शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री परशुराम माहत्म्य अध्याय १७

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकौसल्यानंदनाय नमः ॥
जय जयाजी केशव राजा तूं चिद्घन भक्त काजा अंतर्बात्द्यनिर्लेप अजा नारायणा तुज नमो ॥१॥
परशुराम महेंद्रातें जाऊनि काय पराक्रमातें सांगावें भावीक श्रोत्यांतें तीकडील प्रताप ॥२॥
सूत शौनकासी वदे ॥ सांगतों ह्मणे माहानंदें ज्यासी ब्रह्मादिक ह्मणती वंदे स्थान ऐसें तेथें असे ॥३॥
पूर्वीं ख्याती या कथेची कथी नारदातें विरंची नैमिषीं आतां स्वभावेंची सांगेन सविस्तार महात्म्य ॥४॥
या कथेचा प्रादुर्भाव प्रगट व्हावया अभिप्राव इंद्रप्रस्थीं युधिष्ठिर राव भीष्माप्रती अनुवादे ॥५॥
दिव्य क्षेत्राची प्रख्याती निवेदावी गामजप्रती तीर्थ महात्म्य फलश्रुती मुळापासोनि वदावी ॥६॥
गोदावरीच्या पश्चिम दिसे वैतरणी सिंधू संगम आणि विमल तीर्थाचा उगम कैसा प्रगटला कोकणीं ॥७॥
इषुपात महाख्याती परशुरामाची चित्छक्ती रामक्षेत्राची उप्तीत्ती सागरांमध्यें जाहली ॥८॥
कां कोपला रेणुका कुमरु सागरासी केला मारु लावूनि बानाग्नी कुठारु समुद्र मागें सारिला ॥९॥
अग्निबाणें सारिलें जळा हें तर आश्चर्य भूपाळा धन्य भार्गवाचिया बाळा अद्यापी ब्रह्मादिक वर्णिती ॥१०॥
ऐसें धर्माचें वचन ऐकतां तोषला गंगा नंदन ह्मणे एकाग्र चित्त करुन सावधान परिसीजे ॥११॥
भार्गव क्षेत्राची उत्पत्ती श्रवण करितां सादर चित्ती पाविजे गा भुक्ती मुक्ती पठण मात्रतां ही ॥१२॥
आतां जें परशुराम क्षेत्र पुण्यवंत महापवित्र तेथें परशुराम पराक्रम विचित्र महापुराणीं वर्णिले ॥१३॥
त्रेतायुगीं सहस्त्रार्जुन आणीक असुर दारुण दुष्ट क्षत्रिय माजले अवैष्णव ते संपूर्ण मारिले ॥१४॥
ती सांगीतली समूळ कथा आणीक होईल विस्तार ग्रंथा परंतु सांगतों पंडितां कळलें पाहिजे आदरें ॥१५॥
रेणुके तें अर्जुन पुत्रा न बाण एकवीस हाणोन जर्जर होतां शक्ती आपण एकवीरा जालीते ॥१६॥
एकवीस घांव मातेवरी मारिले ह्मणोनि धरित्री एकवीस वेळां निक्षेत्री रणीं केली परशुरामें ॥१७॥
क्षत्रियांचे **** स्नान केलें पितृगणांतें तर्पिलें मग यागातें आरंभिलें माता पूर महातीर्थीं ॥१८॥
तेथें दुष्कर्माची धुनी रेणुकानंदनें करुनी मग दान दीधली मेदिनी ऋषीवृंदा लागोनियां ॥१९॥
त्द्या समस्त मुनिवरां आदि कश्यप ऋषेश्‍वरा दान दिधली वसुंधरा सप्त द्वीपावती ॥२०॥
