रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्रीरामविजय - अध्याय २५ वा

अध्याय पंचवीसावा - श्लोक १ ते ५०
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
पूर्वीं क्षीरसिंधु मंथूनि ॥ चतुर्दश रत्नें काढिली निवडूनि ॥ तैसा रामकथार्णव शोधूनी ॥ रामविजय काढिला ॥१॥
दह्याचें पोटीं निघे नवनीत ॥ कीं स्वातीतोयापासाव मुक्त ॥ तैसा दशरथापासाव रघुनाथ ॥ महिमा अद्भुत तयाचा ॥२॥
कीं ज्ञानापासोनि शांति ॥ कीं शांतीपासोनि विरक्ति ॥ कीं विरक्तिपासोनि निवृत्ति ॥ पद विशेष पाविजे ॥३॥
तैसा वाल्मीकमतीचा विस्तार ॥ तो हा रामकथाब्धि साचार ॥ याचा पावावया पैल पार ॥ वक्तयासी शक्ति नव्हेंचि ॥४॥
जो पीडिला दरिद्रेंकरून ॥ त्यास मार्गीं सापडें बहुत धन ॥ परी तो यथाशक्तीकरून ॥ मोट बांधी जैसी कां ॥५॥
तैसा यथामती करून ॥ रामविजय निवडिला पूर्ण ॥ असो पूर्वाध्यायीं वालिनंदन ॥ रावणासन्मुख बैसला ॥६॥
मुकुटावरी शोभे दिव्य मणी ॥ तैसा अंगद विराजे पुच्छासनीं ॥ म्हणे दशमुखा ऐकें श्रवणीं ॥ शब्दरत्नें अति सुरस ॥७॥
नरदेहासी येऊन पाहीं ॥ कीर्ति उरवावी भुवनत्रयी ॥ जेणें धन्य धन्य सर्वही ॥ बहुकाळ मागें म्हणतील ॥८॥
विवेकसद्बुद्धीच्या बळें ॥ दुर्बुद्धि त्यजावी कुशळें ॥ संतसंगती रसाळें ॥ वचनें हृदयी धरावीं ॥९॥
कोणाचें हेळण न करावें ॥ दुष्ट वचन न बोलावें ॥ पराचे गुण जाणोनि बरवे ॥ परोपकार करावा ॥१०॥
ज्याची वर्तणूक देखोन ॥ संतुष्ट होती ब्राह्मण ॥ ते सदा चिंतिती कल्याण ॥ तरीच धन्य संसारीं ॥११॥
सर्वांभूतीं जगन्निवास ॥ यास्तव न कीजे कवणाचा द्वेष ॥ वर्मस्पर्शाचे शब्द सदोष ॥ सहसा कोणा न बोलावे ॥१२॥
काम क्रोध मद मत्सर ॥ हे शत्रु घालावे बाहेर ॥ नाशिवंत जाणोनि शरीर ॥ सारासार विचारिजे ॥१३॥
सकळ सत्कर्माचरण ॥ करावें वेदाधारेंकरून ॥ मी कर्ता हा अभिमान॥ सहसाही न धरावा ॥१४॥
जैसं जळावरी जलजपत्र ॥ परी न भिजे अणुमात्र ॥ तैसीं सत्कर्मे करूनि सर्वत्र ॥ न लिंपावें कोठेंही ॥१५॥
मनोजय करणी करूनी ॥ मति योजावी भगवद्भजनीं ॥ जगदाभास मिथ्या मानोनी ॥ आत्मस्वरूपी रमावें ॥१६॥
परधन आणि परदारा ॥ येथें चित्त न घाली राक्षसेंद्रा ॥ सद्भाव धरिजे बरा ॥ सद्रुरुवचनीं सर्वदा ॥१७॥
सत्समागमीं चित्त ठेवून ॥ दूर त्यागावे दुर्जन ॥ क्लेशकाळ आलिया पूर्ण ॥ स्वधर्माचरण न सांडावें ॥१८॥
यथान्याय राज्य करीं ॥ दुष्ट तितुकें आधीं संहारीं ॥ मग सद्भजनीं अहोरात्रीं ॥ तनु आपली झिजवावी ॥१९॥
शम दम उपरती ॥ दया क्षमा तितिक्षा शांती ॥ ह्या जवळी रक्षाव्या नृपती ॥ अहोरात्र प्रीतीनें ॥२०॥
भक्ति वैराग्य ज्ञान ॥ आनंद सद्विद्या समाधान ॥ हीं जवळी रक्षावीं अनुदिन ॥ आत्मप्राप्तीकारणें ॥२१॥
दैवें भाग्य विद्या होय अपार ॥ त्याचा गर्व न धरावा अणुमात्र ॥ अथवा कालांतरीं आलिया दरिद्र ॥ परी धीर न सांडावा ॥२२॥
यालागीं दशमुखा अवधारीं ॥ माझी शब्दरत्नें हृदयीं धरीं ॥ तरी अयोध्याप्रभूसी मैत्री ॥ सर्वभावें करावी ॥२३॥
श्रीराम केवळ गुणनिधान ॥ दुजयाचे अपार दोषगुण ॥ तात्काळ जाय विसरून ॥ अंतःकरण शुद्ध सदा ॥२४॥
पराचे ऐकोनि सद्रुण ॥ स्वयें वाखाणी रघुनंदन ॥ एकबाण एकवचन ॥ एकपत्नीव्रती जो ॥२५॥
त्या रघुपतीसीं सख्य करूनि ॥ अर्पीं आतां जनकनंदिनी ॥ मग तूं अक्षयीं लंकाभुवनीं ॥ चंद्रार्कवरी नांदें कां ॥२६॥
तूं जयाचा म्हणविसी भक्त ॥ तो शिव रघुपतीसी ध्यात ॥ त्यासी वैर करितां यथार्थ ॥ स्वामिद्रोही होसी तूं ॥२७॥
सनक सनंदन सनत्कुमार ॥ मुख्य विरिंचि आणि पुरंदर ॥ हे रघुपतीचे आज्ञाधार ॥ तरी तो मित्र करीं तूं ॥२८॥
जो वेदउदयाचळींचा दिनकर ॥ जो महामायेचा निजवर ॥ तो हा अयोध्यानाथ उदार ॥ तरी तो मित्र करी तूं ॥२९॥
जो सुनीळ चिद्धनगर्भ ॥ जो अनंत ब्रह्मांडांचा आरंभ ॥ गुणसागर सीतावल्लभ ॥ तरी मित्र करीं तूं ॥३०॥
कमलोद्भव कमलाकार ॥ कपालधर ज्याचे अज्ञाधार ॥ तो हा जगवंद्य रघुवीर ॥ तरी तो मित्र त्वां करावा ॥३१॥
