गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री परशुराम माहत्म्य अध्याय २१

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीमुनिजनमानस प्रियाय नमः ॥
जय जया पुराण पुरुषोत्तमा जगदेक वंद्या मेघः शामा करुणा करा गुणधामा मन विश्रामा तुज नमो ॥१॥
जय कैठभारी मधुसूदना स्मरारि वंद्या फणिंद्रशयना निर्विकल्प निरंजना नाम अनामातीत तूं ॥२॥
तुझे कृपेचा सुधाकर उदया पावतां भक्त चकोर परमानंदें महाथोर नामामृत सेविती ॥३॥
पूर्वीं तो विमळासुर, पीडा करिता ऋषेश्‍वर कैलासवासी श्रीशंकर आराधिला प्रीतीनें ॥४॥
विमळासुराचे अन्याय मनीं वाहे महादेव वैतरणी तटीं अपूर्व दुजें आरिष्ट वोढवलें ॥५॥
लोम हर्षणाची कुमरी षोडशवर्षें ब्रह्मचारी बैसोनियां वैतरणी तिरीं तप निर्धारी करीतसे ॥६॥
ते कौमारी लावण्य सरिता बिल्व स्तनी यौवन गर्विता गौरवर्णीक न कलता धरा मंडळीं विस्तारिली ॥७॥
ते कोमलांगी शुभलक्षिणा युक्त शोभे चंद्रानना विशाळ भाळी पद्मनयना तपोतेजें तेजस्वी ॥८॥
ऐसी ती सुरत सुंदरी विमळासुरें गिरी शिखरीं पाहतां धांवला सत्वरी तियेलागीं स्पर्शावया ॥९॥
ती सिंहकटी देखोनी असुर व्यापिला कामबाणीं ह्मणे इची या नखावरुनी सांडणी करुं जिवाजी ॥१०॥
ती ऋषिकन्या ब्रह्मरुप श्रृंगार गंगा रमणीय दीप भोगा भिलाषें साक्षेप करिता जाला अत्तियुक्ती ॥११॥
व्यर्थ करुनि तारुण्यातें किमर्थ बैसलीस येथें विसर्जन करुनि तपातें चाल भूवनीं माझिया ॥१२॥
सांडोनियां स्त्रीधर्म येथें कां करिसी उपोषण शीतऊष्ण भूमी शयन तूज कारणें योग्य नसे ॥१३॥
तुझें दुःख नेत्रीं पाहतां पुरुषावीण न राहे जीविता ह्मणोनि आलों वेगता तूज लागीं न्यावया ॥१४॥
तूतें पतीनें छळिलें कीं माया बापें दवडिलें तें मज सांग येवेळे शिक्षा करीन तयासी ॥१५॥
तू तरी लावण्य हरिणी पुरुषा विरहीत कामिनी उदया पावला भाग्यतरणी तरीच येथें पातलों ॥१६॥
आतां विचारुनि आपुला स्वार्थ मातें करी प्राणनाथ देवां दुर्लभ जे पदार्थ ते समस्त भोगिजे ॥१७॥
ऐकोनि विमळाचें वचन कन्या जाहली क्रोधायमान ह्मणे रे दुर्जना येथून परता होई माघारा ॥१८॥
मी तों लोमेशाची दुहिता ब्रह्मचारिणी तपोव्रता ऐशा नियमातें भंगितां नाश आतां पावशी ॥१९॥
विचारुनि आपुले चित्तीं स्वस्थळा जाई तुं ग पर्वतीं आह्मा स्त्रियांचे संगतीं नाश बहूत पावले ॥२०॥
सुंदोप सुंद स्त्रियेचे ध्यानी लागतां वेचले समूळ प्राणी पार्वती अभिलाषितां मनीं भस्मासुर भस्म जाला ॥२१॥
दैत्यां अंतरलें सुधापान शंकरा जालें लिंग पतन विष्णूलाही प्राप्त स्मशान ॥ भगेंवासव सर्वांगीं ॥२२॥
चंद्र क्षय रोगी जाहला सूर्यचक्र धारी कातिला सोमदंती हरण जाला रावण वेचला प्राणासी ॥२३॥
बलात्कारा वांचून स्त्रीवश होतो जाण तीच सुखाला कारण अन्यथा नव्हे ॥२४॥
तूं तर असुर तामसी शंकर वरदें मातलासी कवळितां अग्निज्वाळेसी पतंग केवीं वाचेल ॥२५॥
सिंहालयींचें कुंजर मुक्त अभिलाषितां मरे बस्त महा भुंजगाचे दंत धरितां मंडूक वाचेना ॥२६॥
