Last Modified: शुक्रवार, 3 एप्रिल 2015 (17:13 IST)
बोलण्यात, वागण्यात प्रेम असावे
आपल्या बोलण्यामध्ये नव्हे तर पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे. सर्वाशी अगदी निष्कपट प्रेमाने वागावे. बोलणे अगदी गोड असावे. ‘श्रीराम’ साध्या सोप्या पण आशयघन शब्दांचा उपयोग करून, सर्वसाधारण मनुष्याला समजेल, पटेल असे सांगणे हे सर्वच संतांचे वैशिष्ट्य आहे. फार मोठे मोठे जाड, क्लिष्ट, जड शब्द संत वापरीत नाहीत. ‘साच आणि मवाळ मितले आणि रसाळ। शब्द जैसे कल्लोळ। अमृताचे।।’ (श्री ज्ञानेश्वरी) साध्या साध्या शब्दांमधून योग्य सुपरिणाम साधून सर्वसाधारण माणसाचे वर्तन, प्रेममय, आनंदी कसे होईल? यासाठी श्रीसंत सदैव प्रयत्नशील असतात. या चैतन्यवचनात श्री महाराज असेच सांगतात. आपले बोलणे, पाहणे, वागणे कसे असावे? याचे अत्यंत सुयोम्य मार्गदर्शन केले आहे.
आपल्या बोलण्यामध्ये नव्हे तर पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे. श्री संतांच्या शब्दांचा विचार फार सूक्ष्मपणे करावा लागतो. तोही त्यांच्याच कृपेने करता येतो. चैतन्य वचनाच्या पहिल्या वाक्याच्या उत्तरार्धात ‘सुद्धा’ असा शब्द आला आहे. या ‘सुद्धा’चे दोन अर्थ. कदाचित केवळ बोलण्यामध्येच प्रेम असते, वागण्यात असेलच असे नाही. म्हणून बोलणे आणि वागणे दोन्हीतही प्रेम असावे असे दोन अर्थ. बोलण्यामध्येही प्रेम असावे पाहण्यामध्येही म्हणजे दृष्टीतही. देहबोलीतही प्रेम असावे. ‘असावे’ याचाही विचार खोल आहे. ‘प्रेम’ ठेवावे असे म्हटलेले नाही. ‘असणे’ आणि ‘ठेवणे’ यात भेद आहे. ‘ठेवणे’ प्रयत्नपूर्वक असते. नाईलाज म्हणून असू शकते. आवश्यकता म्हणून असू शकते. पर्याय नाही म्हणून असू शकते. स्वार्थ म्हणून असू शकते. धाक वा दबाव म्हणूनही असू शकते. अर्थात सुरुवाती सुरुवातीला ठेवावे लागते, असा प्रयत्न सातत्याने होऊ लागला की ते हळूहळू, निश्चितपणे अंगभूत होऊन जाते. नंतर त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही ते सहज होते. म्हणून ‘असावे’ असे म्हटले आहे. बोलण्यामध्येही निर्हेतुक प्रेम असावे. बोलणे हे हळू, नम्रस्वरात, साधे, सहज, आपुलकीचे, प्रसन्न असावे म्हणजे प्रेम आपोआप येईलच. प्रेम म्हणजे दुसऱ्या,बद्दल आपल्या मनात असणारी निर्हेतुक आपुलकीची भावना. ‘पाहणे’ याचेही दोन अर्थ. स्थूल दृष्टी आणि सूक्ष्म दृष्टी. आपली कोणाकडेही पाहण्याची स्थूल दृष्टीही प्रेमम, शांत असावी. डोळे हे मनाचा आरसा आहेत. नितळ, प्रेममय डोळे आपण ज्याच्याकडे पाहता त्यालाही सुखावतात. सूक्ष्म दृष्टी म्हणजे मनाने पाहणे. एखादा एवढा नाटकी असू शकतो की मनात कपट ठेवूनही तो प्रेमाने पाहील. तसा अभिनय करेल.
तिसरी महत्त्वाची गोष्ट श्री महाराज सांगतात. सर्वाशी अगदी निष्कपट प्रेमाने वागावे. स्वार्थ पोटी ठेवून प्रेमाने वागणारे लोक जगात भेटतात. आपले काम साधून घेण्यापुरते काही लोक प्रेमाने वागतात. तसे नसावे. निर्मळ, नितळ, मोकळ्या मनाने सर्वाशी प्रेमाने वागावे. आपले बोलणे अगदी गोड असावे याचा अर्थ नेहमी स्तुतिपरच बोलावे असे नाही. एखाद्याकडून खरेच काही चूक झाली असेल तर त्याला चारचौघात न बोलता स्वतंत्रपणे एकांतात, विश्वासात घेऊन शांतपणे समजावून सांगावे, हेही एक प्रकारचे गोड बोलणेच आहे. या संपूर्ण चैतन्यवचनात ‘निष्कपट’ हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे.
कसलाही स्वार्थ मनात न ठेवता; मोकळ्या मनाने; अहेतुक; सहजपणे ; बोलण्यात, पाहण्यात, वागण्यात प्रेम असावे असा निष्कपट शब्दाचा अर्थ आहे. हा निष्कपट शब्द बोलणे, पाहणे, वागणे या तीनही शब्दांना लावावा म्हणजे हे चैतन्यवचन अधिकाधिक प्रेमयुक्त आणि गोड होईल, यात शंकाच नाही. दुधात जसे लोणी लपलेले असते. तसा यात परमार्थ लपलेला आहे. आपले बोलणे, पाहणे, वागणे हे सारे निष्कपट, हेतुरहित असणे हीच निष्काम भक्ती होय. ।।श्रीराम।।
आपल्या बोलण्यामध्ये नव्हे तर पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे, सर्वाशी अगदी निष्कपट प्रेमाने वागावे. आपले बोलणे अगदी गोड असावे.