॥ श्रीगणेशाय नम: ॥
धर्म म्हणे जी श्रीपती ॥ ऐका सेवकाची विनंती ॥ कथा वदावी शीघ्रगती ॥ पुण्यपावन असे जी ॥१॥
ऐकतांच पातकाचा नाश ॥ कथा वदे पुराणपुरुष ॥ जन्मपूर्वी पांडवास ॥ झाला कैसा तो सांगीजे ॥२॥
आणि भीष्माचा झाला जन्म ॥ तोही सांगिजे उत्तम ॥ स्वामी तू दयानिधी परिपूर्ण ॥ कथा सेवकांसे वदावी ॥३॥
आह्मासी एक तुजवीण ॥ दुसरा आहे रक्षिता कोण ॥ दासावरी कृपा करोन ॥ कथा सांगीजे पूर्वीची ॥४॥
कौंतियाचा जन्म सांगीजे ॥ पडिले संकट दूर कीजे ॥ म्हणूनी श्रीहरीचे चरणाबुजे ॥ हरिति झाले सप्रेम ॥५॥
हरि म्हणे धर्मा सावधान ॥ कथा श्रवण करी उत्तम ॥ तुवां पुसिला भीष्म जन्म ॥ आणि पांडु कैसा जाहला ॥६॥
कथा हे परम पुण्यदायक ॥ श्रवणें पातकें जळती अनेक ॥ जी कां घडलीं ब्रह्महत्यादिक ॥ श्रवणें भस्म तात्काळ ॥७॥
सर्वदा भाग्य आणि जय ॥ श्रवणें त्यास प्राप्त होय ॥ धर्मा आतां सावध होय ॥ कथा आतां श्रवणकीजे ॥८॥
पूर्वी जंबुद्विपाचे ठायीं ॥ कथा एक वर्तली पाही ॥ शांतनु राज्याचे गृहीं ॥ गंगा आली स्त्रीरुपें ॥९॥
शांतनु राजा बहुत सुलक्षण ॥ करी गौ ब्राह्मण प्रतीपालन ॥ तपस्वी उदार परिपूर्ण ॥ शुरत्व त्याचे न वर्णवे ॥१०॥
सदा सादर हरिभजनी ॥ स्वरुप जैसा वासरमणी ॥ प्रजापाळी सुखेंकरुनी ॥ निशिदिनी शुचीळ ॥११॥
त्या रायाचे घरी जाण ॥ गंगा स्वयें स्त्रीरुप घेवोन ॥ येती झाली आनंदें करुन ॥ रजा सुज्ञ पाहुनियां ॥१२॥
गंगा येवोनी त्या सान्निध ॥ राया प्रति बोले शब्द ॥ माझें वचन मानिसी सुबध्द ॥ तरी तुज वरीन मी ॥१३॥
मी जें जें बोलेन वचन ॥ तें तें त्वा सत्य करावें जाण ॥ होती मजला पुत्र निधान ॥ ते त्वां गंगेसी अर्पण करावें ॥१४॥
जरी माझे वचन न मानिसी ॥ तेचवेळे मी जाईन निश्चयेसी ॥ वचन मानिता तुझ्या गृहासी ॥ राहीन मी चिरकाल ॥१५॥
अवश्य म्हणे राजेश्वर ॥ मान्य करीन निर्धारें ॥ माझ्या वचनीं विश्वास थोर ॥ धरोनिया राहिजे ॥१६॥
न करिताचि अनुमान ॥ राहिजे स्वस्थ चित्तें करुन ॥ तुझें मान्य करीन वचन ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥१७॥
ऐसें क्रमितां कांही काळ ॥ पुत्र प्रसवली वेल्हाळ ॥ जैसे कां रत्न निर्मळ ॥ तैसा पुत्र जाहला ॥१८॥
गंगा म्हणे राजयालागुनी ॥ हा पुत्र गंगेत द्यावा टाकुनी ॥ ऐसें ऐकताच कर्णी ॥ पुत्र टाकिला गंगेत ॥१९॥