ऐसें ऐकतां असुर क्रोधें खवळला अनिवार कामें व्यापिलें शरीर धुंद नेत्र जाहले ॥२७॥
परी ते कटाक्षाचे बाण लागतां विंधिलातो जाण भूमी तें पडे मूर्छा येऊन नाहीं स्मरण देहाचें ॥२८॥
धैर्यें तनू सांवरोन उभा ठाकला मागुत्यान कडकडां अधर रगडोन झेप घाली तिजवरी ॥२९॥
केश कवळोनियां हातीं फरफरां वोढी तिजप्रती थरथरां कांपे चंडवती केळी जैसी सुकुमार ॥३०॥
महा व्याघ्राचे कवेंत हरिणी सांपडे अकस्मात तैशा परी वर्तलें येथ थोर अकांत मांडिला ॥३१॥
सद्गद कंठ अश्रू नयनें विगलित जालीं वस्त्रा भरणें धाय मोकलितां तेणें पशुपक्षी गहिवरले ॥३२॥
जय जय शंकरा जगत्पती लोक पाला करुणामूर्ती अनाथ नाथा चक्रवर्ती धांवे आकांतीं माझिया ॥३३॥
अगा हे स्वामी देवदेवा चंद्रशेखरा ऐक धांवा संकट पडिलें माझिया जिवा कैवारिया ये वेगीं ॥३४॥
प्राचेत सज्ञान दाता शरणांगता तें रक्षिता सद्यः प्रसादा सद्योजाता धांव आतां संकटीं ॥३५॥
तूंचि माझीं माता पिता असुरें गांजिली तुझी दुहिता ॥ असुर वरदा भयत्राता धांव आतां ये वेळीं ॥३६॥
तूं न येसी धांवोन तरी ब्रीदासी येईल ऊण अशिवाशिवा पतीतां पावन कीर्तीगाजे तिहीं लोकीं ॥३७॥
देवा तूं कोठें गुंतलासी कीं तपाचरणीं बैसलासी कीं वैष्णवांचा मेळा तुजसीं भेटों आला या समयीं ॥३८॥
कीं गंधर्व अप्सरा येऊन तुजपुढें मांडिलें नृत्य गायन कीं पार्वती पुढें येऊन विलास मांडिला एकांतीं ॥३९॥
किंवां नारदादी मुनेश्‍वर कीर्तनाचा करिती गजर ह्मणोनि यां करुणा स्वर तुज ऐकूं नये कीं ॥४०॥
करुणा करा जगन्नाथा सेवटीं धांवा ऐक आतां दुष्टमातें विपरीत करितां प्राण देईन तुजवरी ॥४१॥
ऐसा धांवा करुणा स्वरीं कैलासीं ऐकतां त्रिपुरारी घाबरा होऊनि अंतरीं चिंतन करी ईश्‍वराचें ॥४२॥
अगाहे देव देवेशा ॥ जगन्नाथा त्‍हृषीकेशा करुणावंता भार्गवेशा समरधीरा रघुपती ॥४३॥
भक्त काज कल्पद्रुमा असुर मर्दना मेघःशामा तुझे गुण तुझा महिमा निगमागमा अतर्क्य ॥४४॥
वेद हरितां संखासुर तयालागीं मच्छावतार घेऊनि वधिला दैत्य क्रूर वेद काढूनि घेतले ॥४५॥
मंद्राचळ पर्वत जाण भेदीत जाय समुद्रजीवन ते वेळीं तूं नारायण कूर्म रुपें सृष्टी धरी ॥४६॥
वराह रुपें जगत्पती दाढे धरिली क्षिती हिरण्याक्ष दैत्याप्रती पायातळीं रगडिलें ॥४७॥
गांजिला प्रर्‍हाद महाभक्त नरहरी जाला जगन्नाथ स्तंभ भेदूनि निश्चित हिरण्य कश्यप मर्दिला ॥४८॥
म्या जे वेळीं केली प्रतिज्ञा मारावया त्रिपुर दुष्प्रज्ञा सिद्धीस नेऊनि तुवां सर्वज्ञा भक्त कीर्ती विस्तारिली ॥४९॥
वामन रुप धरुनि बळी दवडिला पाताळभुवनीं अक्षय राज्य देऊनी द्वारपाळ जालासी ॥५०॥
तो तूंचि एक सर्वेश्‍वर अवतरलासी परशुधर क्षत्रीय वधूनि समग्र धरामर तोषविले ॥५१॥
कमळापते परात्परा उत्पत्ती स्थिती नाश करा वेदगर्भा निर्विकारा वेदैक वेद्या जगद्गुरु ॥५२॥
तूं सर्व व्यापक चक्रपाणी गदा पद्म शंखधारिणी दुष्ट दैत्य संहारणीं नानावतार धरुनियां ॥५३॥
ऐसी स्तुती शूळपाणी भार्गवें आकर्णितां कानीं एकाएकीं मोक्षदानी कैलास भुवनीं प्रगटला ॥५४॥