वेद शास्त्र पुराणें जाण ॥ नारदादि गाती जयाचे गुण ॥ तो हा दशशतमुखांगशयन ॥ तरी तो मित्र करीं तूं ॥३२॥
शतकोटी अपराध करून ॥ तो जरी परतोन आला शरण ॥ तरी तयावरी रघुनंदन ॥ सर्वांहून प्रीति करी ॥३३॥
भक्तिभावें अर्पितां तीळ ॥ राम मानी जैसा कनकाचळ ॥ जो भक्तांचा होऊन द्वारपाळ ॥ अंतरर्बाह्य रक्षीत पैं ॥३४॥
तरी त्या द्विपंचरथनंदना ॥ शरण जाईं द्विपंचवदना ॥ जनकजा हे मम कन्या ॥ भावूनि अर्पीं रघुत्तमा ॥३५॥
दशकंठा तूं परम सज्ञान ॥ टाकिलीं वेदांची खंडें करून ॥ करी पद्मिणीपतिकुळभूषण ॥ सखा करीं सर्वस्वे ॥३६॥
ऐसी अंगदाचीं वचनें ॥ जीं विवेकभूमीचीं निधानें ॥ कीं भक्तिसागरीची रत्ने ॥ दशकंठासी समर्पिलीं ॥३७॥
यावरी तो दशकंठधर ॥ परम दुर्बुद्धि अविचार ॥ घृतें शिंपिजे वैश्र्वानर ॥ तैसा क्षोभला ते काळीं ॥३८॥
साधूचें वर्म लक्षून ॥ छळिती जेवीं दुर्जन ॥ तैसा अंगदाप्रति रावण ॥ बोलता झाला ते काळीं ॥३९॥
म्हणे रे मर्कटा अविचारा ॥ कोणाचा तूं पालेखाइरा ॥ मज रावणासीं पामरा ॥ शिटाई करूं आलासी ॥४०॥
मशका अग्नीपुढें तृण ॥ कीं शिवापुढें पंचबाण ॥ कीं मृगेंद्रासी गुण ॥ जंबुक शिकवूं पातला ॥४१॥
मर्कटा तुझा पिता कोण ॥ तो सांगें मज लागून ॥ यावरी ताराहृदयरत्न ॥ प्रतिवचन देतसे ॥४२॥
माझा पिता आहे कोण ॥ तो तूं नेणसी दुर्जना अझून ॥ जेणें कक्षेंत तुज दाटून ॥ केलें स्नान चतुःसमुद्रीं ॥४३॥
मग माझे पालखीवरी देख ॥ तुज बांधिला जैसा मशक ॥ तुझ्या दाढ्या मिशा सकळिक ॥ म्यांच उपडिल्या बाळपणीं ॥४४॥
माझ्या मूत्रोदकेंकरून ॥ मशका तुझें कंटाळलें मन ॥ मग तुझा पिता येऊन ॥ भिक्षा मागे वाळीसी ॥४५॥
तुझे मुखांसी मसी लावून ॥ शिरीं पांच पाट काढून ॥ लंकेत दिधला तुज भिरकावून ॥ पायी धरून ते काळीं ॥४६॥
ऐसा शक्रसुत महाबळी ॥ तूं गुंतलासी ज्याचे कक्षेतळीं ॥ तयाचा मी सुत ये काळी ॥ शिक्षा तुज करूं आलों ॥४७॥
आतां पुससी कवणाचा दूत ॥ अयोध्यापति जो रघुनाथ ॥ तुझ्या उरावरील चाप उद्भुत ॥ जेणें उचलोनि मोडिलें ॥४८॥
जेणें ताटिका मर्दून ॥ वीस कोटी पिशिताशन ॥ त्यांसहित सुबाहू मारून ॥ मारीच उडविला बाणवातें ॥४९॥
तुझी भगिनी शूर्पणखा ॥ जेणें केली निर्नासिका ॥ तो सौमित्राग्रज स्मरारिसखा ॥ त्याचा दूत मी असे ॥५०॥

अध्याय पंचवीसावा - श्लोक ५१ ते १००
वधोनियां खरदूषण ॥ निष्कंटक केलें जनस्थान ॥ त्या रामपंचाननाची वस्तु चोरून ॥ घेऊन आलासी जंबुका ॥५१॥
होमशाळेंत रिघोन श्र्वान ॥ पळे पुरोडाश घेऊन ॥ कीं देवगृहांत मलिन ॥ हिंसक जैसा संचरे ॥५२॥
की गृहीं नसतां मुख्य धनी ॥ तस्कर रिघे कोशसदनीं ॥ तैसी जानकी उचलोनि ॥ आलासि घेऊन पतिता ॥५३॥
त्या तुज चोराचा काढीत माग ॥ सुवेळेसी आला सीतारंग ॥ तुझे आयुष्याची भरली सीग ॥ तें तूं नेणसी शतमूर्खा ॥५४॥
पुच्छीं पाय पडतां देख ॥ खवळे जैसा दंदशूक ॥ तैसा प्रतिउत्तर दशमुख ॥ अंगदासी देतसे ॥५५॥
म्हणे रे मर्कटा मी दशवदन ॥ वानरांसहित रामलक्ष्मण ॥ क्षणें टाकवीन गिळोन ॥ कुंभकर्णांतें सांगोनियां ॥५६॥
सुरांसहित सहस्रनयन ॥ बंदी घातला आकळून ॥ तेथें काय मानव रामलक्ष्मण ॥ जीतचि आणीन धरूनी ॥५७॥
गरुडें सर्पमस्तकींचा मणी ॥ नेला तो जरी देईल आणोनी ॥ तरी तुम्हांस जनकनंदिनी ॥ प्राप्त होईल माघारी ॥५८॥
गजमस्तक विदारून ॥ मुक्तें घेऊन गेला पंचानन ॥ तो भिऊन देईल जरी परतोन ॥ तरी जानकी देईन मी ॥५९॥
अरे इंद्र माळा गुंफोन ॥ नित्य देई मजलागून ॥ छत्र धरी रोहिणीरमण ॥ सहस्रकिरण दीपिका धरी ॥६०॥
रसनायक वाहे पाणी ॥ वस्त्रें धूत सदा अग्नि ॥ गृहींचा केर काढूनि ॥ लोकप्राणेश टाकीतसे ॥६१॥
ऐसा मी समर्थ दशवक्र ॥ तेथें कायसे नर -वानर ॥ मागें एक पालेखाइर ॥ चोरून लंकेत आला होता ॥६२॥
तेणें उपडितां अशोकवन ॥ आम्ही सभेस आणिलें धरून ॥ पुच्छास लावितां अग्न ॥ नगर जाळूनि पळाला ॥६३॥
तो पुन्हां भेटेल जरी वानर ॥ तरी तात्काळचि करीन चूर ॥ मग म्हणे वाळीपुत्र ॥ ऐक मशका राक्षसा ॥६४॥
