1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 23 फेब्रुवारी 2015 (16:16 IST)

रंगरूपव्यवहार

pooja
शेगावीचे राणा सद्गुरु श्री गजानन महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त सोरेगाव, सोलापूर येथे दर्शनासाठी गेलो होतो. प्रसादाच्या रूपाने श्रींच्या दिव्य चरणावरील पुष्पहार माझ्या गळ्यात घालण्यात आला. तो सुमनहार घेऊन मी घरी आलो. हार श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायापाशी ठेवला. विठ्ठलाच्या चरणाशी तो हार ठेवताना मनात भाव दाटले. माझ्या गळ्यात घातलेला हा हार मी या नियंत्याच्या चरणाशी कसा ठेवू? माझ्या स्पर्शाने हा हार मलीन तर झाला नसेल? मनात भावकल्लोळ दाटला. फुलांना भेदभाव ठाऊक नाही. फुले फुलेच असतात. सुगंध देणे हाच त्यांचा गुणधर्म. कुणाच्या सहवासामुळे फुले कधीच मलीन होत नाहीत. आपले एका दिवसांचे आयुष्य अवघ्या जगासाठी सुगंध घेऊन उधळणारी फुले म्हणूनच ईश्वराला अधिक प्रिय असावीत. आम्हाला एवढे आयुष्य मिळते. आम्ही जगांसाठी काय करतो? हा अंतर्मुख  करणारा प्रश्नही मनाला छळत राहिला. परमेश्वराला कोणत्याही नावाने संबोधले तरी चालते. विज्ञान त्याला निसर्ग म्हणेल. श्रद्धा जपणारे भक्त त्याला विविध नावाने संबोधतील. परंतु अनेक नामांनी विभूषित झालेल्या त्या अनामिक निर्गुणाला कसे जाणावे? सार्‍या चरांसाठी त्याने  अवघी अचर सृष्टी बनविली आहे हे मात्र सत्य होय. अवतीभोवती असलेल्या आणि उपलब्ध होणार्‍या सर्व निसर्गनिर्मित गोष्टीचेच स्वरूप बदलून विकसित होताना, मानव म्हणून आम्ही नेमके काय साध्य करतो आहोत? त्या अद्भूत निसर्गापासून नेमका कोणता संदेश घेतो? याचा विचार अस्वस्थ करून गेला.

निसर्गातील कोणतीही गोष्ट आपल्यला मूलस्वभाव बदलत नाही, मलीन होत नाही निसर्गकुलीनच राहते. फुलांच्या बाबतीत माणसाने केवळ सुगंध या एकाच गोष्टीचा विचार केला आहे. खरे तर उद्याची फळे देणारे ते एक सृष्टीचे सृजनरूप असते. छोटय़ा छोटय़ा कीटकांना, फुलपाखरांना आणि मधमाशांना मकरंद नावाचे पक्वान्न पुरविणारी अन्नपूर्णा नावाची माताही फुलांच्या रूपात दडलेली असते. आपल्या   वंशाची वृद्धी करताना, आपले जीवन जगताना इतरांसाठी कसे जगावे? हे शिकवून जाणारी फुले हे एक गुरुरूप आहे. म्हणून तर आनंद साजरा करताना, दु:ख साजरे करताना, कोणतीही पूजा मांडताना फुलांचा सहवास माणसाला मिळावा असाही हा निसर्गसंस्कार असावा. मानवी जीवनात सुगंध देणारी शोभेची वस्तू एवढाच अर्थ फुलांना नक्कीच नाही. माळरानावर किंवा आडरानात दलदलीत फुलणारी फुले कोणी पूजेसाठी नेत नाही किंबहुना अशा सर्वच फुलांना सुगंध असेल असेही नाही. सुगंधित नाहीत म्हणून कोणत्याच फुलांचे महत्त्व कधीच कमी होत नाही. सुगंधावर प्रत्येक फुलांची योग्यता ठरविण्याचा मूढ व्यवहार केवळ स्वार्थापोटी माणूसच करू शकतो. प्रत्येक फुलाचा बाजार व्हावा, असे निसर्गाला कधी वाटत नाही. आपल्या सानिध्यात येणार्‍या प्रत्येक फुलपाखराला, कीटकाला मकरंद पुरविणारी फुले निर्मळ मनाची असतात. धोत्र्याच्या पांढर्‍या फुलांना माणसाच्या बाजारात काहीच भाव नाही. त्या फुलांच्या पांढर्‍याशुभ्र रूपात सरस्वतीचे शुभधवल वस्त्र आपणास का बरे दिसत नाही. श्री शिवशंकराने हरितालिकेच्या उपवासात हे फूल धारण केले आहे. एरव्ही त्या फुलाला कोणी हातही लावत नाही. पाण्याचे दुर्भिक्ष्य सोसत स्वत:चे जीवन घडविणारा निवडूंग हाही मला आदर्श वाटतो. काटय़ांच्या गर्दीत निवडूंग वाढत राहातो. थावकाश फुलतो. मग त्याला लालचुटूक फुले-फळे येतात. अशा फुलांवरही फुलपाखरे हळूच येऊन बसलेली मी कित्येक वेळा पाहिली आहेत. ती लाल फळे पाखरे मोठय़ा लोभसपणे खाताना पाहिलीत. अशा वेळी माणसाच्या रंगरूपावरील आधारित व्यवहार नकोसा वाटतो.

दीपक कलढोणे