।। प्रसाद हा देवाचा प्रतिसाद ।।

ghee prasadam
Last Modified गुरूवार, 4 एप्रिल 2019 (11:08 IST)
एका छोटय़ाशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहापाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते. गावातला तरुण म्हणाला,“थोडा वेळ आहे. भैरीच्या देवळात जाऊन येऊ !’’माझ्या सोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱयावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते. “फार जागृत ठाणे आहे, सर ! सगळे गाव मानते.’’गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला.
देवळात गेलो. मी नमस्कार केला. गुरवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला. मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला. मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरव म्हणाला, “बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते! गुरुजी फार भला माणूस. सगळं गाव शानं केलं. कुठं अडू द्या-नडू द्या; देवासारखं गुरुजी पळत येनार. पण नशिबानं त्यांना न्याय दिला नाही !’’गुरवाच्या या वाक्मयाने मी कान टवकारले. गुरुजींचे जीवन समजून घेण्यासाठी गुरवाला एक-दोन प्रश्न विचारले. गुरुजींची जीवन कथा ऐकून मी स्तब्ध झालो. तरुण मुलगा अकाली गेला. लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला. मुलगी माहेरी आली. बायकोला दोन्ही धक्क्याने वेड लागले. तिला सावरून, उभी करून गाडी रुळावर येत होती तेव्हाच मुलीने जीव दिला. एकमेकांच्या आधाराने ते दोघे उभे राहिले. सारे गावच कुटुंब बनवले. गुरुजींनी केलेले कार्य मला माहीत होते, पण ही सारी दु:ख भरली कहाणी माहीत नव्हती.
कार्यक्रम छान झाला. निघताना मी आणि माझा मित्र गुरुजींचा निरोप घ्यायला मुद्दाम गेलो. मी निघताना गुरुजींनी न राहवून विचारले, “हे सगळे कसे सहन केलेत?’’गुरुजी म्हणाले, “आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही. चिरफाड नाही. चिडचिड नाही. प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण? चवीचा विचार नाही करत. ताजे-शिळे म्हणत नाही. त्याला पेढा, मला गूळ का म्हणत नाही. घेतो. खातो. धन्य होतो. हे कधी विसरलो नाही. प्रसाद देवाचा प्रतिसादच मानला !’’माझे डोळे भरून आले. मी वाकून नमस्कार केला. छान हसून माझा हात हातात घेतला. स्पर्श आणि हास्याचा जणू मला त्यांनी प्रसादच दिला !
सहज बोलणे हित उपदेश

गुरुजींशी झालेल्या संवादातून केवढा हितोपदेश मिळाला; तोही सहजच ! प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले तर जगणे किती सुंदर बनून जाते हे मला समजले. मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा राहोच, चर्चाही करत नाही. कुणाला चार शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्तासा ! कुणाला काजूचा तुकडा असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱयाचा लाभ होईल ! आपण प्रसाद घेतो. खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यातील प्रसंग ! जे वाटय़ाला आले ते आपल्या इष्टाचा प्रतिसाद मानले की सारी घालमेलच संपते. लोटीभर पाण्याने मिळणारे समाधान, पळीभर तीर्थाने का मिळते? तीर्थ असो की प्रसाद तो तर आपल्याला मिळालेला प्रतिसाद असतो. मिळाले त्यात आपल्या जिवलगाचा अंश असतो. गुरुजींशी झालेल्या मुक्त संवादाने मी आतून उजळून निघालो.

प्रसाद पोटभरीचे साधन नाही. ताटभरीचेही नाही. हे कुणी लक्षात का घेत नाही. मी अनेक ठिकाणचे महाप्रसादाचे कार्यक्रम पाहतो. भंडाराही म्हणतात त्याला. सप्ताहात एकदाही प्रवचन-कीर्तनाला न आलेले महाप्रसादाला मात्र गर्दी करतात. सहकुटुंब तर येतातच पण घरातल्या न आलेल्यासाठी ‘टिफीन’भरूनही नेतात. गोरगरीबांनी अशी झुंबड केली तर एकवेळ समजू शकते. पण चांगल्या घरातली मंडळी असे वागताना पाहून दु:ख होते. भरभरून घेतातच पण संपले नाही तर तसेच टाकूनही देतात. हा काही प्रसाद नाही. महाप्रसाद तर मुळीच नाही.
एकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवरा-आवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी भेटेल?’’सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढय़ात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’वृद्धेला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली,“पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं ! परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’मला तिचे पाय धरावे वाटले. आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी ! मन प्रसन्न असेल ना; तर मणाने नाही कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले.
हव्यास आणि हट्ट सोडणे महत्त्वाचे

परमार्थ वेगळे काय शिकवतो ? आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे‘प्रासादि’क होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो तसा कणा कणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो. पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन… शेवटी ओंजळ रिक्तच राहते. असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे. एकदा ते मिळाले म्हणताना, आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळहातावर मिळालेला गोपाळकाला, स्वत:साठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो!
गोपाळकाला मला खूप आवडतो. दहिहंडी फुटली की धडपडून, प्रयत्नपूर्वक गोळा करायचा आणि मग गपकन् एकटय़ानेच न खाता सगळय़ांना वाटायचा ! हेच तर कृष्णतत्त्व आहे. कृष्ण देतच राहतो. देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो. परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोडय़ातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे. ही तयारी म्हणजेच धार्मिकता ….
एका छोटय़ा गावातल्या गुरुजींशी बोलून हा माझा स्वत:शीच संवाद होत होता आणि माझ्या बरोबर आलेला मित्र माझ्याकडे बघत होता. “भैरीच्या देवळातला प्रसाद तुला थोडा कुबट वासाचा वाटला नाही?’’माझ्या मित्राने विचारले. मी म्हणालो, “प्रसादाची चव नाही तर देवाने घातलेली प्रतिसादाची कव मला गोड वाटते !’’माझा मित्र तर्क लढवत होता. चिकित्सा करत होता. उपहास करत होता. मी मात्र आगळय़ाच आनंदात स्वत:शी संवाद करत होतो. प्रसाद आणि प्रतिसादाने माझ्या मनात तृप्तीची पौर्णिमा उजळली होती.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

महाभारत कथा : अंबा, अंबिका, अंबालिका कोण होत्या...

महाभारत कथा : अंबा, अंबिका, अंबालिका कोण होत्या...
अंबा ही महाभारतात काशीराजची कन्या होती. अंबाला अजून 2 बहिणी अंबिका आणि अंबालिका असे. ...

काही वस्तूंविषयी शुभ- अशुभ शकुन

काही वस्तूंविषयी शुभ- अशुभ शकुन
जेवताना आपल्या पुढचे ताट सरकले तर आपल्या घरी पाहुणा येणार अशी आपली समजूत आहे आणि तो शुभ ...

रमजान ईद होणार सोमवारी

रमजान ईद होणार सोमवारी
मुस्लीम बांधवांची रमजान ईद (ईद उल-फित्र) सोमवारी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती रयते ...

पाळीव पशू-पक्ष्‍यांचे जीवनात महत्त्व

पाळीव पशू-पक्ष्‍यांचे जीवनात महत्त्व
घरात कुठल्याही पाळीव प्राणी पाळण्याआधी बहुदा ज्योतिष किंवा वास्तुशास्त्रांचा सल्ला घेतला ...

रमजान महिन्यातील शुक्रवारचे महत्त्व

रमजान महिन्यातील शुक्रवारचे महत्त्व
आजचा शुक्रवार हा या रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार (जुमा) आहे. याला जुमातुल विदाअ ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...