बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 19 जून 2024 (11:17 IST)

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय अकरावा

॥ श्रीगणेशाय नम: ॥
धर्म प्रश्नकरी यदुवीराप्रती ॥ कथा निवेदन करी आह्मांप्रती ॥ जेणें सर्व दोष हरती ॥ पर्वत जळती पापाचे ॥१॥
कुंतीनें पंडुजवळी ॥ शोक सीमा सांडिली ॥ आतां आमुची वंशावळी ॥ कैसा वंश वाढला ॥२॥
कृष्णा तूं आमुचा प्राणसखा । संदेह आमुचा फेडी देखा ॥ तूं आमची कुळदेवता ॥ तुजवीण कोडें कोण पुरवील ॥३॥
जगीं धन्य तुम्हीं पांडव ॥ अससी तूं आमुचा केशव ॥ दिनबंधु रमाधव ॥ संशय फेडी आमुचा ॥४॥
कुंतीनें शोक केला दारुण ॥ कोणें केलें समाधान ॥ कैसें झालें शोक निरसन ॥ सांगि कथा समूळ हे ॥५॥
ऐसें ऐकोनी वचन ॥ संतोषला नारायण ॥ म्हणे धर्मावीण ॥ असे कोण दुजें मज ॥६॥
मी भक्तवचन मान्य करी ॥ मज भक्त आवडती निर्धारीं ॥ लक्ष्मी होऊन भक्तावरी ॥ प्रीति माझी सर्वथा ॥७॥
मच्छ कूर्मादि अवतार ॥ भक्तालागीं घेतले निर्धार ॥ भक्त माझी मुनेश्वर ॥ म्हणवी सेवक भक्तांचा ॥८॥
मी निर्गुण निराकार ॥ मज सर्वथा नाहीं आकार ॥ भक्त जनासी निर्धार माझे मज अंतरीहो सत्य ॥९॥
स्वामी सेवेसी सादर ॥ चरणतीर्थे सेवी वारंवार ॥ क्षणक्षणा करी नमस्कार ॥ सप्रेमं चित्ती सर्वदां ॥१०॥
शंकराचे करी आराधन ॥ निराहार पत्रें खाऊन । दर्भासनी करी शयन ॥ धरिले मौन्य सर्वथा ॥११॥
धर्मसेन राजा पुण्यराशी ॥ हेमाद्री पर्वती गेला तपासी ॥ मौन्य धरोनी मानसी ॥ तपानुष्ठान करीतसे ॥१२॥
ऐसें तप करी नृपती ॥ आनंदयुक्त सदा चित्तीं ॥ गुप्त राहोनी एकांती ॥ न कळे कोणा दुसरीयातें ॥१३॥
ऐका इकडील वर्तमान ॥ धर्मसेनाची स्त्रीं पतिव्रतारत्न ॥ रजस्वला झाली गुणनिधान ॥ परी स्वामी जवळी नसेची ॥१४॥
तों पातला चतुर्थ दिवस ॥ व्यकुळ झाली राजस ॥ पतिवीण शरीरास ॥ समाधान वाटेना ॥१५॥
व्याकुळ जाहली वेल्हाळी ॥ मग आठवीत चंद्र्मौळी ॥ पति आज भोगकाळीं ॥ आणून कोण भेटवीं ॥१६॥
तो विचार केला मानसीं ॥ पत्र लिहिती झाली कैसी ॥ विज्ञापना लिही स्वामी सत्वर यावें म्हणोनिया ॥१७॥
आजि असे चवथा दिन ॥ तुम्हावीण जाऊं पाहे प्राण ॥ अनुष्ठान सोडून ॥ भोगकाळी यावें ॥१८॥
मग सेनपक्षी बोलाविला ॥ पत्रिका बांधिली त्याचिया गळां ॥ हिमालयीं जावें सत्वरां ॥ घेऊन येईं प्राणेश्वरा ॥
