सोमवार, 26 सप्टेंबर 2022
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified सोमवार, 20 डिसेंबर 2021 (08:59 IST)

संकष्टी चतुर्थी संपूर्ण माहिती

हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणार्‍या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात 12 आणि ज्या वर्षी अधिकमास आल्यास त्या वर्षी 13 संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्वाचा भाग आहे.
 
संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. हे व्रत पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते. हे व्रत दोन प्रकारांनी करतात. एक असते ती मिठाची संकष्ट चतुर्थी व दुसरी पंचामृती चतुर्थी. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. यासाठी मोदक करण्याची पद्धत आहे. त्यानंतर भोजन करावे. या व्रताचा काल आमरण, एकवीस वर्षे किंवा एक वर्ष असा आहे. व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितले आहे.
 
जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी असे म्हटले जाते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते. संकष्टी करणार्‍यांनी उपोषण सोड्ण्यापूर्वी नेहमी, पुढे दिलेले "संकष्टी चतुर्थी महात्म्य" अवश्य वाचावे. 
उपवास कधीपासून सुरु करावा
शास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीच्या उपवासाची सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी पासून केला जाते. संकष्टी चतुर्थी सलग 21 संकष्टी धरून व्रताचे उद्यापन करावे. काही भक्त आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईपर्यंत संकष्टी धरतात तर बहुतेक जण आयुष्यभर देखील संकष्टी चतुर्थी धरतात.
 
संकष्टी चतुर्थी व्रत करण्याची सोपी विधी
या दिवशी सकाळी लवकर पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी.स्नान केल्यानंतर घरातील मंदिरात दिवा लावावा.
 
दिवसभर गणेश चिंतन करुन उपवास करावा.
संध्याकाळी स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ अगर गव्हाची लहानशी रास करावी.
त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा. 
तांब्याभोवती दोन वस्त्रे गुंडाळावी, त्यावर ताम्हन ठेवून त्यात गणपतीची स्थापना करावी. आपण श्री गणपतीची सोने, चांदी, तांबे वगैरे धातूची मूर्ती अगर तसबीर ठेवू शकता.
याची षोडोपचारे पूजा करावी. 
पूजा करणार्‍याने लाल वस्त्र धारण करावे. 
पूजेत तांबड्या रंगाचे गंध-अक्षता-फुलं-वस्त्र वाहायचे असतात.
पूजेत उपचार अर्पण करताना, लंबोदराय नम: म्हणून गंध, कामरुपाय नम: म्हणून अक्षता, सिद्धिप्रदाय नम: म्हणून पुष्प, सर्वार्थसिद्धिदाय नम: म्हणून फळ, शिवप्रियाय नम: म्हणून वस्त्र, गणाधिपाय नम: म्हणून उपवस्त्र, गजमुखाय नम: म्हणून धूप, मूषकवाहनाय नम: म्हणून दीप, विप्रनाथाय नम: म्हणून नैवेद्य आणि धनदाय नम: म्हणून दक्षिणा अर्पण करावी. 
पूजा झाल्यावर ध्यानमंत्र म्हणावं- 
रक्तांग रक्तवस्त्रं सितकुसुमगणै: पूजितं रक्तगंधै:॥ 
क्षीराब्धो रत्नदीपे सुरतरुविमले रत्नसिंहासनस्थम् ॥ 
दोर्भि: पाशांकुशेष्टा भयध्रुतिरुचिरं चंद्रमौलिं त्रिनेत्रं ॥ 
ध्यायेच्छांत्यर्थमीशं गणपतीममलं श्रीसमेतं प्रसन्नम् ॥ 
नंतर आपले संकट निवारण्याची व मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करावी. 
मम समस्तविघ्ननिवृत्त्यर्थ संकष्टहरगणपतीप्रीत्यर्थ चतुर्थीव्रतांगत्वेन यथा मीलोतोपचार द्रव्यै: षोडोपचारे पूजां करिष्ये ॥ असे म्हणावे. 
नंतर पुढे दिलेले "संकष्ट चतुर्थी महात्म्य" वाचावे. 
21 मोदकांचा नेवैद्य दाखवून आरती करावी. 
आरती झाल्यावर - अशुद्धमतिरिक्तं वा द्रव्याहीनं मया कृतम् । तत सर्व पूर्णतां यातु विप्ररुप गणेश्वर ॥ असे म्हणून साष्टांग नमस्कार घालावा. 
नंतर चंद्रोदयाची वेळ पंचांगांत दिलेली असते ती बघून चन्द्रदर्शन करुन, चंद्राला अर्घ्य, गंध, अक्षता, फुले वाहून त्याची पूजा करावी. 
"रोहिणीनाथाय नम:" म्हणून नमस्कार करावा. 
नंतर उपोषण सोडावे. 
जेवणात मोदक किंवा गोड पदार्थ असावे, खारट आंबट पदार्थ नसावे.
जेवण झाल्यानंतर उत्तर पूजा करुन मूर्ती अगर तसबीर उचलून ठेवावी. 
धान्य वापरण्यात घ्यावे. पाणी तुळशीत ओतावे.
अथर्वशीर्ष पाठ करावा.
महत्त्व
या पवित्र दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळते. 
या दिवशी उपवास केल्याने श्रीगणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते. 
धार्मिक मान्यतेनुसार संततीप्राप्तीसाठीही संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. हे व्रत करुन चंद्र दर्शन केल्यानंतर गणेश पूजन करुन ब्राह्मण भोजन द्यावे. याने अर्थ- धर्म-काम-मोक्ष अभिलाषित पदार्थ प्राप्त केले जाऊ शकतात, असे स्वयं गणपतीने म्हटले आहे.
 
