रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

कालरात्री देवी दुर्गेचे सातवे रूप

दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'सहार' चक्रात स्थिर झालेले असते. यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या साक्षात्कारापासून मिळणार्‍या पुण्याचा तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते. 
 
या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार आहेत. 
 
कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे. तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खड्ग (कट्यार) आहे. 
 
कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयाकारी आहे. परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव 'शुभंकारी' सुद्धा आहे. यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे. या देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त असतात. कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे.
 
मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणार्‍या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे.
 
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थित।
लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरी‍रिणी।।
वामपादोल्लसल्लोहलताकंटकभूषणा।
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भययंकारी।। 

Edited By- Priya Dixit