तुझें असंख्य दळ संहारून ॥ टाकिले सात पुत्र मारून ॥ इंद्रजित विवरीं कोंडून ॥ अशोकवन विध्वंसिलें ॥६५॥
तैं तुझें बळ रावणा ॥ कोठें गेलें होते खळा मलिना ॥ तुज शिक्षा करावया दुर्जना ॥ पुनः मारुति आला आहे ॥६६॥
त्रिभुवनपती सीतावल्लभ ॥ जो त्रैलोक्यनगरारंभस्तंभ ॥ त्यास मनुष्य म्हणसी तूं रासभ ॥ दशमुखाचा यथार्थ तूं ॥६७॥
इतर ओहळ आणि भागीरथी ॥ वरकड गज आणि ऐरावती ॥ उच्चैःश्रवा जो सूर्यरथीं ॥ इतर अश्र्वांसमान नोहे ॥६८॥
खद्योत आणि चंडकिरण ॥ किंवा काग आणि सुपर्ण ॥ तैसें वानर आणि वायुनंदन ॥ नव्हती समान राक्षसा ॥६९॥
परिस आणि इतर पाषाण ॥ वरकड पशू आणि शिववहन ॥ भगणें आणि रोहिणीरमण ॥ नव्हे समान राक्षसा ॥७०॥
इतर पर्वत आणि कनकाचळ ॥ इतर किरडें आणि फणिपाळ ॥ तैसा मनुष्यासमान ॥ तमालनीळ ॥ अपवित्रा तूं केंवि म्हणसी ॥७१॥
तूं दशमुखांचा बस्त होसी ॥ शिववरें मातलासी ॥ सीतादेवी निश्र्चयेसीं ॥ आदिमाया भवानी ॥७२॥
रणमंडळ हें होमकुंड ॥ राक्षस आहुती पडतील उदंड ॥ शेवटीं पूर्णाहूती प्रचंछ ॥ तुझी पडेल दशमुखा ॥७३॥
तुवां केलें वेदाध्ययन ॥ जैसा रासभावरी वाहिला चंदन ॥ कीं षड्रसांमाजी नेऊन ॥ दर्वीं जेवीं फिरविजे ॥७४॥
तूं दशमुखाचें वनचर ॥ तुज वधावया पारधी रघुवीर ॥ सुवेळाचळीं समरधीर ॥ येऊन उभा ठाकला ॥७५॥
अंगदशब्द परम कठीण ॥ हृदयीं खोंचती जैसे बाण ॥ परम सक्रोधें रावण ॥ वालीनंदनाप्रति बोले ॥७६॥
म्हणे रे मर्कटा वनचरा ॥ तूं भूभार झालासि पामरा ॥ तुझा पिता मारूनि तारा ॥ सुग्रीवासी दीधली ॥७७॥
पितृसूड न घेववे तुझेनि ॥ तरी प्राण देईं समुद्रजीवनीं ॥ अथवा माझे पाठीसी येऊनी ॥ रिघे वेगी मशका रे ॥७८॥
वधोनि सुग्रीव रघुनंदन ॥ तुज किष्किंधेचें राज्य देईन ॥ तुझी माता व्यभिचारिण ॥ सुग्रीवासी तिणें वरिलें ॥७९॥
सुग्रीव आणि रघुवीर ॥ तुझे मुख्य शत्रु साचार ॥ अंगद म्हणे शक्रकुमर ॥ रामबाणें मुक्त जाहला ॥८०॥
राघवप्रसादेंकरूनी ॥ वाळी अक्षय्य सायुज्यसदनीं ॥ दशमुखा तुज ये क्षणीं ॥ शिक्षा करीन पाहें पां ॥८१॥
माझिया पाणिप्रहारेंकरूनी ॥ दशमुखें तुझी टाकीन फोडूनी ॥ तुझा पुरुषार्थ त्रिभुवनीं ॥ सर्व जाणतो अपवित्रा ॥८२॥
सहस्रार्जुनाचे बंदी जाऊन ॥ पडला होतासि तूं कित्येक दिन ॥ तो तूं आजी येथें वदन ॥ दाखवितां न लाजसी ॥८३॥
मग बळीचे गृहा जाऊन देखा ॥ बंदीं पडिलासि तूं मशका ॥ तेथे तुज दासी झेलती कीटका ॥ कक्षेसीं दाटिती घडी घडी ॥८४॥
ऐसा पुरुषार्थी तूं देख ॥ न लाजसी दावितां मुख ॥ तुझे छेदावया दहाही मस्तक ॥ रघुवीर सिद्ध जाहलासे ॥८५॥
ऐसें ऐकोनि दशकंधर ॥ द्विजपंक्तीनें चावी अधर ॥ सवेगे ओढिलें शस्त्र ॥ विद्युत्प्राय ते काळीं ॥८६॥
सेवकांसी म्हणे दशकंठ ॥ धरारे वेगीं मर्कट ॥ तों चौघे राक्षस बळकट ॥ धांवोनियां धरिते जाहले ॥८७॥
अंगद दंडी दृढ धरिला ॥ वाळिपुत्रें देखोनि तेवेळां ॥ अद्भुत पराक्रम प्रकट केला ॥ क्षणमात्र न लागतां ॥८८॥
कृतांतकिंकाळीसमान ॥ हाकेसरसे गाजवी गगन ॥ रावणाचे हृदयी पूर्ण ॥ पुच्छघाय दिधला ॥८९॥
रावण मस्तकींचा मुकुट तेजाळ ॥ पदांगुष्ठें उडविला तात्काळ ॥ ऊर्ध्व उडाला सबळ ॥ मंडपमस्तकी बैसला ॥९०॥
चौदा गांवें जो विस्तीर्ण ॥ प्रभेस उणा चंडकिरण ॥ तो घेऊन वाळिनंदन ॥ गेला क्षण न लागतां ॥९१॥
भुजीं जडले चौघेजण ॥ त्यांचे अंतराळी गेले प्राण ॥ लोंबती प्रेते होऊन ॥ वाळिनंदन जातसे ॥९२॥
आला देखोनि वाळिसुत ॥ आश्र्चर्य करी जनकजामात ॥ अंगद उतरला अकस्मात ॥ कपिनाथ हर्षले ॥९३॥
दंडीची प्रेतें सोडवूनी ॥ मंडप तेव्हां ठेविला धरणी ॥ त्रिभुवनपतीचे चरणीं ॥ मस्तक अंगद ठेविला ॥९४॥
प्रीतीनें येऊनि मिलिंद ॥ सेवी पद्मकोशींचा सुगंध ॥ तैसाच वीर अंगद ॥ रघुवीरपदाब्जीं मीनला ॥९५॥
मग तो जगदानंदकंद ॥ आलिंगी हृदयीं प्रेमें अंगद ॥ सकळ कपींसी आनंद ॥ वाळिपुत्रासी भेटतां ॥९६॥
रावणाचा मुकुट तेवेळां ॥ अंगदें रामापुढें ठेविला ॥ तो बिभीषणाचे मस्तकीं घातला ॥ दशरथात्मजें ते वेळीं ॥९७॥