काय खावे काय नाही?
बरेच लोक दिवसभर व्रत करतात आणि संध्याकाळी जेवण करतात. अशा परिस्थितीत उपवासानंतर कांदा, लसूण, बीट, गाजर आणि फणस खाण्यास मनाई आहे. उपवासाच्या दिवशी ते खाणे टाळा. या दिवशी कोणत्याही वस्तूत तुळशीचा वापर करू नका आणि तुळशीचे सेवन करू नका.
 
संकष्ट चतुर्थी व्रत कथा
एकदा गणपती उंदरावर बसून जात असताना त्यांना कोणीतरी हसत आहे असे ऐकू येते. गणपती वर बघतात तर चंद्र आपल्यावर हसत आहेत असे त्यांना कळतं. हे पाहून गणपतीला राग येतो आणि ते चंद्राला शाप देतो की आजपासून तुझे तोंड काळे पडणार आणि तुझ्याकडे कुणीही बघणार नाही आणि जर पाहिले तर त्यावर चोरीचा आळ येईल.
 
यावर मोठे तप करुन चंद्र गणपतीला प्रसन्न करतात. तेव्हा गणपती चंद्राला शापातून मुक्त करतात मात्र त्याला सांगतात की भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी म्हणजे गणेश चतुर्दशी तुझे तोंड कुणीही बघणार नाही आणि जर बघितले तर त्याच्यावर खोटा आळ येईल.
 
त्यावर चंद्र गणपतीला विचारतो की जर चुकून कोणी मला पाहिले तर त्याने यापासून मुक्तीसाठी काय करावे? त्यावर गणपतीने सांगितले की त्याने संकष्टी चतुर्थीचा व्रत धरावा. त्यामुळे त्याची आळातून मुक्तता होईल.
 
पुराण काळातील कथांमध्ये असे सांगितले जाते की श्रीकृष्णाने गणेश चतुर्थी दिवशी चंद्र पाहिला होता त्यामुळे त्यांच्यावर संम्यतक मणी चोरल्याचा आळ आला होता. त्यावेळी श्रीकृष्णाने गणेशाची संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण केले तेव्हा मुक्ती मिळाली.
गणपतीची आरती
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रे मन कामनांपुरती॥ जय देव...
 
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा।
हिरेजड़ित मुकुट शोभतो बरा।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरीया॥ जय देव...
 
लंबोदर पीतांबर फणीवर बंधना।
सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना।
दास रामाचा वाट पाहे सदना।
संकष्टी पावावें, निर्वाणी रक्षावे,
सुरवरवंदना॥ जय देव...।