शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 15 जून 2022 (15:39 IST)

संत निवृत्तीनाथांचे अभंग 161 ते 170

nivruttinath maharaj
हरिदास संगे हरिदास खेळे । ब्रह्मादिक सोहळे भोगिताती ॥ १ ॥
संतमुनिदेवसनकादिक सर्व । तिहीं मनोभाव अर्पियेला ॥ २ ॥
पुंडलिकफळ वोळले सकळ । शंकर सोज्वळ प्रेमें डुले ॥ ३ ॥
निवृत्ति लोळत चरणरजीं लाटा । माजि त्या वैकुंठा आत्मलिंगीं ॥ ४ ॥
 
सोपान संवगडा स्वानंद ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठलराज ॥ १ ॥
दिंडी टाळघोळ गाती विठ्ठल नाम । खेचरासी प्रेम विठ्ठलाचें ॥ २ ॥
नरहरि विठा नारा ते गोणाई । प्रेम भरित डोहीं वोसंडती ॥ ३ ॥
निवृत्ति प्रगट ज्ञानदेवा सांगे । पुंडलिकसंगे हरि खेळे ॥ ४ ॥
 
वोळलें दुभतें सर्वांसि पुरतें । प्रेमाचें भरतें वैष्णवासी ॥ १ ॥
वोळतील चरणीं वैष्णव गोमटे । पुंडलिकपेठें हरि आला ॥ २ ॥
सोपान खेंचर ज्ञानदेव लाठा । देताती वैकुंठा क्षेम सदा ॥ ३ ॥
निवृत्तीनें ह्रदयीं पूजिलें तें रूप । प्रत्यक्ष स्वरूप विठ्ठलराज ॥ ४ ॥
 
धन्य हा खेचर धन्य हा सोपान । भक्तीचें जीवन जनक हेतु ॥ १ ॥
धन्य याचें कूळ पवित्र कुशळ । नित्य या गोपाळ जवळी असे ॥ २ ॥
याचेनि स्मरणें नासती दारुणें । कैवल्य पावणें ब्रह्मामाजी ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे परब्रह्म हें साकार । तेथील अंकूर उमटले ॥ ४ ॥
 
कमळाच्या स्कंधी गुणी गुढारलें । वरी आकारलें फूल तया ॥ १ ॥
सुमनाचेनि वासें भ्रमरभुलले । मार्ग पैं विसरले इंद्रियांचा ॥ २ ॥
तैसेहे संत विठ्ठलीं तृप्त । नित्य पैं निवांत हरि चरणीं ॥ ३ ॥
नाठवे हें दिन नाठवे निशी । अखंड आम्हांसि हरिराजा ॥ ४ ॥
तल्लिन प्रेमाचे कल्लोळ अमृताचे । डिंगर हरिचे राजहंस ॥ ५ ॥
टाहो करूं थोर विठ्ठल कीर्तनें । नामाच्या सुमनें हरि पुजूं ॥ ६ ॥
निवृत्ति निवांत तल्लीन पै झाला । प्रपंच आबोला हरिसंगें ॥ ७ ॥
 
गयनी गव्हार कृपेचा उद्धार । वरुषला उदार अमृतमय ॥ १ ॥
तोंची बोध साचा मुक्ताईसी लाटा । चालिले वैकुंठा समारंबें ॥ २ ॥
कुंचे गरुडटके टाळ श्रुति हरि । चालिलें गजरीं हरिसंगे ॥ ३ ॥
निवृत्ति वैष्णव सोपान खेचर । करिताती गजर हरिनामें ॥ ४ ॥
 
शांति क्षमा दया सर्वभावें करुणा । तोचि नारायणा आवडे दासु ॥ १ ॥
तोचि एक साधु बोलिजे पैं जनीं । निरंतर ध्यानीं कृष्णमूर्ति ॥ २ ॥
जीवशिव एक सर्वत्र चैतन्य । ऐसे जया कारुण्य तोचि धन्य ॥ ३ ॥
तोचि एक भक्तु हरि हरि म्हणे । नित्य नारायणें तारिजे त्यासि ॥ ४ ॥
येउनि जनीं सदा पैं तो विदेही । तारकू सबाहीं सप्रेमळु ॥ ५ ॥
निवृत्ति सांगतु भक्तीचा महिमा । करी शांति क्षमा तो विरळा असे ॥ ६ ॥
 
प्रकृतीचा पैठा कल्पना माजिठा । न पवे तो वैकुंठा कर्मजाड्य ॥ १ ॥
अहिंसेचें स्वरूप हेंचि हरिरूप । न म्हणे हरि आप सर्व आहे ॥ २ ॥
नाहीं त्यांसि जय नुद्धरे सर्वथा । हरिवीण व्यथा कोण वारी ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे धरी गुरुचरणसोये । तेणें मार्गें पाहे हरि सोपा ॥ ४ ॥
 
कांसवीचीं पिलीं करुणा भाकी । परिसंपडलीं निकीं चरणसोय ॥ १ ॥
कामधेनु घरीं हरि माझा गोपाळ । मज काळवेळ नाठवें तैसी ॥ २ ॥
चातका चिंतिता जरी नपवे जीवन । तरीच शोकें प्राण तृषा हेतु ॥ ३ ॥
निवृत्ति स्वानंदु कामधेनु गुरु । नामाचा उच्चार तेणें छंदें ॥ ४ ॥
 
आदिनाथ उमाबीज प्रकटिलें । मछिंद्रा लाधली सहजस्थितीं ॥ १ ॥
तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली । पूर्ण कृपा केली गयनिनाथा ॥ २ ॥
वैराग्यें तापला सप्रेमें निवाला । ठेवा जो लाधला शांतिसुख ॥ ३ ॥
निर्द्वद्व निःशंक विचरतां मही । सुखानंद ह्रदयीं स्थिर जाला ॥ ४ ॥
विरक्तीचें पात्र अन्वयाचें मुख । देऊनि सम्यक अनन्यता ॥ ५ ॥
निवृत्ति गयनी कृपा केली असे पूर्ण । कूळ हें पावन कृष्णनामें ॥ ६ ॥