1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

उरोभाग दर्शवून महिला घडविणार भूकंप!

IFM
IFM
स्त्रियांच्या उत्तान अंगप्रदर्शनामुळे 'पृथ्वीचा तोल ढळून भूकंप होतात, असे विधान करणार्‍या इराणच्या एका इस्लामी मौलवीचे विचार खोडण्यासाठी जेनिफर मॅकराईट या महिलेने अभिनव प्रयोग करण्याचे ठरविले आहे. २६ एप्रिलला जगभरातील महिलांनी तोकडे आणि विशेषतः शरीराच्या उरोभागाचे अधिकाधिक 'दर्शन' घडेल असे कपडे घालण्याचे आवाहन केले आहे. त्या योगे खरोखरच भूकंप घडतो की नाही ते पहाता येईल, असा मॅकराईटचा इरादा आहे.

स्त्रियांचे उत्तान कपडे घालण्याने पुरूष भरकटतात. स्त्रीचे पावित्र्य भ्रष्ट होते आणि समाजात अनैतिकता बोकाळते. त्याचाच परिणाम म्हणून जगात भूकंप घडतात, असे विचार इराणचे मौलवी होजातोलेइस्लाम काझेम सेदिगी यांनी मांडले होते.

ते वाचल्यानंतर जेनिफर मॅकराईट या महिलेने त्यांचे हे म्हणणे खोडून काढायचे ठरवले. त्यासाठी 'बूबक्वेक' नावाचे एक पानच फेसबुकवर तयार केले. त्यावर वीस हजार महिलांनी सदस्यत्व घेतले आहे. त्यावर झालेल्या चर्चेनुसार २६ एप्रिलला हे अभिनव आंदोलन करायचे ठरले.

खुद्द जेनिफर त्या दिवशी आपला उरोभाग अधिकाधिक दिसेल असा शर्ट घालणार आहे. हा शर्ट एरवी मी रात्री घालते, असे मॅकराईटने फेसबुकवर लिहिले आहे. या दिवशी तमाम महिलांनी आपला उरोभाग जास्तीत जास्त दिसेल असे तोकडे कपडे घालून त्या 'अतिमानवी शक्तीला' आव्हान द्यावे असे आवाहनही तिने केले आहे.

जास्तीत जास्त स्त्रियांनी असे अंगप्रदर्शन केल्यास इस्लामी मौलवीच्या मते नक्कीच भूकंप होईल. पण तसे झाले नाही, तर मात्र त्या मौलवीला आपण माफी मागायला भाग पाडू असे जेनिफरने म्हटले आहे.