शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (08:43 IST)

श्री नृसिंह सरस्वती जयंती

श्रीनृसिंह सरस्वती हे श्रीदत्तप्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे उत्तरावतार आहेत. तेच पुढे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्धी पावले. श्रीनृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते.
 
श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार काल शके १३०० ते १३८० असा आहे. श्रीगुरुचरित्र हा वेदतुल्य असून हे गुरुचरित्राचे चरित्रनायक आहेत. श्रीगुरुचरित्र सर्व मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणीच आहे. 
 
शिवोपासना करणारी कुरूगड्डीची अंबाबाई वऱ्हाड प्रांतात, करंज नगरात वाजसनेय शाखेच्या ब्राह्मणाची सुकन्या ‘अंबा’ यांचा विवाह माधव नामक शिवोपासक तरुणाशी झाला. पौष शुद्ध द्वितीयेला, शनिवारी माध्यान्हकाळी त्यांच्या पोटी सुपुत्र रूपाने अवतार धारण केला- हेच श्री नृसिंह सरस्वती.
 
जन्मानंतर ते रडले नसून ॐचा जप करू लागले. तेव्हा ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वरावतार असल्याचे सांगितले. हा लौकिक मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप, ताप, दैन्य हरण करणारा होईल म्हणून याचे नाव ‘नरहरी’ असे ठेवावे असे त्यांनी सुचवले. 
 
सात वर्षांपर्यंत त्यांनी ॐकाराखेरीज कोणताच दुसरा शब्दच कधी उच्चारला नाही. मात्र मुंजीचा बेत ठरला आणि बाळाने ऋग्वेदातील मंत्राचा स्पष्ट उच्चार केला. यजुर्वेद, सामवेद म्हणून बाळाने सगळ्या लोकांना चकित केले.
 
काशीतील तत्कालीन सर्वश्रेष्ठ संन्यासी श्रीकृष्णसरस्वती स्वामींच्या विनंतीला मान देऊन त्यांनी संन्यासदीक्षा स्वीकारली. श्री कृष्णसरस्वती स्वामींनीच त्यांना चतुर्थाश्रमाची दीक्षा दिली. त्यांच्या हाती दंड दिला. त्यांचे ‘श्री नृसिंहसरस्वती’ असे नूतन नामकरण केले. पायी खडावा, कटीला कौपीन अंगावर भगवी छाटी, गळ्यात रुद्राक्ष माळा, हातात दंड कमंडलू, कपाळी भस्म, मुखावर सात्त्विक स्मितहास्य, संपूर्ण देहावर तपश्चर्येचे तेज, हृदयात ब्रह्मानंद असलेले दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वती सर्वांना साक्षात श्री काशीविश्वेश्वरच वाटत. 
 
गाणगापुर येथे श्रीगुरूंनी जवळजवळ तेवीस वर्षे वास्तव्य करून लोकांचा उद्धार केला असल्याने गाणगापुरास दत्तपंथीयांत फारच महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.
 
प्रदीर्घ काळ भक्तकार्य करून श्री नृसिंहसरस्वती अवतार समाप्तीची भाषा बोलू लागले. श्री सद्‍गुरू नृसिंह सरस्वतींच्या आज्ञेप्रमाणे निर्वाणाची तयारी करण्यात आली. केळीच्या पानांवर फुलांचे आसन रचण्यात आले. गुरुनामाच्या घोषात ते आसन नदीच्या पाण्यात ठेवण्यात आले. श्री गुरूदेवांनी त्यावर आरोहण केले. सर्व शिष्यांचे, भक्तांचे अभिवादन स्वीकारून ते प्रवाहाच्या दिशेने मार्गस्थ झाले. मार्गस्थ होताना त्यांनी ‘सुखधामी गेल्यानंतर चार पुष्पे प्रसाद म्हणून पाठवून देतो.’ असे सांगितले त्याप्रमाणे पुष्पे प्रसाद म्हणून परत आली. 
 
भीमा-अमरजा संगम हा गंगायमुनांचा संगम आहे. इथे नित्य स्नान करा. सत्त्वस्थ भक्ताला कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणाऱ्या इथल्या अश्वत्थाची नित्य पूजा करा. ‘या कल्पतरूच्या छायेत जो उपासना करील तो कृतार्थ होईल’, अशी अभय वाणी उच्चारून ते महाप्रस्थानास सिद्ध झाले.