अंगदास म्हणे रघुनंदन ॥ मंडप येथें आणिला उचलोन ॥ पुढें कोठें बैसेल बिभीषण ॥ सिंहासन घालूनियां ॥९८॥
ऐसें वाळिसुतें ऐकोनी ॥ मंडप उचलिला ते क्षणीं ॥ शेष मस्तकीं धरी अवनी ॥ तैसा घेऊन जातसे ॥९९॥
जेथींचा तेथें मंडप ठेविला ॥ सुवेळेसी परतोन आला ॥ राक्षससमुदाय ते वेळां ॥ आश्र्चर्य परम मानित ॥१००॥
 
अध्याय पंचवीसावा - श्लोक १०१ ते १५०
केवढा पुरुषार्थ करूनी ॥ राक्षसेंद्रासी गांजोनी ॥ मंडप गेला घेउनी ॥ सवेंच आणून ठेविला ॥१॥
असो राघवापुढें वाळिनंदन ॥ सांगे लंकेचें वर्तमान ॥ नानापरी बोधिला रावण ॥ परी तो नेणें दुष्टात्मा ॥२॥
गिरिमस्तकीं वर्षें जलधर ॥ परी तेथे न राहे अणुमात्र नीर ॥ तैसा बोधिला दशकंधर ॥ स्थिर नोहे बोध तेथें ॥३॥
नित्य दुग्धें न्हाणिला वायस ॥ परी तो कदा न होय राजहंस ॥ दह्यांमाजी कोळसा बहुवस ॥ घालितां उजळ नव्हेचि ॥४॥
सिकता शिजविली बहुकाळ ॥ परी ते कदा नव्हे मवाळ ॥ कीं परीस नेऊन तात्काळ ॥ खापरासी व्यर्थ लाविला ॥५॥
जन्मांधापुढें दीप जाणा ॥ कीं बधिरापुढें वाजविला रुद्रवीणा ॥ सारासार समजेना ॥ शतमुर्खा जैसा कां ॥६॥
कीं शर्करेमाजी नेऊन ॥ कडू दुधिया ठेविला बहुदिन ॥ परी त्याचें अंतर पूर्ण ॥ गोड नव्हे अणुमात्र ॥७॥
षोडशोपचारें पूजिलें प्रेत ॥ परी ते गेलें जैसे व्यर्थ ॥ तैसा बोधिला लंकानाथ ॥ परी तो नायक सर्वथा ॥८॥
जोंवरी शशी चंडकिरण ॥ तोंवरी केला राजा बिभीषण ॥ एकवचनी तूं सीतारमण ॥ तुझें वचन व्यर्थ नव्हे ॥९॥
युद्ध केलियावांचोनी ॥ कदा नेदी जनकनंदिनी ॥ राघवेंद्रें ऐसे ऐकोनी ॥ चंड दोर्दंड पीटिले ॥११०॥
जैसा रजनी अंतीं वासरमणी ॥ अकस्मात पूर्वेस देखिजे जनीं ॥ तैसी कोदंडाची गवसणी ॥ नरवीरोत्तमें काढिली ॥११॥
कीं ते मेघांतूनि वेगळी ॥ प्रळयचपळा निवडिली ॥ तैसी गवसणी काढितां प्रभा पडली ॥ कोदंडाची अकस्मात ॥१२॥
क्षण न लागतां चढविला गुण ॥ उभा ठाकला सीतारमण ॥ ओढी ओढितां आकर्ण ॥ थरथरिली सप्त द्वीपें ॥१३॥
काळाचे मनीं बैसे दचक ॥ तैसी सुग्रीवें दिधली हांक ॥ अठरा पद्में वानर देख ॥ गर्जना करीत उठले पैं ॥१४॥
बाहात्तर कोटी रीस ॥ हाकेसरिसे भरिती आकाश ॥ पृथ्वी डळमळितां नागेश ॥ ग्रीवा खालीं सरसावी ॥१५॥
दिग्गजांची बैसली टाळीं ॥ कूर्मपृष्ठी तेव्हां थरथरली ॥ यज्ञवराह पृथ्वी तळीं ॥ सांवरीत दंतानें ॥१६॥
एकदांचि कपीचे भुभुःकार ॥ ऐकतां दचकले निर्जर ॥ धुळीनें दिशा दाटल्या समग्र ॥ मेरुमांदार कांपती ॥१७॥
वीस कोटी वानर घेऊन ॥ लंकेवरी धांवला सुषेण ॥ जेवीं वारणचक्रावरी पंचानन ॥ गर्जत धांवे निःशंक ॥१८॥
सकळ पापासी रामनाम ॥ जैसें जाळूनि करी भस्म ॥ तैसा तो वानरोत्तम ॥ अंजनीतनय धांविन्नला ॥१९॥
सकळ वानरेसीं सेनापति ॥ नीळ धांविन्नला समीरगती ॥ धुळीनें लोपला गभस्ती ॥ वाटे कल्पांत मांडला ॥१२०॥
झाला एकचि हाहाःकार ॥ गजबजिलें लंकानगर ॥ वेळा सांडोनि नदेश्र्वर ॥ बुडवूं पाहे उर्वीतेंं ॥२१॥
उदकावरी तुंबिनीफळ ॥ तैसें डळमळे भूमंडळ ॥ वरी आसुडती निराळ ॥ भगणें भडभडां रिचवती ॥२२॥
मेरूऐसे लंकेचे हुडे ॥ वरी रचिले शस्त्रांचे जुंबाडे ॥ प्रळयविजूचेनि पाडें ॥ नग्न शस्त्रें झळकती ॥२३॥
लंकादुर्गावरी सत्वर ॥ बळें चढती प्रतापशूर ॥ केशीं धरूनि रजनीचर ॥ आसुडोनि खालीं पाडिती ॥२४॥
उल्हाटयंत्रांचे भडिमार ॥ कोट्यनकोटी करिती असुर ॥ भिंडिमाळा शस्त्रें अपार ॥ राक्षस वरून भिरकाविती ॥२५॥
कोट्यनकोटी पर्वत थोर ॥ एकदांच झोंकिती वानर ॥ वरिले यंत्रे होती चूर ॥ रजनीचरांसहित पैं ॥२६॥
दुर्गावरूनि राक्षस पाहीं ॥ वानर झोडिती शस्त्रघाईं ॥ दुर्गपरिघ ते समयीं ॥ राक्षसप्रेतांनी बुजियेले ॥२७॥
पुच्छ दोराकार टाकोनी ॥ असुरांचे ग्रीवेस गोवुनी ॥ एकदांच पाडिती आसुडोनि ॥ खंदकामाजी प्रेतवत ॥२८॥
एक अकस्मात् वानर उडोनी ॥ राक्षसांस पायीं धरूनी ॥ गरागरां भिरकाविती गगनीं ॥ आपटोनि धरणी मारिती ॥२९॥
एक राक्षसांचीं पोटें फोडिती ॥ एक चरणकरनासिकें तोडिती ॥ एक प्रेत उचलोनि मागुती ॥ भिरकाविती लंकेत ॥१३०॥
