हुताशनी पौर्णिमा 2025: धर्माच्या नावाखाली बोंब मारणे योग्य आहे का?
फाल्गुन पौर्णिमा ज्या दिवशी होलिका दहन केले जाते त्याला हुताशनी पौर्णिमा असे देखील नाव आहे. या दिवशी प्रदोष काळी होळी पेटविली जाते. याची पौराणिक कथा म्हणजे हिरण्यकश्यपूच्या बहिणीला होलिकेला अग्नी जाळू शकणार नाही असा वर होता. म्हणून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मांडीवर घेऊन होळीवर बस असे सांगितले. कारण प्रल्हाद मरेल व ती जिवंत राहील. पण झाले उलटे होलीका मरण पावली व प्रल्हाद जिवंत राहिला. ही घटना फाल्गुन पौर्णिमेला घडली. म्हणून या दिवशी सर्वत्र होळ्या पोटवून आनंद व्यक्त करतात. शिवांनी मदनाला जाळले तोही दिवस हाच होता. मदन दहनाच्या आठवणीसाठी म्हणून होळी पेटवतात.
तसेच ढुंढा नावाची राक्षसी होती. ती लहान मुलांना त्रास देत असे. तिला हाकलून देण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. तेव्हा लोकांनी बीभत्स शिव्या दिला. तेव्हा ती निघून गेली. आजही समाजात वीभत्स बोलणारी, शिक्षा द्याव्यात असे वाटणारी मंडळी आहेत. त्यांना वर्षातून एकदा या गोष्टी करण्याची मुभा धर्मशास्त्राने या दिवसापुरती दिली असल्याचे जरी सांगत असतील तरी होळीच्या दिवशी अश्लील शब्द उच्चारणे, शिवीगाळ करणे आदी कृती परंपरा म्हणून करणार्यांना हे जाणून घेणे आवश्यक आहे की याला धर्मशास्त्रात आधार नाही. मुळात संस्कृत भाषेत एकही शिवी नाही. असे असताना शिवीगाळ करणे हा हिंदूंच्या सणाचा भाग नाही.
बोंब मारणे
होळीच्या सणात, होळी पेटवल्यावर 'बोंब मारणे' म्हणजे तोंडावर हात ठेवून मोठा आवाज करणे, ही एक पारंपरिक पद्धत आहे, जी मनातील नकारात्मक भावना दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी केली जाते. होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची प्रथा पहायला मिळते. त्यामागील शास्त्र म्हणजे मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्यासाठीचा विधी. हुताशनी निनादाचे स्थुलातून प्रकटीकरणाचे प्रतीक म्हणून होळीच्या भोवती मोठ्या घोळक्याने एकत्रित धावत बोंबाबोंब केली जाते. या किंकाळीला हुताश्न असे म्हणतात. लोक तोंडातून आवाज काढतात आणि हाताने मुठ करून तोंड झाकतात. तोंडावर हात उलटा ठेवून बोंब मारण्याच्या मुद्रेमुळे व्यक्तीच्या विचारांना बाहेर पडण्यास गती प्राप्त होते. या कृतीतून वातावरणात आकाशतत्त्वात्मक काळे कण पसरुन त्यांचे विघटन होते. अर्थातच नकरात्मकता दूर होते. वाईट शक्तींचे आक्रमण होत नाही. आणि जळत्या होळीतून चैतन्य, तेजतत्त्व आणि शक्ती प्राप्त होते.बोंब मारल्याने मनातील राग, द्वेष, आणि वाईट भावना दूर होतात असे समजले जाते.
मात्र काही ठिकाणी याचा अतिरेक केला जातो आणि परस्परांतील वैर चव्हाट्यावर आणण्यासाठीही बोंब मारली जाते. कृतीचे विकृतीकरण करणार्यांमध्ये अहंकार असतो त्यामुळे वातावरणातून वाईट शक्ती व्यक्तीच्या डोक्यात विचार घालत रहातात. विकृत बोंब मारण्याने स्वत:भोवती काळ्या वलयांची निर्मिती होते आणि नकारात्मकतेचे वातावरण निर्माण होतो. त्यामुळे बोंब मारण्यामागील नेमके शास् जाणून त्यापासून होणारा लाभ करुन घ्यावा. विकृती केल्यास होणारी हानी आपल्यासाठी हानिकारक ठरु शकते.
होळीच्या सणाच्या जवळपास उष्णता वाढीस लागते. होळी लावल्याने जमीन तापते, जमिनीलगतचा थर तापतो. यावेळी होळी लावल्याने उष्णता वाढते. म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पाऊस चांगला पडतो. हे यामागील विज्ञान असावे. देवालयासमोर, मोकळ्या मैदानात होळी लावावी. होळी लावल्यावर पालथ्या हाताने बोंब मारतात. यामुळे मनातील वाईट प्रवृती शांत होतात.
एकूण काय तर दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून गोडी गुलाबीने साजरा केला जाणार उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून बदल असलेले वातावरणाची शुद्धी केले जाते. फाल्गुन शुद्ध पौर्णिमा ते फाल्गुन कृष्ण पंचमीपर्यंत चालणारा होळीचा सण धूलिवंदन, धुळवड, धुलेंडी, शिमगा, होलिकादहन, कामदहेन, हुताशनी पौर्णिमा, डोल जात्रा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो.
होलिकेची पूजा करतांना म्हणायचा मंत्र
अस्माभिर्भयसन्त्रस्तैः कृता त्वं होलिके यतः ।
अतस्त्वां पूजयिष्यामो भूते भूतिप्रदा भव ॥ – स्मृतिकौस्तुभ