सुर दुंदुभीचिया गजरीं पुष्प वृष्टी करिती गा अंबरीं गंधर्व अप्सरा नृत्य करी ऐसा आनंद वृंदारकां ॥२१॥
मग सत्द्याद्रीचे शिखरीं मूळ पीठ तें अवधारी परशुराम वीर हरी काळक्षेप करीतसे ॥२२॥
तेथें लिंग स्थापिलें जमदग्नी श्रीएकवीरा भवानी स्वयंभू दिसे मेदिनीं शोभिवंत ते ठाया ॥२३॥
त्या आपुल्या आश्रमभूमी रामराहती विश्‍वमणी विचार करिती अंतःकरणीं स्थान पाहे रहावया ॥२४॥
म्या समस्त ऋषेश्‍वरांते दान दीधली मेदिनी ते आतां राहतां या स्थळातें विरुद्ध धर्मातें असे कीं ॥२५॥
गृहस्थानी वसुंधरा दान दीधली धरा मरा तेथें राहतां अवधारा दोष आंगीं झगडती ॥२६॥
एक नर दानें देती त्यांचा लोभ मागुतीं धरिती त्यापासून प्रत्युपकार इच्छिती त्यांसी दोष अपार ॥२७॥
तरी दान दिधल्याचे बाहेरी स्थळ पाहवें निर्धारी ऐसा विचार अंतरीं करिता जाहला भार्गव ॥२८॥
तो मायातीत मायेश्‍वर अंतर्बात्द्य निर्विकार भक्तार्थ करुनि अवतार लोकशिक्षा दावीतसे ॥२९॥
मानवलें समस्तांचे विचारा त्यजिता होय माता पुरा मूळ पीठासी अवधारा प्रणाम करुनि साष्टांग ॥३०॥
करीं घेऊनी धनुष्यबाण फरशु शोभे ते जो घन जटामुकुट कुंडलें दिप्तीमान भस्म घर्षित सर्वांगीं ॥३१॥
शोभती श्रीं द्वादश तिकला उज्वलीत दिसती मुद्रिका तुलसी मणी अक्षमालिका सर्वांगीं विराजती ॥३२॥
कटीपीतांबर वेष्टित उत्तरीय वस्त्र शोभिवंत यज्ञोपवीत आंगीं झळकत कृष्णाजिन पांघरलें असे ॥३३॥
आधीं परब्रह्म साक्षांत सच्चिदानंद ते जें विराजित उपमा द्यावया नसे सत्य त्याला उपमा त्याचीच ॥३४॥
सवें ब्रह्मादि सुरवर वसिष्ठादि ऋषेश्‍वर प्रयाण करी महावीर पश्चिम दिशा लक्षूनी ॥३५॥
निघतांचि मार्गांत नवल देखता जाला ज्ञानी सकळ साठ द्विजांचीं जैसीं अनळ शवें पाहिलीं सत्द्यमार्गीं ॥३६॥
तो केवळ द्विज देव ह्मणोनी तयां संजिविता अमृतेक्षणीं चतुर्दश गोत्रज विज्ञानी ईश्‍वर हे जाणूनि स्तविती ॥३७॥
ह्मणती ईश्‍वरा देवराया जीवजीवना विश्‍वकाया विश्‍वकर्ती तुमची जाया परशुरामा तुज नमो ॥३८॥
अनंत विश्‍वें इच्छामात्रें जीवन करिशी स्वतंत्रें अह्मासी केलें नोहे विचित्रें भक्तदयार्द्रा तुज नमो ॥३९॥
पूर्वीं पुण्य काय केलें आजितें फळाशी आलें ब्रह्ममूर्तीचे चरण देखिले कृतार्थ जालों त्वत्प्रसादें ॥४०॥
ऐसीं स्तवनें परोपरी करुनि संतुष्ट केला हरी ह्मणती आमुचें कल्याणकरी ॥ तूंचि आमुचें कुळदैवत ॥४१॥
गुरु कन्येच्या शापें करुनी मरण पावलों अह्मीं मुनी ते त्वां संजीविले अमृतेक्षणी ॥ द्विज देव ह्मणोनी ॥४२॥