आटले बहुत रजनीचर ॥ गोपुरावरूनि दशकंधर ॥ विलोकित दिशा अंबर ॥ तो वानरमय दिसतसे ॥३१॥
स्वसैन्यासी दशकंधर ॥ म्हणे काय पाहतां निघा बाहेर ॥ आटोनि समस्त वानर ॥ माजवा समरभूमि वेगें ॥३२॥
चतुरंग दळसागर ॥ निघे लंकेतून बाहेर ॥ कोट्यनकोटी असुर ॥ पाईंचे पुढे तळपती ॥३३॥
पर्वतासमान रजनीचर ॥ विक्राळ तोडें भाळी शेंदुर ॥ बाबरझोटी दाढी शुभ्र ॥ जिव्हा आरक्त लळलळित ॥३४॥
खदिरांगार लखलखित ॥ तैसे नेत्र त्यांचे आरक्त ॥ मद्यपानें झाले मस्त ॥ शस्त्रें घेऊन तुळती ॥३५॥
सुरांची शिरे रेखूनी ॥ ब्रीदे बांधिली चरणीं ॥ यमदंष्ट्रा झळकती जधनीं ॥ आवेशेंकरून गर्जती ॥३६॥
वोडण असिलता शक्ति ॥ शूळ तोमर घेऊनि हातीं ॥ गदा परिघ चक्रें झळकती ॥ दंडीं पिंजारिती चामरें ॥३७॥
वानरांचे करून पुतळे ॥ रुळत चरणीं घातले ॥ हांका देती परम बळें ॥ एकदांचि सर्वही ॥३८॥
दणाणत उर्वीमंडळ ॥ म्हणती देवांनो धांवा सकळ ॥ तुमच्या रामासहित दळ ॥ रणांगणीं ग्रासिलें ॥३९॥
तयांपाठीं अश्र्वभार ॥ नानाजातीचें मनोहर ॥ वरी बैसले राऊत असुर ॥ असिलता घेऊनियां ॥१४०॥
तयांपाठी गजभार ॥ ऐरावती समान थोर ॥ वरी शूळ घेऊनि बैसले असुर ॥ ध्वजीं अंबर भेदिती ॥४१॥
तयां पाठीसी चालिले रथ ॥ रत्नजडित चाकें झळकत ॥ तुरंग जुंपिले चपळ बहुत ॥ गगनचुंबित ध्वज बहु ॥४२॥
संग्राम संकेत भेरी ॥ असुरीं ठोकिल्या ते अवसरीं ॥ रणातुरें आणि मोहरी ॥ तेथें धडकती विशाळ ॥४३॥
वैरियांचीं आणि स्वदळें ॥ एकवटलीं दोन्ही दळें ॥ एकचि घनचक्र मांडिलें ॥ नादें कोंदलें अंबर ॥४४॥
जय यशस्वी अयोध्यानृपवर ॥ म्हणोनि धांवती वानरवीर ॥ वृक्षाघायें रजनीचर ॥ झोडोनि समरीं पाडिती ॥४५॥
कृतावंत धांवती वानर ॥ टाकिती पर्वत पाषाण अपार ॥ असुरांचे अस्थिपंजर ॥ चूर होती लागतां ॥४६॥
उठावले राक्षस बळें ॥ तोडिती कपींचीं शिरकमळें ॥ कीं उसळती नारिळें ॥ कोट्यनकोटी आकाशीं ॥४७॥
जैसीं इक्षुदंडांचीं खंडें ॥ तैसीं करचरणांचीं दुखंडें ॥ एकदांच पडती प्रचंडें ॥ असुरहस्तें करूनियां ॥४८॥
खेटकाआड असुर दडती ॥ कुंतशक्तीनें बळें खोंचिती ॥ वानरां विदारून पाडिती ॥ ठायीं ठायीं असंख्य ॥४९॥
अकस्मात कपि धांवती ॥ काळिजे राक्षसांचीं काढिती ॥ प्रेते तेथें पडलीं किती ॥ नव्हे गणती कोणातें ॥१५०॥

अध्याय पंचवीसावा - श्लोक १५१ ते २००
आवेशें कपि शिळा टाकिती ॥असुरांचे मुखांवरी आदळती ॥रक्ते भडाभडां उसळती ॥मस्तकें उडती तडतडां ॥५१॥
उर्ध्वपंथें शिरें उडती ॥स्वर्गपंथा भेदीत जाती ॥नाशिवंत म्हणोनि उतरती ॥सीतापति पाहावया ॥५२॥
समरभूमीसीं धडें नाचती ॥दोनी हस्तें टाळी वाजविती ॥आम्हांसी येथेंचि आहे गती ॥नृत्य करिती म्हणूनियां ॥५३॥
रणीं भ्याड जे तयांप्रती ॥तुटली शिरें गदगदां हांसती ॥आम्ही पावलो मोक्षगती ॥तुम्हांस नाही हो सर्वथा ॥५४॥
असो वानरवीर प्रचंड ॥तों गजभार लोटलें उदंड ॥कपी ओढूनि शुंडादंड ॥आकाशपंथें भोवंडिती ॥५५॥
गजदंत मोडोनि लवलाहें ॥वरिल्या ताडिती त्याचि घायें ॥शुंडा मिळोनियां पाहें ॥कुंभस्थळें फोडिती ॥५६॥
पुच्छीं धरूनियां वारण ॥गगनीं देती भिरकावून ॥त्याचें लक्ष वेधून ॥दुसरा गज भिरकाविती ॥५७॥
ऐसे लक्षांचे लक्ष वारण ॥गगनीं करिताती भ्रमण ॥एक तुरुंग पायी धरून ॥स्वारांसहित आपटिती ॥५८॥
वृक्षमंडित पर्वत ॥रथांवरी टाकिती अकस्मात ॥रथ सारथियांसमवेत ॥पिष्ट होती तया घायें ॥५९॥
असो तीन रात्री तीन दिवस ॥युद्ध झालें आसमास ॥सुरांचे अवतार किंपुरुष ॥लोटिले राक्षस माघारे ॥१६०॥
ऐसें देखोनि वीर धूम्राक्ष ॥रथारूढ धांवे रणदक्ष ॥तेणें निजबाणीं लक्षानुलक्ष ॥वानरवीर पाडिलें ॥६१॥
शिळा पर्वत एकसरी ॥कपि टाकिती धूम्राक्षावरी ॥परी तो चपळ बाणधारी ॥पिष्ट करूनि टाकित ॥६२॥
असंख्यात वानरगण ॥धूम्राक्षें मारिले न लागतां क्षण ॥कपीचें भार पळोन ॥पराजय पावले ॥६३॥
उणें देखतांचि सत्वर ॥वेगे धांवला रुद्रावतार ॥उचलोनियां गिरिवर ॥धूम्राक्षावरी टाकिला ॥६४॥
अश्र्व सारथी रथ चूर्ण ॥पर्वताखालीं जाहले जाण ॥धूम्राक्ष चपळ उड्डाण । करूनि गेला एकीकडे ॥६५॥