उपकार न विसरे तुझा मी ॥२०॥
मग सेनपक्षी उडाला सत्वर ॥ गेला जेथें राजेश्वर ॥ केला साष्टांग नमस्कार ॥ सन्मुख राजयाचे बैसला ॥२१॥
राजा पाहे तेवेळां ॥ पक्षी कंठी पत्रिका सबळा ॥ बांधली ते सोडून भूपाळा ॥ वाचिता झाला तेधवां ॥२२॥
परिसोनी स्त्रियेची विनंती ॥ राजा सद्गद झाला चित्तीं ॥ नेत्रीं अश्रुधारा लोटती ॥ विनंती स्त्रियेची ऐकोनी ॥२३॥
मग राजा करी विचार ॥ आरंभिलें अनुष्ठान दुर्धर ॥ जावें तरी व्रतभंग थोर ॥ न जातां पाप मस्तकीं ॥२४॥
तो राजयाचे रेत गळालें ॥ तें राजयानें वरिचेवरी झेंलिलें ॥ द्रोणामध्यें घातलें ॥ जवळी दिलें सेनपक्षीच्या ॥२५॥
पक्षी घेवोनी तें रेत ॥ गगन पंथें उड्डाण करीत ॥ तो दुसरा पक्षी अकस्मात ॥ मार्गी भेटला तयासी ॥२६॥
मनी विचारी पक्षी सेन ॥ ह्मणे हा जातो मास घेऊन ॥ आपुला भक्ष आहे म्हणून ॥ हिरोनि घ्यावया धांविन्नला ॥२७॥
दोघांचे तेव्हां युध्द झालें ॥ रेत द्रोणातून पडियेलें ॥ तेथे जळ होतें पहिलें ॥ रेत पडिलें मगरी मुखीं ॥२८॥
ते मगरी नव्हे निश्चिती ॥ गंधर्व तनया होती सत्य ॥ ऋषी शापे निमित्त ॥ जळीं मगरी ते जाहली ॥२९॥
तिनें तें रेत देखोनी ॥ भक्ष आहे जाणोनी मनी ॥ तत्क्षणी भक्षोनी ॥ झाली गर्भीण मगरी ते ॥३०॥
तों सेन पक्षी किंचीत रेत ॥ घेऊनी आला राणी जवळ त्वरित ॥ पूर्ण केला मनोरथ ॥ राणीस रेत देखोनी ॥३१॥
ऐका इकडील अनुसंधान ॥ ढिवर आला मत्स्यघ्न ॥ सत्स्य धरी जाळें घालोन ॥ त्यातें गरी सांपडली ॥३२॥
मगरीचें तेज पाहोन अंती ॥ विस्मीत झाला वर चित्तीं ॥ तिचे पोट चिरीता निश्चिती ॥ तो आंतून निघाला आणि पुत्र ॥३३॥
दोघे अति लावण्यरासी ॥ जैसें दिसती मित्रशशी ढिवर विचारी मनासी ॥ हे नेऊन द्यावें रायातें ॥३४॥
मग ते दोघे ढिवर घेवोन ॥ दिलें राजयास नेऊन ॥ राजानें विलोकून पुत्ररत्न ॥ कन्या दिधली ढिवराप्रती ॥३५॥
ढिवरें कन्या घरी आणून ॥ पाळी सप्रेमें करुनी ॥ मत्स्यगंधा नाम तियेलागोनी ॥ ठेविता झाला तेधवां ॥३६॥
एके काळीं ढिवर संपूर्ण ॥ माध्यान्हास आला चंडकिरण ॥ गेले घरास भोजना लागुन ॥ नौका रक्षणार्थ ठेविली
मच्छगंधा ॥३७॥
एकटिच तेथें सुंदर ॥ तों स्नानासी पातला पाराशर ॥ महातपस्वी ऋषेश्वर ॥ विद्यावंत अती पैं ॥३८॥