याच प्रकारें करुन ॥ टाकिले सात पुत्र नेऊन ॥ आठवा भीष्म भक्त जाण ॥ परम लावण्य जन्मला ॥२०॥
जैसा उगवला चंडकिरण ॥ तैसा भीषं सुलक्षण ॥ पाहुन राजयाचें मन ॥ परम हर्षित जाहलें ॥२१॥
गंगा म्हणे राजयाप्रती ॥ बाळ गंगेत टाकिजे शीघ्रगती विलंबन करावा निश्चिती ॥ तात्काळ नेऊनि टाकावा ॥२२॥
ऐसें ऐकतांचि वचन ॥ सद्गदित झालें राजयाचें मन ॥ म्हणे येवढें पुत्र निधान ॥ न टाकी गंगेत सर्वथा ॥२३॥
ममवंशी नाहीं सुपुत्र ॥ येव्हढा मी ठेवीन निर्धार ॥ पुत्राविण सुने मंदिर ॥ दिसतसे सर्वथा ॥२४॥
ज्याचे कुळी पुत्र नाहीं जरी ॥ व्यर्थ जन्म त्याचा संसारी ॥ जो असे निपुत्रिक नरनारि ॥ व्यर्थ भूभार त्याचा पैं ॥२५॥
पुत्रवंशीं नसतां जाण ॥ त्याचे घरी न घ्यावें अन्न ॥ प्रात: काळी त्याचे दर्शन ॥ न घ्यावें सर्वथा ॥२६॥
म्हणोनी गंगे येवढा पुत्र ॥ गृहीं ठेवीन पवित्र ॥ न टाकी नेऊन गंगेंत ॥ ऐसें माझे मनी वाटे ॥२७॥
वचन गंगेनें ऐक्कून ॥ परम भयभीत झालें मन ॥ म्हणे राजया माझा वध करुन ॥ मग पुत्र घरीं ठेविजे ॥२८॥
राजा मी न करीन तुझा वध ॥ तूं आणि हा पुत्र दोघे असावे शुध्द ॥ या गोष्टीचा न मानावा खेद ॥ सुखें रहावे दोघांनी ॥२९॥
गंगा म्हणे मी न राहे आतां ॥ जाईन मी ठिकाणी सर्वथा ॥ शांतनु म्हणे माझीया सुता ॥ जतन करी आतां तुं ॥३०॥
मग ते निघाली वेगेसीं ॥ येऊन मिळाली गंगेसी ॥ पुढें कथा वर्तली कैसी ॥ ते ऐकावे धर्मराया ॥३१॥
शांतनु राजा राज्य करी ॥ भीष्मपुत्र निर्धारी ॥ कांही दिवस लोटलीयावरी ॥ एक अपूर्ण वर्तले ॥३२॥
निद्रिस्त असता राजेंद्र ॥ रात्री स्वप्न पाहिलें विचित्र ॥ कि योजनगंध परमपवित्र ॥ भोगिली आनंदे सेजेवरी ॥३३॥
ऐसें स्वप्न देखें राजेश्वर ॥ प्रधानाप्रती सांगे सत्वर ॥ प्रधान म्हणती लाभ थोर ॥ स्वप्नामाजी झाला तुह्मां ॥३४॥
मग निवेदन करी भिष्मासी ॥ म्हणे स्वप्नीची दशा ऐसी ॥ जो सत्य करील निश्चयेसी ॥ तोचि सखा माझा पैं ॥३५॥
भीष्म म्हणे अहो ताता ॥ योजनगंधा आणितां आतां तरीच तुमचा पुत्र तत्वतां ॥ जन्मा येऊनी सार्थक ॥३६॥
पितृवचन जो करि सत्य ॥ तरी तो जन्मोनियां काय व्यर्थ ॥ जननी कष्टविली निश्चित ॥ मुख न पहावे तयंचे ॥३७॥
ताता मज आज्ञा दीजे ॥ योजनगंधा आणितो सहजें ॥ चितांमनसी न करिजे ॥ जातों शोधावया तयांच्या ॥३८॥
