शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

लक्ष्मी आई आली

lakshmi devi ke mantra aur chandra grahan
लक्ष्मी आई आली
तूं ग आल्याली जाऊं नको
बाळाचा माझ्या
धरला पालव सोडूं नको
 
लक्ष्मी आई आली
आली बैलाच्या ग नकीं
माजा ग बाळराजा
धड्यानं सोनं जोकी
 
लक्ष्मी आई आली
आली शेता नि शिवारांत
सावळ्या बाळराजा
पाणी तुझ्या कीं घागरींत
 
लक्ष्मी आई आली
आली शेताच्या बांधासडीं
माझा ग बाळराजा
हातीं गोफण पाया पडी
 
लक्ष्मी आई आली
धर माज्या तूं पदराला
नेणती माझी बाळ
धनी दावून देतो तुला
 
लक्ष्मी आई आली
धर माझ्या त्या हातायाला
पित्या माझ्या दौलताच्या
दोघी जाऊं त्या शेतायाला
 
लक्ष्मी आई आली
उभी राहिली मधल्या बांधा
जडावा माझा बंदु
कुरी रेटीतो गोरा चांद
 
लक्ष्मी आई आली
हातीं तांब्या तो अमृताचा
जडाव्या बंधुजीचा
वाडा विचारी समृताचा
 
लक्ष्मी आई आली
धरी हाताची करंगळी
पित्या माज्या दौलताची
चल दावीतें सोपामाळी
 
लक्ष्मी ग आई
चल शीवेच्या शेता जाऊं
चल धावेव हुबा र्‍हाऊं
 
लक्ष्मी ग आई
चारी कोपर आमी पाहूं
हिरीं बारवीं पाणी पिऊं
 
लक्ष्मी ग आई
चल आमुच्या शेतायाला
दुवा पित्याला दियाला
 
लक्ष्मी आई आली
तांब्यानं ताक पेली
बंदुरायाला माज्या
गवळ्याला हांक दिली
 
लक्ष्मी आई आली
मोत्यापवळ्यांनी वटी भरा
झाल्या तिन्ही सांजा
दिव्याची ग वात करा
 
लक्ष्मी आई आली
आली पांगळ्या पायाची
बंदूला करती बोली
न्हाई परत जायाची
 
लक्ष्मी आई आली
आली उठत बसयीत
माज्या ग हावशाचा
वाडा गवळ्याचा पुसयीत
अस्तुरी पुरुषाचा
दोनीचा नित्य दावा
 
लक्ष्मी आई बोल
मी उगीच आली देवा
अस्तुरी पुरुषाचं
दोनीचं एक चित्त
 
लक्ष्मी आई बोल
मी आल्यानं न्हाई हित
 
ईश्वबीराच्या पिंडीं
बेल वाहिला शिळाताजा
ताईता बंदू माजा
पुत्र मागून आला राजा
 
ईश्वबीराच्या पिंडीं
सासू मालन माजी गेली
हळदीकुंकवाची
रास खंडूनी मला दिली
 
ईश्वबीराच्या पिंडीं
बाई म्यां वाहिल पिवळ सातू
बाळाईचं माज्या बाळ
हौससारक माज नातू