तों केवळ प्रतापी दिनकर ॥ चळचळां कांपती सर्वत्र ॥ अन्यायें देखतां दुस्तर ॥ शासन करी ब्रह्मादिका ॥३९॥
ऐसा तो पाराशर मुनी ॥ काय वदे मच्छगंधेलागुनी ॥ म्हणे नौका इकडे आणि ॥ मज पैलतीरीं न्यावया ॥४०॥
संध्या करावयास जावें सत्वर ॥ तात्काळ आणी न लावी उशीर ॥ न आणिता श्राप दुर्धर ॥ सध्याच भस्म करीन ॥४१॥
ते ह्मणे स्वामी ऋषी ॥ नौका फिरवितां नये मशीं ॥ कैसें न्यावें पैलतीरासी ॥ हें तो मज कळेना ॥४२॥
ऋषी ह्मणी तिजलागुन ॥ ढिवर जैसे फिरविती जाण ॥ तैसेंच तूं करी शहाणपण ॥ नौका सत्वर आणिकां ॥४३॥
चाल आणि सत्वर ॥ नको लावू उशीर ॥ अस्तमाना जाईल दिनकर ॥ मग तुज मी श्रापीन ॥४४॥
येरी भयाभीत होवोन ॥ नौका फिरविती झाली कोण ॥ पैलतिरासी जावया जाण ॥ ऋषी आंत बैसविला ॥४५॥
ऋषी पैलतीरासी जाऊन ॥ करी स्नान अघमर्षण ॥ संध्या सूर्य अर्धप्रदान ॥ पूजा सकळ सारोनिया ॥४६॥
आली ऋषीसी घेऊन ॥ मुनी पाहे न्याहाळून ॥ स्वरुप तिचें लावण्य देखोन ॥ ऋषी कामातुर जाहला ॥४७॥
संध्यावंदन विसरला ॥ ऋषी कामानें व्यापिला ॥ लावण्य़ देखोन ते वेवळा ॥ ऋषीस कामज्वराने व्यापिले ॥४८॥
जैसी रंभा कुरुवंशी ॥ तिचें स्वरुप निश्चयेसी ॥ तिसी देखुन महाऋषी ॥ पंचशरें भेदिला ॥४९॥
ऋषी बोले तिजलागुन ॥ मी तुजला भोगीन ॥ ऐसें ऐकुण वचन ॥ येरी भयाभीत जाहली ॥५०॥
म्हणे स्वामी मी कुमारी निश्चित ॥ मजसीं भोगितां नाही उचित ॥ तुम्ही महाऋषी म्हणत ॥ कर्म ऐसें करुं नये ॥५१॥
येरु म्हणे ऐक सुंदरी ॥ कामें मज पिडिले भारी ॥ येई सत्वर बैस अंकावरी ॥ सरत युध्द करुं आतां ॥५२॥
येरी म्हणे आहे चंडकिरण ॥ येतां जातां पाहती जन ॥ तो ह्मणी मी सूर्य अच्छादीन ॥ अंधार आतां पडितों ॥५३॥
मग ऋषीनें नवल केलें ॥ सूर्य असतां अंधकार पाडिले ॥ सूर्य आच्छादिला तयेवेळे ॥ कारणें अद्भुत ऋषीचे ॥५४॥
मग ते दोघेजन ॥ क्रीडा करिती आनंदेकरुन ॥ हर्षयुक्त दोघांचे मन ॥ झालें सर्वथा तेकाळीं ॥५५॥
क्रीडा परिपूर्ण करुनी ॥ गर्भ राहिला मच्छगंधेलागुनी ॥ मग ते भयाभीत झाली मनी ॥ ऋषीलागीं बोलत ॥५६॥
ऋषीराया मी कुमारी तत्वतां ॥ गर्भ राहिला यास काय करावें आतां ॥ ऐसें ढिवरास समजतां ॥ तात्काळ बाहेर
घालतील ॥५७॥
ऋषी म्हणे वो चिंता न करी ॥ पुत्र जन्मेल तुझ्या उदरीं ॥ व्यास नामें उर्वीवरी ॥ होईल तो विख्यात ॥५८॥
