकरांच्या अनुपस्थितीत सुमेरु पर्वतावर सर्वच देव, ऋषी, महात्मे एकत्र जमले असताना जमलेल्या देवात सर्वश्रेष्ठ कोण ही चर्चा रंगली. काहीजण विष्णू श्रेष्ठ म्हणू लागले, तर काही जण ब्रह्मदेव श्रेष्ठ म्हणू लागले. यातून दोन्ही देवांना अहंकाराचा वारा जडला. आता या दोघांमध्येच श्रेष्ठत्वावर वाद सुरू झाला व त्याचे क्रोधात रूपांतर झाले. जेव्हा सामान्य  माणसे भांडतात तेव्हा त्यातून विनाश निर्माण होतो. संत-महात्मे वाद घालतात त्यातून विचार बाहेर पडतो. परंतु जेव्हा देव भांडतात तेव्हा त्यातून तेज (नवनिर्माण) बाहेर पडते.
 
त्याप्रमाणे त्या क्रोधरुपी तेजातून एक दिव्य बालक प्रकट झाले. त्या बालकाच्या हातामध्ये त्रिशूल होता. तो अतिशय भयंकर आवाज करणारा व प्रखर होता. ते मूल लहान असूनही सर्वांना काळ वाटू लागले.
 
स्व्‌य शंकरानेच हा श्रेष्ठत्वाचा वाद मिटवा म्हणून हा अवतार धारण केला होता. परंतु अहंकारग्रस्त देव अधिकच उन्मत झाले आणि ब्रह्मा, विष्णू त्याचे पितृत्व स्वीकारू लागले. अहंकारग्रस्त ब्रह्मदेवांनी शंकरांची अवहेलना करायला सुरुवात केली. त्यांच्याबद्दल अपशब्द बोलण्यास सुरुवात केली. तेव्हा कालभैरव चिडले व त्यांनी हाताच्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचे पाचवे शिर कापून टाकले.
 
तेव्हा या शक्तिसंपन्न बालकास सर्वजण शरण आले आणि सृष्टी शांत झाली. त्यावेळेपासून ब्रह्मदेवाला चतुर्मुख म्हणणस सुरुवात झाली. कालभैरवाने ब्रह्मदेवाचे शिर उडविल्यामुळे त्याला ब्रह्महत्येचे पातक लागले.

प्रायश्चित्त म्हणून त्यास श्री शिवाने काशीचे रक्षण करण्यास सांगितले आणि म्हणून काशीचे रक्षण कालभैरव करतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे काशीला गेल्यावर सर्वप्रथम कालभैरवाचे दर्शन घेऊन, काळा गंडा बांधतात. कुत्रे हे वाहन असलेल्या कालभैरवाची विशेष पूजा रविवार, मंगळवार व प्रत्येक महिन्याच्या वद्य अष्टीला करतात. कालभैरवाला अमर्दक-दुष्टांचे दमन करणारा, पापाभक्षण- पापक्षालन करणारा, कामराज-मत्युदेवता इ. नावाने ओळखू लागले.
 
काळभैरवाचे आठ अवतार मानले जातात. महांकाळ, बटुक भैरव, स्वर्णाकर्षण भैरव अशी तीन स्वरुपे आहेत व ईशान, चंडेश्वर, मृत्युंजय, मंजुघोष, अर्धनारेश्वर, क्षेत्रपाळ, नीलकंठ, दंडपाणी, दक्षिणामूर्ती वीर, हे आठ प्रमुख अवतार मानले जातात. कालभैरवाची निर्मिती कार्तिक वद्य अष्टमीला झाल्यामुळे कालभैरव जयंती कार्तिक व अष्टमीला संपन्न केली जाते....॥
॥ देवराज सेवन पावनाब्धि पंकजं ।
व्याल यज्ञ सूत्रमिंदू शेखरं कृपाकरम् ।
नारदादि योगीवृंद वंदितं दिगंबरम् ।
काशिका पुराधिनाथ काल भैरवम् भजे....॥
विठ्ठल जोशी