मग शूळ घेऊनि ते अवसरी ॥धूम्राक्ष धांविन्नला मारुतीवरी ॥मारावया सर्पारी ॥अळिका जैसी चपेटे ॥६६॥
वारणावरी धांवे मृगेंद्र ॥तैसा आवेशें वायुपुत्र ॥मुष्टिघातें त्याचें शिर ॥मृत्तिकाघटवत चूर्ण केले ॥६७॥
गजासी पर्वतपात जाहला ॥कीं महावृक्ष उन्मळिला ॥तैसा धूम्राक्ष पडिला ॥गतप्राण होऊनियां ॥६८॥
धूम्राक्ष पडतांचि तात्काळ ॥पळों लागलें घायाळ ॥जैसें मन आकळितां बळ ॥इंद्रियांचें न चले कांहीं ॥६९॥
जेथोनि मन उडे निश्र्चितीं ॥तेथें कैंची राहिली प्रीती ॥कीं देखणियाची गती ॥नेत्र गेलिया मावळे ॥१७०॥
तैसा धूम्राक्ष पडतां ते काळीं ॥घायाळें लंकेत प्रवेशलीं ॥रावणें वार्ता ऐकिली ॥हृदयीं वाढली परम चिंता ॥७१॥
मग दळभारेंसी वज्रदंष्ट्री ॥दशमुख तयासी आज्ञा करी ॥तो समरभूमीसी झडकरी ॥येता झाला वातवेगें ॥७२॥
वानर राक्षस ते समयीं ॥मिसळल एके ठायीं ॥वानवीरों राक्षस महीं ॥प्रेतें करूनि पाडिलें ॥७३॥
रथारूढ वज्रदंष्ट्री ॥हरिदळीं मिसळला झडकरी ॥दोन लक्ष कपि भूमीवरी ॥प्रेतें होऊन पडियले ॥७४॥
ऐसें देखोनि वाळीसुत ॥वेगें धांवला कृतांतवत ॥शतांची शतें पर्वत ॥उचलोनि टाकी अरीवरी ॥७५॥
पर्वतासरी ते क्षणीं ॥राक्षस मारिले एक अक्षौहिणी ॥अशुद्धेंकरूनि धरणीं ॥पूर वाहाती भडभडां ॥७६॥
मग तारातनयें ते अवसरीं ॥उचलिला बहुश़ृगांचा गिरी ॥भिरकाविला वज्रदंष्ट्रीवरी ॥परमावेशें तेधवां ॥७७॥
तों राक्षसें सोडोनियां बाण ॥क्षण न लागतां केला चूर्ण ॥ऐसें अंगदें देखोन ॥महावृक्ष उन्मळिला ॥७८॥
परम प्रतापी वाळीनंदन ॥भुभुःकारें गर्जवीत गगन ॥वृक्षघायासरसा प्राण ॥वज्रदंष्ट्रीचा घेतला ॥७९॥
शरीर जाहलें शतचूर्ण ॥मही भिजली अशुद्धेकरून ॥जैसा रगडितां मत्कुण ॥न उरेच कांही उरी ॥१८०॥
तों अकंपनदळभारें करून ॥रणासी आला न लागतां क्षण ॥तेणें सोडिले असंख्यबाण ॥कपिचक्रावरी पैं ॥८१॥
सिंहचपेटे देखोनि वारण ॥तेंवि पातला सीताशोकहरण ॥वृक्षघातें करून ॥रणी अकंपन विदारिला ॥८२॥
राक्षसदळीं हाहाकार ॥शोकार्णवीं मग्न दशकंधर ॥मग तयास शांतवी ज्येष्ठ कुमर ॥शक्रजित नाम जया ॥८३॥
म्हणे राया तूं चिंता न करीं ॥तुझे शत्रु समरभूमीवरी ॥आजि पहुडवीन निर्धारी ॥शक्रजित तरी नाम ॥८४॥
नाहीं तरी मी जैसा जंत ॥पोटासी आलों यथार्थ ॥मग असंख्य दळासहित इंद्रजित ॥जनका नमोनि निघाला ॥८५॥
असंभाव्य सेनासागर ॥रणमंडळासी आला सत्वर ॥तंव ते अपार वानर वीर ॥रणपंडित प्रतापी ॥८६॥
घेऊन शिळा तरुवर ॥असुरांत मिसळले वानर ॥जैसें वायसांमाजी सुंदर ॥राजहंस मिसळले ॥८७॥
किंवा गारांमाजी हिरे ॥मिसळती जैसें एकसरें ॥तैसे वानर प्रतापें थोरें ॥असुरदळीं चौताळती ॥८८॥
कपींचा प्रताप आगळा ॥देखोनि इंद्रजिते रथ लोटिला ॥तों वाळीपुत्र धांविन्नला ॥महापर्वत घेऊनियां ॥८९॥
जंबुमाळी प्रतापी वीर ॥त्यावरी धांवला वायुकुमर ॥विद्युन्माळी यावरी श्र्वशुर ॥सुग्रीवाचा उठावला ॥१९०॥
जंधनामें असुर प्रबळ ॥त्यावरी धांवे वीर नळ ॥परम मांडलें रणमंडळ ॥हांकें निराळ गर्जतसे ॥९१॥
वानरराक्षसांचीं प्रेतें ॥एके ठायीं पडलीं अगणितें ॥जैसे खडे आणि मुक्तें ॥एकें ठायीं विखुरलीं ॥९२॥
हनुमंतें पायांतळीं ॥घालोनि चिरिला जंबुमाळी ॥विद्युन्माळी ते काळीं ॥सुषेणें आपटोनि मारिला ॥९३॥
नीळें जंध मारिला ते क्षणीं ॥तो अस्ता गेला वासरमणी ॥अंधारें कोंदली रजनी ॥कोणासी कोणी न देखे ॥९४॥
कोणरे कोण असुर पुसत ॥कपि म्हणती आम्ही रामदूत ॥असुरवीर अकस्मात ॥घाय हाणिती सरिसाचि ॥९५॥
कोणरे कोण पुसती वानर ॥जे म्हणती आम्ही असुर ॥घायें हाणोनी कपिवर ॥करिती चूर राक्षसांचा ॥९६॥
सवेंच उदय पावे अत्रिपुत्र ॥आनंदले सकळांचे नेत्र ॥परी वानरवीर अनिवार ॥आटिले असुर पराक्रमें ॥९७॥
मग तो शक्रजित तो वेळां ॥रथासहित सेनेंतून उडाला ॥जलदजाळांत लपाला ॥वर्षों लागला सर्पबाण ॥९८॥
राक्षसांचें कापट्य अद्भुत ॥बाण तेच सर्प होत ॥कपींचे अंगीं संचरत ॥विकळ पडती वीर तेणें ॥९९॥