तेथोनि निघाला गंगापुत्र ॥ शोधिता झाला गंगातीर ॥ योजनगंधाचा शोध साचार ॥ न लागेची कोठेंही ॥३९॥
तों पहाता झाल एक नगर ॥ अति विस्तीर्ण सुंदर ॥ नगराजवळी ढिवर ॥ राहत होते बहु कीं ॥४०॥
तेथें योजनगंधा होती ॥ तें पाहून भीष्म विस्मीत चित्तीं ॥ म्हणे हे योजनगंधा निश्चिती ॥ स्वरुप लावण्य बहु हिचे ॥४१॥
भीष्म म्हणे ढिवरालागुण ॥ कन्या ही तुमची सगुण ॥ शांतनु राजा अतिउत्तम ॥ त्यासी लग्न करुन दीजे ॥४२॥
ढिवर म्हणे तूं कोण ॥ येरू म्हणे मी शांगनुनंदन ॥ मम माता गंगा जाण ॥ तिजपासून जन्म माझा ॥४३॥
आतां हे योजनगंधेसी ॥ द्यावी शांतनु रायासी ॥ न देतां युध्द तुह्मांसी ॥ करुनियां नेऊं आतां ॥४४॥
ऐसें ऐकतांचि ढिवर ॥ एकीकडे करी विचार ॥ इजलागी होती पुत्र ॥ ते तंव सेवक तुमचे ॥४५॥
ऐसें ऐकतांचि भीष्म ॥ म्हणे तेच राज्य करिती उत्तम ॥ मी त्यांचा सेवक जाण ॥ राज्य न करी सर्वथा ॥४६॥
मी असे ब्रह्मचारी ॥ मजला लग्न करणें नाहीं निर्धारीं ॥ जितक्या स्त्रिया पृथ्वीवरी ॥ तितुक्या मज गंगेसमान ॥४७॥
राज्य करतील इचे पुत्र ॥ मी सेवाकरीन निर्धारें ॥ ऐसें ऐकोनि ढीवर ॥ परम चित्ती आनंदले ॥४८॥
भीष्मा आतां शांतनुलागुण ॥ जाय सांग वर्तमान ॥ कन्या दिधली सत्यवचन ॥ अन्य भाषण नसेची सर्वथा ॥४९॥
मग गंगात्मज निघाला ॥ तात्काळ शांतनु जवळी आला ॥ वर्तमान सर्व सांगितला ॥ वर्तला जो ढीवरगृही ॥५०॥
राजा ऐकोनी आनंदला ॥ म्हणे तूं माझा पुत्र खरा ॥ माझेम वचन तूं निर्धारा ॥ सत्य केलें आज पैं ॥५१॥
मग योजनगंधेचे लग्न ॥ लाविलें यथाविधी करुन ॥ शंतनु राजा तीस घेऊन ॥ आले आपल्या स्वस्थाळी ॥५२॥
कांही एक दिवस लोटलियावरी ॥ गरोदर झाली सूंदर ॥ पुत्र प्रसवली निर्धारी ॥ चित्रविचित्र दोघेजण ॥५३॥
परम सुंदर सुलक्षण ॥ पराक्रमी अत्यंत जाण ॥ शंतनु राजा तयालागुन ॥ राज्य देता जाहला ॥५४॥
शांतनु अनुष्ठान करी पवित्र ॥ राज्य करिती दोघे पुत्र ॥ गंगात्मज दिवसरात्र ॥ सेवक धर्मे सांभाळी ॥५५॥
योजनगंधेची जाण ॥ सेवा करी भीष्म आपण ॥ अहोरात्र पादसेवन ॥ करीतसे आनंदें ॥५६॥
तो चित्रविचित्र विचारी मनी ॥ भीष्म अहोरात्र मातेच्या सदनी ॥ काय करितो न कळे करणी ॥ तरी आतां हे अवलोकू ॥५७॥
ऐसें ते दोघेजण पापमती ॥ अंतरी पाप भरलें निश्चिती ॥ मग गुप्त रुपें बैसोन एकांत ॥ भीष्म काय करीतसे ॥५८॥