नेणो कवणे स्थळीं होता ॥ तेथोनि मनुष्यत्वें अवचिता नमस्कारुनि भूतनाथा ह्मणे कां आह्मा प्रार्थिलें ॥५५॥
शंभू ह्मणे जगन्नाथा ऋषी लोमेशाची दुहिता वैतरणी तिरीं तत्वतां विमळासुरें गांजिली ॥५६॥
तिचे कवळोनि केश फरफरां वोढी तामस लाथ मारितां कटीस धांवा माझा करीतसे ॥५७॥
न जाणूनि दिधला वर तेणें मातला हा असुर तरीं होऊनि क्षमा कर नाश करी दुष्टाचा ॥५८॥
पाहोनि अलोट विघ्नातें तंव प्रार्थिलें तुह्मातें विपर्यास घडतां तीतें प्राण देईल नितिंबिनी ॥५९॥
तुवां जावोनि तेथवरी विमळासुराचा वध करी मुक्ती देवोनि निर्धारीं सोडवावी ऋषी कन्या ॥६०॥
निर्दोष यशाचा द्रुम तुवां वाढवावा उत्तम हास्य वदनें परशुराम काय वचन बोलिला ॥६१॥
असुरांसी न द्यावे ऐसे वर देऊनि करितां अनिवार शेवटीं करावया संहार प्रगट होणें आह्मासीं ॥६२॥
ऐसें सांगूनि शंकरा चालत आले महेंद्रा ह्मणती आतां विमळासुरा मुक्ती देतों समरंगणीं ॥६३॥
कीं युगांतीं महाकाळीं कोपें पावक सृष्टी जाळी तै रामासी इच्छा अगळी विमळासुर वधावया ॥६४॥
दक्ष वधातें सत्वर धांवे जैसा वीरभद्र तैसा क्रोधें परशुधर विमळावरी अवेशें ॥६५॥
पृष्टी विराजे धनुष्यबाण फरशू शोभे तेजोधन किरिट कुंडलें दीप्तीमान पीतवसन कसियेलें ॥६६॥
दुष्ट दैत्य ब्रह्मचारिणी केशीं धरिली लावण्य हरिणी जेवीं वारण कमळिणी शुंडा दंडें ताडीतसे ॥६७॥
सूकुमारे जैसी कर्दळिका देखोनि ह्मैसामारी थडका तैशा परी ते कन्यका वोढितां देखे भार्गव ॥६८॥
कामें व्यापिला असुर न पाहे कांहीं अपपर हें देखोनि फराशुधर क्रोधें अंतर धडकलें ॥६९॥
प्रळय काळासी बैसे दचका ऐसी मारिली प्रचंड हांक ह्मणे दुर्जना धरी धाक मरण आतां पावसी ॥७०॥
भक्षावया मृत्यु फळें ॥ तुजलागीं जाहले डोहळें माझे सायकें त्द्या वेळे ग्राहीक आले प्राणासी ॥७१॥
परले पटा परकामिन सोडी वेगें सुलक्षण समरंगणीं तुझें लग्न लावितों आतां पाहा कीं ॥७२॥
धनुष्य टणत्काराचा गजर हाचि वाद्यांचा सुस्वर मुक्ती वधू निर्धार पूर्ण भोगी अक्षयीं ॥७३॥
ऐसें भ्रुगुपती बोलोनी काढिली कोदंडाची गौसणी झणत्कारिल्या लघु किंकिणी प्रभा फाकली दशदिशा ॥७४॥
भार्गव गर्जनेचा विखार कर्णी झोंबतां विमळासुर माघारा पाहेतो वैश्‍वानर प्रळयकाळीं भासला ॥७५॥
परम दचकला अंतरीं सोडोनि दिधली ते वेल्हाळी ह्मणे लाभ काळाचे अवसरीं कैसें अरिष्ट वोढवलें ॥७६॥
तरी शंकर वर दें करुनी अजिंक मी समरंगणीं आतां भार्गवातें जिंकोनी नवरी घेऊनि मग जावें ॥७७॥
ऐसी विचारु नियुक्ती कडकडां चावी अधर पंक्ती शस्त्रें तुळी आपुले हातीं दावी शक्ती सक्रोधें ॥७८॥
तप्त लोहाचीं गंगाळें तैसे आरक्त वटारी डोळे दंत दाढा विशाळे बाबर झोटी पिंगट ॥७९॥
ऐशा रिती विमळासुर उभा राहिला धरुनि धीर पुढिले अध्यायीं महाघोर अपार विरश्री माजे पैं ॥८०॥
श्रोत्रयु गळीं सावधानी कथा ऐकावी विचक्षणीं सूत वदे अमृतखाणी परशुरामा वेदोनियां ॥८१॥
स्वस्तिश्री परशुराम विजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु एकविंशतीध्याय गोड हा ॥२१॥श्रीविमळासुर मर्दनार्पण मस्तु ॥