मग रामलक्ष्मणावरी ॥सर्पबाण सोडी शक्रारी ॥अयोध्यानाथ ते अवसरीं ॥चहूंकडे पाहे तटस्थ ॥२००॥
 
अध्याय पंचवीसावा - श्लोक २०१ ते २६३
म्हणे बाण येतात कोठुनी ॥ संधानकर्ता न दिसे नयनीं ॥ जरी प्रगट दिसे समरांगणीं ॥ तरी बाणी वरी फोडोन ॥१॥
ओढवलें परम दुस्तर ॥ कित्येक उडाले ऊर्ध्व वानर ॥ शोधिलें बहुत अंबर ॥ परी तो वीर दिसेना ॥२॥
वानर आले परतोन ॥ अवघे पाहाती म्लानवदन ॥ रामलक्ष्मणासी बाण ॥ बहुसाल खडतरले ॥३॥
ते समयीं मूर्च्छा येऊन ॥ भूमीवरी पडले दोघेजण ॥ तों इंद्रजित बोले वरून ॥ कां निवांत राहिलां ॥४॥
मारूनियां दूषण खर ॥ शिळीं बांधिला सागर ॥ म्हणवितां क्षत्रिय राजकुमार ॥ कां रे शर सोडाना ॥५॥
वरकड कपींवर बाण ॥ शक्रजितें टाकिले वरून ॥ तरू उन्मळती मुळींहून ॥ हरिगण तैसे पडियेले ॥६॥
किंशुक फुलतां बहुत ॥ सिंदुरवर्ण दिसे पर्वत ॥ तैसीं कपींची शरीरें आरक्त ॥ असंख्यात पडियेली ॥७॥
शक्रजित खालीं उतरून ॥ मुख्य जे पडले राक्षसगण ॥ त्यांचीं कुणपें उचलून ॥ लंकेसी नेता जाहला ॥८॥
जयवाद्यांचा होतां घोष ॥ परम आनंदला लंकेश ॥ हृदयीं आलिंगोनि पुत्रास ॥ म्हणे धन्य मी तुझेनि ॥९॥
त्रिजटेस म्हणे रावण ॥ पुष्पकीं सीतेसी बैसवून ॥ दृष्टीस दावीं सकळ रण ॥ रामसौमित्रांसमवेत ॥२१०॥
त्यांचीं विलोकितां प्रेतें ॥ मग ती वश होईल आम्हांतें ॥ अवश्य म्हणोनी जानकीतें ॥ विमानीं बैसवी त्रिजटा ॥११॥
सकळ मंडळ विलोकित ॥ तों अनुजासहित रघुनाथ ॥ दृष्टी देखतां मूर्च्छित ॥ जनकात्मजा पडियेली ॥१२॥
मग त्रिजटेनें सीता धरूनी ॥ उठवोनि बैसविली सांवरूनी ॥ म्हणे माये धैर्य धरी मनीं ॥ चापपाणि उठेल आतां ॥१३॥
तंव ते बिभीषणाची राणी ॥ सरमा जवळी गुप्त येउनी ॥ विदेहतनयेचे कर्णीं ॥ निजगुज सांगतसे ॥१४॥
म्हणे जगन्माते धरी धीर ॥ आता उठतील रामसौमित्र ॥ संहारितील सकळ असुर ॥ आन विचार येथें नाही ॥१५॥
मी अनृत बोलेन साचार ॥ तरी माझें खालीं पडेल शिर ॥ माझे पूर्वज अपार ॥ नरक भोगितील आकल्पवरी ॥१६॥
त्रिजटा म्हणे जानकीसी ॥ माते चिंता न करी मानसीं ॥ पुष्पक अशोकवनासी ॥ वेगेंकरून पातले ॥१७॥
सीतेस बैसवून स्वस्थानीं ॥ करी मानसीं ॥ पुष्पक अशोकवनासी ॥ वेगेंकरून पातलें ॥१७॥
सीतेस बैसवून स्वस्थानीं ॥ त्रिजटा सांगे रावणालागुनी ॥ म्हणे सीतेचिया सत्वा हानी ॥ कल्पांतीही नव्हेचि ॥१८॥
मग त्रिजटा परतोनि ॥ सीतेपासी बैसें येऊनी ॥ जैसी चित्तवृत्ति मुरडोनी ॥ स्वरूपीं पावे विश्राम ॥१९॥
सरमा म्हणे जनकनंदिनी ॥ तूं चिंता कांही न करी मनी ॥ पुराणपुरुष चापपाणी ॥ त्याची करणी जाणसी तूं ॥२२०॥
आपुला प्रताप विशेष ॥ वाढवावया अयोध्याधीश ॥ आधीं शत्रूस दिधलें यश ॥ कांही एक आरंभी ॥२१॥
हे ब्रह्मांड सकळिक ॥ बाणीं जाळील रघुनायक ॥ तेथें इंद्रजित मशक ॥ उशीर काय वधावया ॥२२॥
रावण कुंभकर्ण इंद्रजित ॥ तोचि ही बाहुलीं निर्मित ॥ खेळ मांडिला जो अद्भुत ॥ जाणसी समस्त तुझें तूं ॥२३॥
निशा संपतां चंडकिरण ॥ उगवे की नुगवें म्हणोन ॥ या चिंतेचें कारण ॥ कांही नाही जाणपां ॥२४॥
करितां रामनामस्मरण ॥ पापें जाती न जाती जळोन ॥ या संदेहाचें कारण ॥ कांहीच नसे जाण पां ॥२५॥
हृदयीं प्रगटतां शुद्ध ज्ञान ॥ चुके कीं न चुके जन्ममरण ॥ या चिंतेचें कारण ॥ काहीच नाही जाण पां ॥२६॥
क्षमा शांति धरितां जाण ॥ कलह होय न होय म्हणोन ॥ या चिंतेचें कारण ॥ कांहीच नाही जाण पां ॥२७॥
अयोध्यानाथ रघुनंदन ॥ यासी जय कीं अपजय म्हणोन ॥ या चिंतेचें कारण ॥ कांहीच नसे जाणपां ॥२८॥
ज्या रामाचे करितां स्मरण ॥ भक्त पावती जयकल्याण ॥ तो जगदानंद पूर्ण ॥ विजयी असे जानकी ॥२९॥
असो इकडे बिभीषण ॥ सूर्यसुतासी बोले वचन ॥ म्हणे राक्षस पर्वत आणून ॥ रामावरी टाकितील ॥२३०॥
उदय पावे जंव गभस्ती ॥ तंव जतन कराव्या दोनी मूर्ति ॥ बोल बोलतां अश्रु स्रवती ॥ रावणानुजाचे तेधवां ॥३१॥
मग जिवंत होते जे वानर ॥ त्याही पुच्छमंडप करूनि सत्वर ॥ दोन्ही स्वरूप सुकुमार ॥ रक्षिली तेव्हां अंतरीं ॥३२॥
