बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 15 जून 2022 (15:13 IST)

संत निवृत्तीनाथांचे अभंग 131 ते 140

nivruttinath maharaj
न देखों सादृश्य हारपे पैं दृश्य । उपनिषदांचें पैं भाष्य हारपले ॥ १ ॥
तें रूप उघडें कृष्णरूप खेळें । गोपाळांचें लळे पुरविले ॥ २ ॥
न घडे प्रपंच नाही त्या आहाच । सर्वरूपें साच हरि आम्हा ॥ ३ ॥
निवृत्तिचें पर कृष्ण हा साचार । सर्व हा आचार कृष्ण आम्हां ॥ ४ ॥
 
नाहीं त्या आचारु सोंविळा परिवारु । गोकुळीं साचारु अवतरला ॥ १ ॥
गाई चारी हरी गोपवेष धरी । नंदाचा खिलारीं ब्रह्म झालें ॥ २ ॥
ध्याताति धारणें चिंतिताती मौन्यें । योगियांची मनें हारपति ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणें तें वसुदेवकुळीं । अवतार गोकुळीं घेतलासे ॥ ४ ॥
 
अजन्मा जन्मला अहंकार बुडाला । बोध पै ऊठिला गोकुळीं रया ॥ १ ॥
आपरूपे गोकुळीं आपरूपें आप । अवघेंचि स्वरूप हरिचें जाणा ॥ २ ॥
रूपाचें रूप सुंदर साकार । गोकुळीं निर्धार वृंदावनीं ॥ ३ ॥
निवृत्तीचें पुण्य वेणु वाहे ध्वनि । जनमनमोहनि एकरूप ॥ ४ ॥
 
परेसि परता न कळे पैं शेषा । तो गौळिया अशेषा माजी हरी ॥ १ ॥
भाग्य पैं फळलें नंदाघरीं सये । यशोदा पैं माय परब्रह्माची ॥ २ ॥
गौळिये नांदती गोधनाचे कळप । त्यामाजि स्वरूप कृष्णमूर्ति ॥ ३ ॥
निवृत्तीचें ध्यान गोपाळ आमुचा । आतां जन्म कैचा भक्तजना ॥ ४ ॥
 
ज्या रूपा कारणें वोळंगति सिद्धि । हरपती बुद्धी शास्त्रांचिया ॥ १ ॥
तें रूप साजिरें गोकुळीं गोजिरें । यशोदे सोपारें कडिये शोभे ॥ २ ॥
न संटे त्रिभुवनीं नाकळे साधनीं । नंदाच्यां आंगणीं खेळे हरी ॥ ३ ॥
निवृत्ति निधडा रूप चहूं कडा । गोपाळ बागडा गोकुळीं वसे ॥ ४ ॥
 
न साहात दुजेपण आपणचि आत्मखुण । श्रुति जेथें संपूर्ण हरपती ॥ १ ॥
देवरूप श्रीकृष्ण योगियां संजीवन । तें रूप परिपूर्ण आत्माराम ॥ २ ॥
न दिसे वैकुंठी तें योगियांचे ध्यानबीज । तो गोपाळाचें काज हरि करी ॥ ३ ॥
निवृत्ति गयनि हरि उच्चारितां माजीं घरीं । होती मनोरथ पुरी कामसिद्धी ॥ ४ ॥
 
सूर्यातें निवटी चंद्रातें घोंटी । उन्मनि नेहटीं बिंबाकार ॥ १ ॥
तें रूप सावळें योगियाचें हित । देवांचें दैवत कृष्णमाये ॥ २ ॥
सत्रावी उलंडी अमृत पिऊनि । ब्रह्मांड निशाणी तन्मयता ॥ ३ ॥
निवृत्ति अंबु हें वोळलें अमृत । गोकुळीं दैवत नंदाघरीं ॥ ४ ॥
 
न साधे योगी न संपडे जगीं । तें नंदाच्या उत्संगी खेळें रूप ॥ १ ॥
कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळीं । गोपिका सकळीं वेढियेला ॥ २ ॥
गाईचे कळप गोपाळ अमुप । खेळतसे दीप वैकुंठीचा ॥ ३ ॥
निवृत्ति दीपडें वैकुंठें साबडें । यशोदामाये कोडें चुंबन देत ॥ ४ ॥
 
भावयुक्त भजतां हरी पावे पूर्णता । तो गोकुळीं खेळता देखों हरी ॥ १ ॥
मुक्तीचे माजीवडे ब्रह्म चहूंकडे । गौळणी वाडेकोडें खेळविती ॥ २ ॥
नसंपडे ध्यानीं मनीं योगिया चिंतनी । तो गोकुळीचें लोणी हरी खाये ॥ ३ ॥
निवृत्तिजीवन गयनीनिरूपण । तो नारायण गोकुळीं वसे ॥ ४ ॥
 
जेथुनीया परापश्यंती वोवरा । मध्यमा निर्धारा वैखरी वाहे ॥ १ ॥
तें रूप सुंदर नाम तें श्रीधर । जेणें चराचर रचियेलें ॥ २ ॥
वेदाचें जन्मस्थान वेदरूपें आपण । तो हा नारायण नंदाघरी ॥ ३ ॥
निवृत्ति दैवत पूर्ण मनोरथ । गोपिकांचें हित करि माझा ॥ ४ ॥