तो भीष्म मातेजवळी येत ॥ मातेची सप्रेमे सेवा करीत ॥ हे पाहूनि दोघे विस्मित ॥ झाले चांडाळ तेव्हा ते ॥५९॥
गंगात्मजे सेवा करुनी बाहेर ये तत्क्षणीं ॥ मग ते दोघे येऊनी चरणी ॥ गंगात्मजाचे लागले ॥६०॥
जोडोनिया दोन्ही कर ॥ उभे राहिले समोर ॥ म्हणती पाप ज्यांचे अपार ॥ त्यास प्रायश्चित काय दिजे ॥६१॥
भीष्म बोल यथार्थ वचन ॥ रानशेणी गोवर्या आणुन ॥ त्याचा कीजे महा अग्नी ॥ त्यांत देह होमिजे ॥६२॥
मग दोघांही तैसेंच केलेम ॥ देह आपुले जाळिले ॥ हे वर्तमान भीष्मास कळलें ॥ तो परम शोकें विव्हळ ॥६३॥
शांतनु आणि योजनगंधा ॥ त्यांच्या शोकास नाही मर्यादा ॥ म्हणती श्रीहरी मुकुंदा ॥ कैसी गती जाहलीसे ॥६४॥
राज्य पाडिले शून्य ॥ पुढें नाही वंश जाण ॥ दोघांच्या स्त्रिया लहान ॥ अंबा आणि अंबिका ॥६५॥
ह्या काशेश्वराच्या कुमरी ॥ गंगात्मेजें युध्द करुनी निर्धारी ॥ अंबा अंबिलिका सुंदरी ॥ तिघी आणिल्या ते समयीं ॥६६॥
अंबिका दिधली चित्रांगदास ॥ अंबा दिधली चित्रसेनास ॥ राहिली अंबालिका तीस ॥ भीष्म कदा न अंगिकारी ॥६७॥
ते म्हणे भीष्मासी ॥ तूं अंगिकारि माझा निश्चयेसी ॥ येरू म्हणे वचन परियेसी ॥ मज तूं गंगेसमान ॥६८॥
ते म्हनें सर्व पुरुष तुजवीण ॥ मज आहेत काशेश्वरा समान ॥ न करिसी अंगिकार जाण ॥ अग्निप्रवेश करीते मी ॥६९॥
हा ह्मणे मी न करी अंगिकाएर ॥ तिनें अग्नीत देह त्यागिला सत्वर ॥ भीष्मासी श्राप दिधला थोर ॥ म्हणे नपुसक तूं होसी ॥७०॥
पुढें चित्रकेतू चित्रागदास ॥ ठिकाण नाही वंशास ॥ म्हणोनी चिंता वर्तली सर्वास ॥ काय उपाय करावा ॥७१॥
तो व्यास योजनगंधेचा नंदन ॥ तयाचें केलें चिंतन ॥ तो व्यास आला धांवोन ॥ संकटसमय जाणोनी ॥७२॥
ते कथा पुढे सुरस ॥ वाढेल शांतनुचा वंश ॥ चित्रविचित्राच्या स्त्रियांस ॥ पुत्र होतील निर्धारें ॥७३॥
ऐकता ही कथा ॥ दूर होईल व्यधी व्यथा ॥ कोटि यागाचे फळ तत्वतां ॥ श्रवणमात्रें पावितो ॥७४॥
कोकिळा महात्म्य सुंदर ॥ स्कंदपुराणीचें मत परिकर ॥ कोकिळाव्रत करितां साचार ॥ वैधव्य स्त्रियांसी नसेची ॥७५॥
॥ इतिश्री स्कंदपुराणे ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळा महात्म्ये ॥ नवमोऽध्याय: ॥७६॥
अध्याय ॥९॥ ओवी ७६ ॥
॥ अध्याय ९ वा समाप्त ॥