कीं पुच्छेपेटी करून ॥ ब्रह्मादि देवांचे देवतार्चन ॥ वानर बैसले सांठवून ॥ सभोंवते सद्रद ॥३३॥
सूर्यवंशमंडण दशरथ ॥ त्याचे महत्पुण्याचा पर्वत ॥ तो वानरीं वेष्टूनि बहुत ॥ चिंताक्रांत बैसले ॥३४॥
मारुति बिभीषण रण शोधित ॥ तों महावीर पडले बहुत ॥ एक नेत्र उघडोनि पुसत ॥ बिभीषणाप्रती ते काळीं ॥३५॥
म्हणती या चराचराचें जीवन ॥ तो सुखी आहे कीं रघुनंदन ॥ सद्रद होऊन बिभीषण ॥ म्हणे चिंता न करावी ॥३६॥
तों घायें जांबुवंत विव्हळत ॥ बिभीषणासी जवळी बोलावित ॥ पुसे क्षेम आहें की रघुनाथ ॥ पुराण पुरुष जगदात्मा ॥३७॥
स्फुंदस्फुंदोनि सांगे बिभीषण ॥ नागपाशीं बांधिले दोघेजण ॥ तों मूर्च्छना सांवरून सुषेण ॥ नेत्र उघडोनि बोलत ॥३८॥
म्हणे द्रोणाचळीं औषधी बहुत ॥ जरी कोणी आणील बळवंत ॥ तरी रामसौमित्रांसहित ॥ दळ अवघें उठवीन ॥३९॥
मग बोले बिभीषण ॥ ऐसा बळिया आहे कोण ॥ रात्रीमाजी जाऊन ॥ औषधी येथें आणील ॥२४०॥
जांबुवंत बोले वचन ॥ एक सीताशोकहरण ॥ त्यावांचूनि गिरी द्रोण ॥ आणूं कोणी शकेना ॥४१॥
मग सुषेण आणि जांबुवंत ॥ बिभीषण तयांसी हातीं धरित ॥ श्रीरामापाशीं बोलत बोलत ॥ येते जाहले तेधवां ॥४२॥
तंव रण शोधूनि हनुमंत ॥ तोही तिकडोनि आल त्वरित ॥ याउपरि किष्किंधानाथ ॥ बोलता जाहला ते काळीं ॥४३॥
म्हणे रामसौमित्रांसी उचलून ॥ जा तुम्ही किष्किंधेसी घेऊन ॥ मी रावणा सहकुळीं मारून ॥ घेऊन येईन जानकी ॥४४॥
राज्यीं स्थापीन बिभीषण ॥ बंदींचे सोडवीन सुरगण ॥ राहूं मी आणि वायुनंदन ॥ सर्वीं परतोन जावें आतां ॥४५॥
तेव्हां सोडवीन सुरगण ॥ राहूं मी आणि वायुनंदन ॥ सर्वीं परतोन जावें आतां ॥४५॥
तेव्हां आकाशीं वदे देववाणी ॥ आतांचि उठेल चापपाणी ॥ नेत्र उघडिले तये क्षणीं ॥ अयोध्याधीशें सत्वर ॥४६॥
भोंवतें पाहे राघवेश ॥ तों निकट बैसले निजदास ॥ मानस वेष्टोनि राजहंस ॥ बैसती जैसें प्रीतीनें ॥४७॥
कीं कमळवेष्टित भ्रमर ॥ कीं अहिवेष्टित मलयागर ॥ कीं दिव्यमुक्ताभोंवतें चतुर ॥ परीक्षक जेंवी मिळती ॥४८॥
असो सुग्रीवास म्हणे रघुनंदन ॥ बारे तूं आपुला दळभार घेऊन ॥ किष्किंधेसी जाई परतोन ॥ येथे दोघे राहू आम्ही ॥४९॥
ऐसें उदास बोले रघुनाथ ॥ सर्वांसी आले अश्रुपात ॥ सुग्रीव सद्रद बोलत ॥ म्हणे विपरीत केवी घडे ॥२५०॥
सांडोनियां दिनपती ॥ किरणें कोणीकडे जाती ॥ कनकावेगळी कांती ॥ कल्पांतीहि नव्हेची ॥५१॥
घटास मृत्तिका सांडूनी ॥ कोणीकडे राहील भिन्न ॥ पटास तंतु त्यागोन ॥ वेगळा नोहेच सर्वथा ॥५२॥
लहरी सागरासी सांडूनी ॥ काय बैसतील काननीं ॥ तुज सांडून चापपाणी ॥ आम्हीं केवीं राहावें ॥५३॥
बिभीषण म्हणे अयोध्यापती ॥ जरी तमकूपी पडेल गभस्ती ॥ शेषही सांडील जगती ॥ परी सामर्थ्य तुझें उणे नोहे ॥५४॥
रसहीन बोलती मात ॥ जे न मानिती रणपंडित ॥ तों नवल वर्तलें अद्भुत । वायु गुप्तरूपें पैं आला ॥५५॥
सीतावल्लभाचे कर्णीं ॥ गरुडमंत्र गेला सांगोनी ॥ रघुवीरें जपतांचि ते क्षणीं ॥ सुपर्ण वेगें धांविन्नला ॥५६॥
जैसी आंगीं केश अमूप ॥ तैसे रामासी जडले सर्प ॥ तो विष्णुवहनप्रताप ॥ देखतां सर्प पळाले ॥५७॥
तात्काळ उठले रामसौमित्र ॥ अष्टादशपद्में वानर ॥ उठोनि करिती भुभुःकार ॥ तेणें लंकानगर दणाणिलें ॥५८॥
निरभ्र नभीं दिसे दिनकर ॥ तैसे देदीप्यमान रामसौमित्र ॥ देव करिती जयजयकार ॥ सुमनसंभार वर्षती ॥५९॥
सुग्रीवादि कपि बोलती ॥ आजि लंका घालूं पालथी ॥ कोदंड चढवूनि सीतापती ॥ अरिपंथ लक्षीतसे ॥२६०॥
युद्धकांड रसभरित ॥ जेथें वीररसचि अद्भुत ॥ ते कथा ऐकतां समस्त ॥ शत्रुक्षय होय पैं ॥६१॥
ब्रह्मानंदा श्रीरघुवीरा ॥ दशमुखांतका समरधीरा ॥ भक्तपाळका श्रीधरवरा ॥ निर्विकारा अभंगा ॥६२॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकीनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ पंचविंशतितमोध्याय गोड हा ॥२६३॥
अध्याय ॥२५॥ ओंव्या ॥२६३॥
श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु श्रीमज्जगदीश्र्वरार्पणमस्तु ॥