अष्टादश पुराणें करील जाण ॥ भारत करी मुखें आपण ॥ ऐसा पुत्र परम सूज्ञ ॥ होईल तुजला सत्यसत्य ॥५९॥
जयासी मानील त्रिभुवन ॥ हरिहर वंदिती जयालागुन ॥ केवळ साक्षात्‍ आदि नारायणा ॥ तुझे पोटीं अवतरेल ॥६०॥
ऐसें वेदोन पाराशर ॥ तीस ठेविलें आपुल्या समोर ॥ आश्रमीं नवमास निर्धार ॥ पुत्र जन्मेल महाभारता ॥६१॥
नवमास भरलीयावर ॥ पुत्र प्रसवली सुंदर ॥ सूर्याशून्य आणि निर्धार ॥ ऐसी कांति पुत्राची ॥६२॥
जन्मतांची व्यासऋषी ॥ प्रदक्षणा करुनी मातेसी ॥ नमस्कार करुन तयेसी ॥ केला साष्टांग व्यास मुनेश्वर ॥६३॥
कला बध्दातळी ॥ मतेची स्तुती आरंभिली ॥ जयजय अंबे काळीं ॥ पुढती लोटांगण घालीत ॥६४॥
आज्ञा मागून म्हणे आतां ॥ योजनपर्यंत सुवास तत्वता ॥ शरिरी तुझ्या सुटेल आतां ॥ सत्य वचन जननीये ॥६५॥
जेकां संकट पडेल दारुण ॥ तेव्हा करी माझें स्मरण ॥ तैसा मी येईन धांवोन ॥ संकट तुझें निरसीन लवलाहे ॥६६॥
माता म्हणे कुमारा ॥ माझियासुता परमउदारा ॥ जाऊं नको दातारा ॥ मजला टाकुनी ॥६७॥
येरू म्हणी पितृआश्रमाप्रति ॥ जातो माते खेद न मान चित्तीं ॥ चिंतन करिसी तेव्हा निश्चितीं ॥ चरणाजवळी येईन
तुझ्या ॥६८॥
पुढती नमस्कार घालोन ॥ व्यास गेले पितृआश्रमालागुन ॥ केले पित्यासी नमन ॥ प्रदक्षणा करीतसे ॥६९॥
उभा ठाकला जोडून कर ॥ पितृस्तुती करी वारंवार ॥ पुढती घालोनी नमस्कार ॥ प्रेमभावें सद्गदीत ॥७०॥
राहिला पितृत्या आश्रमी ॥ सेवाकरी दिवारजनी ॥ पितृचरण भावें करुनी ॥ आज्ञा मस्तकी वंदित ॥७१॥
इकडे योजनगंधा व्यासाची माता ॥ तो पितृगृहीं आली तत्वता ॥ पुढें शांतनुराजा वरिता ॥ जाहला योजनगंधेसी ॥७२॥
आतां श्रोते व्हावें सावधान ॥ पुढें कथा पुण्यपावन ॥ ते ऐका भाव धरोन ॥ दरिद्र न बांधी तयासी ॥७३॥
कोकिळाव्रताचा महिमा ॥ वर्णु न शके शंकर आणि उमा ॥ कोकिळा पूजन मोक्षधामा ॥ जाती नरनारी सर्वथा ॥७४॥
कोकिळेची पूजा करुन ॥ मग करावें यथामती श्रवण ॥ तयासी घडे गंगास्नान ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥७५॥
इति श्रीस्कंदपुराणे ॥ ब्रह्मोत्तरखंड ॥ कोकिळामहात्म्ये एकादशोऽध्याय: ॥ अध्याय ॥११॥ ओवी ॥७५॥
 
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ अध्याय ११ वा समाप्त ॥