ऐकोनि तयांच्या स्तुती ह्मणती तुह्मीं याचि क्षिती सेवन करावें मजप्रती पूर्ण होती मनोरथ ॥४३॥
ऐसा वरतो देवोनी तेथेंचि राहिले ते मुनी ऋग्यजूचे महाज्ञानी ह्मणती काय हा प्रताप ॥४४॥
तेथोनि सागसागराच्या तटा गगनीं उसळती त्याच्या लाटा गंभीर गर्जना अचाटा नाद कोंदे अंबरीं ॥४५॥
जळ भयानक गडगडी महाधुंधाटे कडकडी आक्रोशें ऊर्मी फडफडी येती शुभ्र फेणीया ॥४६॥
नमस्कारु नि सागरा ह्मणती सरिता पती गंभिरा तूं जळनिधी पवित्र करा होसी भांडार तीर्थाचे ॥४७॥
महोदधी महाभागा पृथ्वी वसना वरुणांगा सर्व सरिता आणि गंगा तुज विग्रहा मावती ॥४८॥
आगा हे तीर्थाचे वरिष्टा तीर्थें आलीं तुझ्या पोटा माझें वचन महाश्रेष्ठा श्रवनीं ऐकोनि घेइजे ॥४९॥
पितृवियोगें या अंतरा संतप्त झालों हे सागरा त्यजोनि आलों मातापुरा पृथ्वी देऊनि द्विजांसी ॥५०॥
तरी तूं आह्मा भूमिका वर येवढा दे एका तेथें स्नान वास देखा करीन जाणा निरंतर ॥५१॥
परम कष्टी होऊनी सुस्थळ कल्पिलें मनीं तुझें औदार्य पाहोनी धावोनि आलों तटाका ॥५२॥
तुझिये भूमिके विश्राम घेवोनि करी सत्कर्म एवं भावीत परशुराम मर्त्य भावें सागराप्रती ॥५३॥
परी तो क्षारसागर रामासी नेदी प्रत्युत्तर मनीं धरुनि अहंकार गंभीरपणें गर्जतसे ॥५४॥
शरण न जाय रामाप्रती उत्तर न वदे विनयचित्तीं आपुले थोरपणाची स्थिती दावी रिती भार्गवा ॥५५॥
प्रताप रामाचा नेणुनी महागर्जने दणदणी तें परशुरामें देखोनी बहूत मनीं आवेशला ॥५६॥
ह्मणे हा गर्विष्ट सागर मातला निर्दय निष्ठुर क्रोधें रगडोनि अधर अरक्त नेत्र जाहला ॥५७॥
आपुले वैभवपणें पराचें कार्य न जाणे ऐसिया दुष्टा कारणें शिक्षा देणें अवश्य ॥५८॥
धनुष्या वाहोनियां गुण योजिला तेव्हां प्रळयाग्नी बाण दिशा होती तेजेंपूर्ण सुरगण चळी कांपती ॥५९॥
ह्मणे गर्विष्ठें ये काळीं माझी अवज्ञा पै केली तरीं आतां धरा मंडळीं समुद्र नाहीं ऐसें करुं ॥६०॥
ऐसें बोलोनि रेणुका तनय शिळेसि ने हेटोनि पाय वोढी वोढितां लवलाहें काय ब्रह्मांड कडाडिलें ॥६१॥
धर्म विनवी भीष्माप्रती शिळाकोटील कोण होती तें कथानक निश्चितीं निवेदावें दयाळा ॥६२॥
एवं धर्माचें वचन भीष्म देवे तें ऐकोन ह्मणे एकचित्तें करुन पुण्य श्लोका परिसावें ॥६३॥
स्वस्तिश्री परशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु सप्तदशोध्याय गोड हा ॥१७॥
श्री अहिल्योद्धारणार्पणमस्तु ॥